शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
आईसाहेबांची सुवर्णतुला
प्रा. मोहन आपटे

फार फार दिवसांपासून मनात होतं की काही तरी दानधर्म करावा. लवकरच सूर्याला ग्रहण लागणार आहे असं त्यांना कळलं. दानधर्मासाठी ग्रहणासारखी दुसरी पर्वणी शोधूनही सापडणार नाही. जिजाबाईंनी आपली ही इच्छा बहुधा शिवबांना बोलून दाखविली असावी. मातेचा प्रत्येक शब्द झेलणाऱ्या शिवबांनी मातेच्या इच्छेपेक्षा कांकणभर जास्तच असंच काही तरी करायचं असा निश्चय केला. दानधर्म करायचा पण तो किती? त्याचं काही मोजमाप पाहिजे की नाही. शिवरायांच्या मनात एक नामी युक्ती आली. आईसाहेबांना भल्या मोठया तराजूच्या एका पारडयात बसवायचं आणि दुसऱ्या पारडयात त्यांच्या वजनाइतंक सुवर्ण ओतायचं आणि तेच गोरगरिबांना आणि ब्रह्मवृंदांना वाटाचय. म्हणजेच सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची सुवर्णतुला करायची. एखाद्या तिर्थक्षेत्री हा धार्मिक सोहळा करायचा. पण पवित्र तिर्थक्षेत्राच्या शोधात लांब जायचं काही कारणच नव्हतं. महाबळेश्वर याच तीर्थक्षेत्री सुवर्णतुला करायची असं शिवरायांनी निश्चित केलं.

महाबळेश्वर म्हणजे सह्याद्रीच्या शिरपेचातील एक अमूल्य जडाव ! हिरव्या गार झाडीने महाबळेश्वरच्या पर्वतावर जणू गलिचाच पसरला आहे. चहूबाजूंनी तासलेल्या कडयांच्या घेऱ्यात महाबळेश्वर हे रमणीय स्थान आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पंचनाद्याचे ते उगमस्थान आहे. या पंचकन्या महाबळेश्वराच्या जटेतून उगम पावतात आणि काही जणी आपला संसार कोकणात थाटतात तर काही देशावर ! अनंत काळापासून महाबळेश्वराच्या पिंडीतून सतत पाणी वहात आहे. त्यात कधीच खंड पडलेला नाही. सूर्योपासक वेदमूर्ती गोपाळभट महाबळेश्वरकर या नावाचे एक निस्पृह गृहस्थ महाबळेश्वरीच रहात असत. महाराजांनी आणि आईसाहेबांनी त्यांच्याकडून गुरुमंत्र ग्रहण केला होता. महाबळेश्वरच्या देवालया शेजारीच समर्थ रामदासांचा हनुमानही उभा होता. महाराजांनी सुवर्णतुलेसाठी स्थान तर फारच नामी निवडलं. सूर्यग्रहणाची पर्वण, महाबळेश्वर सारखं पवित्र तिर्थस्थान आणि आईसाहेबांची सुवर्णतुला असा एक त्रिवेणी संगम त्यादिवशी जुळून येणार होता.

सूर्यग्रहणाचा इंग्रजी दिनांक होता १६ जानेवारी १६६५ (ज्युलियन दिनांक ६ जानेवारी) अर्थात त्यादिवशी अमावास्या होती. मार्गशीर्ष महिन्याचा शेवट आणि पौष महिन्याचा प्रारंभ अशा सीमारेषेवरील तो दिवस होता. त्यादिवशी सूर्याला कंकणाकृती ग्रहण लागणार होते. किमान काही मिनिटे सूर्याचे रुपांतर एका तेजस्वी कडयामध्ये होणार होते. एकतर खग्रास सूर्यग्रहण ही पर्वणी फारच दुर्मिळ असते.

त्या खालोखाल कंकणाकृती सूर्यग्रहणाला क्रम लागतो. त्यातच शंभर दोनशे किलोमीटरच्या पट्टयामधूनच अशी ग्रहणे पहाता येतात. खग्रास सूर्यग्रहणातील नाटय मात्र कंकणाकृती सूर्यग्रहणात पहायला मिळत नाही. महाबळेश्वर येथे सकाळी १० वाजून ४० मिनिटे व ५५ सेकंद यावेळी चंद्रबिंबाने सूर्यबिंबावर आक्रमण करायला सुरुवात केली आणि खंडग्रास ग्रहणाचा प्रारंभ झाला. त्याचवेळी बहुधा आईसाहेबांच्या सुवर्णतुलेलाही प्रारंभ झाला असावा, महाराजांनी आईसाहेबांना तराजूच्या एका पारडयात बसविले आणि दुसऱ्या पारडयात सुवर्णाचे दागिने ओतायला सुरुवात केली. ब्रह्मवृंदाचा वेदघोषही त्यावेळी चालू झाला असेल. आईसाहेबांचे वजन किती झाले माहित नाही.

महाबळेश्वरला येताना महाराजांनी सोनोपंत डबीर यांनाही बरोबर आणलं होतं. सोनोपंतांनी महाराजांना लहानपणापासून साऱ्या संकटांमध्ये आणि यशापयशात साथ दिली होती. त्यांनी केलेली स्वराज्याची सेवा सर्वज्ञात होती. पंत आता वयोवृध्द झाले होते. थकले होते. केवळ आईसाहेबांच्या सुवर्णतुलेचा सोहळा पाहण्यासाठीच ते महाबळेश्वरला आले होते. आईसाहेबांची सुवर्णतुला समाप्त झाल्यावर शिवराय सोनोपंतांकडे गेले आणि अतिशय कृतज्ञतेने त्यांनी सोनोपंतांना तराजूच्या पारडयात बसविलं. आईसाहेबांबरोबर वयोवृध्द सोनोपंतांचीही महाराजांनी सुवर्णतुला केली. धनी असावा तर असा !

सूर्य जवळ जवळ डोक्यावर आला आणि त्याचे एका तेजस्वी कंकणात रुपांतर झाले. ते आलौकिक दृश्य त्या दिवशी महाबळेश्वर सुवर्णतुलेच्या सोहळयाला जमलेल्या अनेक लोकांनी टिपले असेल. पुरी पाच मिनिटे सूर्य कंकणाकृती दिसत होती. चंद्रबिंब हळूहळू सुर्यबिंबाच्या बाजूला सरकले आणि दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांनी ग्रहण समाप्त झाले. आधुनिक भाषेत ग्रहणाची प्रत होती ०९१८ म्हणजे १-०९१८ - ०.०८२ एवढाच सुर्याच्या बिंबाचा भाग प्रकाशित होता. त्या दिवशी महाबळेश्वर येथे सूर्य सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी उगवला होता व १२ वाजून ४६ मिनिटांनी तो याम्योत्तर वृत्तावरुन सरकला.

ग्रहण मकर राशीत झाले. ग्रहणमध्याचे वेळी गुरु सूर्यापासून केवळ २.३ अंशावर तर बुध ८.५ अंशावर होता. मंगळही फारसा दूर नव्हता. सूर्यापासून त्याचे अंतर होते १२.८ अंश. याचा अर्थ १६ जानेवारी १६६५ रोजी सूर्य, चंद्र, गुरु, बुध आणि मंगळ या पाच खगोलीय ज्योती परस्परांपासून अगदी जवळ होत्या. शनी सूर्याच्या मागे २३.५ अंशावर तर शुक्र सूर्याच्या पुढे सुमारे ३० अंशावर होता.
‘खगोलीय शिवकाल’ या पुस्तकातून ...

Site Designed and Maintain by Net Solutions