शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
रायगड परिक्रमा
श्री. पराग अरुण लिमये

‘राजा खासा जाऊन पाहता ... गड बहुत चखोट ... गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गाव ऊंच ... पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही ... ऐसे देखोन संतुष्ट जाहले आणि बोलिले तक्तास जागा गड हाच करावा !’ रायगडाचे चहूअंगी प्रत्यक्ष अवलोकन करुन शिवरायांनी काढलेले हे उद्गार सभासदाने आपल्या बखरीत नोंदवले आहेत. शिवरायांना भावलेल हे रायगडाचे रांगडे रुप आणि त्यांना अभिप्रेत असलेली रायगडाची भौगोलिक दुर्गमता व लष्करी अभेद्यता आपल्याला तळातून न्याहाळता येते. दांडगा आत्मविश्वास, भरपूर जिद्द आणि शिवरायांच्या प्रती असीम निष्ठा यांच्या शिदोरीवर रायगडाची ५ - ६ तासांची थोडीशी खडतर पण अनोखी परिक्रमा करता येते.

दरवर्षी साधारण जून महिन्याच्या सुरवातीला रायगडावर राज्याभिषेक दिन सोहळा राज्यारोहण तिथीला धरुन मोठया उत्साहात साजरा होतो. या कार्यक्रमाला धरुन रायगड प्रदक्षिणेचा झक्कास बेत आखायचा. याकाळात वातावरण तसे आल्हाददायक असते आणि प्रदक्षिणा मार्गावर उन्हाचा त्रासही कमी . सकाळी उजाडता उजाडता रायगडाच्या चित्त दरवाज्यापाशी आपल्या सवंगडयांसह जमायच. शिवरायांचा जयजयकार करायचा आणि प्रदक्षिणेला सुरुवात करायची. चित्त दरवाजा पासून सुरु झालेली परिक्रमा प्रथम टकमका खालच्या अंगाने सुरु होते. उजव्या हातास टकमकाचे आभाळात घुसलेले टोक सतत खुणावत राहते. वेगवेगळया कोनांमधून टकमकाचे मोहक दर्शन घडत राहते. या वाटचाली दरम्यान पुढे सती गोदावरी आणि रायनाक महा यांच्या समाधीस्थानांचे दर्शन आपल्याला घडते. इतिहासापेक्षा लोककथांच्या माध्यमातून या व्यक्तिरेखा आजही रायगडाच्या पंचक्रोशीतील जनमानसात जीवंत होऊन राहिल्या आहेत. या ठिकाणांपाशी नतमस्तक व्हायच आणि आपला मुजरा घालून पुढे निघायचे.

वळवावा पाऊस नुकताच झालेला असतो. ग्रिष्माच्या वणव्याने तप्त झालेल्या धरित्रिने सुखाचे पहिले वहिले जलतुषार अनुभवलेले असतात. हळुवार वाऱ्यावर येणाऱ्या मृदगंधाने आसंमताला एक तजेला आलेला असतो. रेशीम पाठीचे मृगाचे किडे (वेल्व्हेट बिटल्स) आणि तुरुतुरु पळणारे खेकडे सृष्टीच्या नव्या अवताराची ग्वाही देत असतात. प्रदक्षिणेच्या परमोच्च बिंदूच्या दिशेने म्हणजेच वाघोली खिंडीच्या दिशेने आपली वाटचाल सुरु असते. रायगडाच्या पूर्व टोकाकडील भवानी कडा आणि एका शिखर यांच्या मधून या वाघोली खिंडीची चिंचोळी वाट पलिकडे उतरते.

अचानक खडा चढ सुरु होतो. वाघोली खिंडीची तीव्र चढण अक्षरश: धापा टाकतच आपण सर करुन खिंडीच्या माथ्यावर विसावतो. समोर पसरलेला सृष्टीचा नजारा पाहून सुखावतो. एका बाजूला काळ नदीचे खोरे त्यामागे रायगडाभोवती फेर धरणारे पण आता धुक्यात हरवलेले डोंगरमाथे पायतळी पसरलेली गर्द झाडी ... आणि या सर्वावर कडी करणारा भवानीटोकाचा रौद कडा ... सारं दृश्य डोळयात साठवून आणि घटकाभर विसावून मग सज्ज व्हायचं खिंड उतरण्यासाठी. आता आपली खरी परीक्षा असते. पहिल्यापावसाने धुपलेली आणि भुसभुसीत झालेली माती, तीव्र उतार आणि तोल सावरता सावरता उडणारी आपली तारांबळ ... एस्सेल वर्ल्डच्या घसरगुंडीची आठवण करुन देणारा हा उतार फार काळजीपूर्वक उतरावा लागतो ... नाहीतर ... धरतीमातेला साक्षात दंडवत केव्हा याचा भरवसा नाही. खिंड उतरल्यावर मागे माथ्याकडे वळून बघायच आणि उतरताना अनुभवलेला थरार आठवून निश्वास सोडायचा. रायगडाचे श्रीगोंदे टोक आणि वाघ दरवाजा यांच्या पायथ्याच्या गर्द झाडीतून आता आपली मार्गक्रमणा सुरु होते. आपल्या परिकमेचा हा दुसरा टप्पा असतो. रायगडाचे एक वेगळ रुपच आपल्यापुढे उभ असत. साक्षात मृत्यूच्या अक्राळविक्राळ जवडयाप्रमाणे भासणारी रायगडाची ती कातळभींत, त्यावरुन कोसळणारे फेनधवल शुभ्र धबधबे आणि बरोबर बेचक्यात जागा धरुन बांधलेला वाघ दरवाजा .... या दरवाज्यातूनच राजाराम महाराज शत्रूला चुकवून वेढयातून निसटून गेले असा इतिहास दाखला देतो. त्या आठवणीनी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. 1818 साली रायगडाचा कर्दनकाळ ठरलेला दक्षिणेचा पोटल्याचा डोंगर दाट धुक्यात गुरफटलेला असतो. अंधुक अस्पष्ट दर्शनाने त्याचे फक्त अस्तित्व जाणवत असते. रायगडचा हाच तो डोंगर. वाटेत आडव्या येणाऱ्या एखाद्या पावसाळी ओढयावर आपली शिदोरी सोडायची. घटकाभर विश्रांती घ्यायची आणि ‘पुन: च हरि ओम’ म्हणून सुटायच ... पुढची वाटचाल पुन्हा एकवार आपली परिक्षा बघणारी असते. काटेरी झाडोरी आणि जाळयांमधून खाली वाकून आणि दमादमाने चालाव लागत. काटेरी जाळयांमधली ही सुमारे पाऊण तासांची फरफट एका मोकळया जागेवर येऊन मगच थांबते. काळकाईची खिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिठयावर एक अनामिक वीरगळ आहे. मराठे - सिद्दी संघर्षात धारातीर्थी पडलेल्या या पराक्रमी वीराच्या स्मारकाची ‘नाही चिरा नाही पणती’ अशी स्थिती पाहून मनाला रुखरुख लागून राहते.

खडतर वाटचालीने आपली गात्र थकलेली असतात परंतु रायगडाच एक नव रुप डोळेभरी पाहल्याचे समाधान असत. आता आपण प्रदक्षिणेच्या अंतीम टप्प्याकडे म्हणजे हिरकणीवाडीच्या ‘रायगड रोपवे’ स्थानकाकडे झेपावत असतो. चित्त दरवाज्यापासून सुरु झालेली आपली यात्रा आता अंतिम चरणापाशी आलेली असते. एखाद्या मोठया भावाप्रमाणे रायगडाने संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर आपल्या स्फूर्तीदायी अस्तित्त्वाने आपली पाठराखण केलेली असते. ज्या मार्गाने शिवरायांनी रायगडाची परिक्रमा केली त्याच मार्गाने यशस्वी पायपीट केल्याच्या कल्पनेने आपण रोमांचित झालेलो असतो. भारावलेल्या अवस्थेतच मग शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी गडाच्या पायऱ्यांकडे आपला मोहरा वळतो. रायगड परिक्रमेचा हा अनुभव स्फूर्तीदायक आणि आपले अनुभव विश्व समृध्द करणारा ठरतो. खऱ्या अर्थाने ही सहल ऐतिहासिक, भौगोलिक व वैज्ञानिक ... आणि हो पावसाळीसुध्दा ठरते.

Site Designed and Maintain by Net Solutions