शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
मराठा राजघराण्याची नाणी
प्रशांत भालचंद्र ठोसर

झुंजूमुंजू झाले. पाखरे आंनदाने गाऊ लागली होती. झाडे ही पानांची सळसळ करुन आपला आनंद व्यक्त करीत होती. वारा ही जणू आनंदाच्या तालावर वाहात होता. तिमिर संपून आता काही क्षणातच त्या तेजो भास्कराची किरणे वसुंधरेला स्पर्श करणार होती. सह्याद्रीचे ते भव्यं, काळेकभिन्न कातळ ही जणू आज काहीसे हळवे, भावूक झाले होते. त्यांच्या ही हृदयात घालमेल सुरु होती. आनंदाची, अभिमानाची, कौतुकाची. आपल्या मुकेपणाची ही. सह्यरांगेतीलच एका बेलाग किल्ल्यावर तर रात्रभर कोणीच झोपले नव्हते. झोप लागणार तरी कशी?

न जाणो चुकून डोळा लागायचा अन सूर्योदयाचा तो आजपर्यंतचा पृथ्वीतलावरील अत्यंत बहुमोल क्षण चकवा दयायचा. नकोच, त्यापेक्षा रात्रभर जागलेलेच चांगले. काय घडणार होतं? अहो, सूर्य तर रोजच उगवतो की, मग आजच काय विशेष? नाही, नाही! आजचा सूर्य हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन त्या दुर्गराज रायगडावर स्थापित झाल्याची गोड बातमी घेऊन येणार आहे. ज्या आईने, गुरुजनांनी, आप्तांनी, जवळच्यांनी आणि हो, प्रत्यक्ष त्या बेलाग सह्यकडयांनी ज्याला ४४ वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्याच्यासाठी आपले आयुष्यही प्रसंगी यमराजाला अभिमानाने दान केले, तो देवाधिपती इंद्रालाही हेवा वाटेल असा स्वकर्तृत्ववान शिवाजी राजा आज सिंहासनाधिष्ठित चक्रवर्ति “छत्रपति” होणार होता. सांगा, याहून परम भाग्यशाली क्षण आहे का कोणता?

या युगी पृथ्वीवर सर्वत्र म्लेच्छं पातशाहा, हा मराठा येवढा छत्रपति झाला ही गोष्टं काही सामान्य झाली नाही.

शिवाजी महाराजांनी समजायला लागायच्या आधीपासूनच सार्वभौम हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नं बघितले, नव्हे त्यांनी तो ध्यासच घेतला होता. कौरव-पांडवांचे कुलुगुरू द्रोणाचार्य यांनी तिरंदाजी स्पर्धेत १०५ जणांना विचारले होते की त्या झाडावरील तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतात? प्रत्येकाने त्याच्या आकलनाप्रमाणे विविध उत्तरे दिली होती. मात्रं महाधनुर्धारी अर्जुनाने त्यांना सांगितले होते की मला फक्त त्या पक्ष्याचा (पर्यायाने माझ्या समोरील लक्षाचा) फक्तं डोळा दिसतो आहे. या प्रमाणेच शिवरायांना केवळ रयतेभिमुख हिंदवी स्वराज्याचेच ध्येय नजरेसमोर दिसत होते. अन्य वतनदार, जहागिरदारांप्रमाणे संधीसाधू बदल करीत स्वत:चे बस्तान टिकवून ठेवायचे हा स्व-केंद्रीत विचार कधी त्या महान राजाच्या मनाला स्पर्शला ही नाही. म्हणूनच त्यांनी त्या समयी सुरु केलेल्या कालगणाना शकास “स्वस्तिश्रीराजाभिषेक शक” नाव दिले.

अथक प्रयत्न करुन स्वराज्याची स्थापना केल्यावर त्याला सार्वभौमता, सर्व मान्यता मिळावी म्हणून “श्री नृपशालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी” या मुहूर्तावर शिवरायांना राजाभिषेक करण्यात आला. राजमाता जिजाऊसाहेब, गागाभट्टादी विद्वान पुरुष अशा व अन्य ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या उपस्थितीत हा अनुपमेय, अलौकिक सोहळा या पृथ्वीतलावर तब्बल ३५० वर्षानंतर घडला. या प्रसंगी श्री शिवाजी महाराजांनी “छत्रपति” ही पदवी धारण केली व स्वतंत्र राज्याकर्त्याच्या धोरणानुसार स्वत:ची सोन्याची तसेच तांब्याची नाणी पाडली. सोन्याच्या नाण्यास “होन” असे म्हणत आणि तांब्याच्या नाण्यास ‘रुका’ अथवा “शिवराई पैसा” असे संबोधले जाते. होनाचे वजन २.७२८ ग्रॅम व शिवराईचे ११ ते १२ ग्रॅम असायचे. या दोन्ही नाण्याच्या एका बाजूस “श्री राजा शिव” तीन ओळीत व दुसऱ्या बाजूस “छत्र पति” दोन ओळीत छापलेले असते. नाण्याच्या कडेला (कॉलर ऑफ दी कॉईन) बिंदुमय वर्तुळ असते. (डॉटेड सर्कल). ही नाणी हाती पाडलेली असल्याने ओबडधोबड दिसतात. यावरील लिखाण ही अनेकदा कॉलरच्या बाहेर गेलेले असते. यांना “क्रूड कॉईन्स” असे म्हणतात. विजयनगरच्या हिंदूसाम्राज्याच्या सोन्याच्या होनांप्रमाणेच महाराजांनी देवनागरी लिपीतील स्वत:चे होन पाडले.

त्यांच्यानंतर दुसरे छत्रपति शंभाजी (संभाजी हा यावनी अपभ्रंशित शब्दं आहे) महाराज, राजाराम महाराज, शाहू (थोरले) महाराज आदि छत्रपतिंनी ही स्वत:ची नाणी पाडली. थोरल्या शाहू महाराजांनतर छत्रपतिंची मध्यवर्ती सत्ता थोडी कमकुवत होऊन स्वराज्याचे पंतप्रधान उर्फ पेशवे यांच्यामार्फत जास्त करुन मराठा सत्तेचा कारभार सांभाळला जाऊ लागला. पेशव्यानाही आधीची परंपरा अनुसरुन विद्यमान छत्रपतिंच्या नावानेच नाणी पाडली. फक्त त्यात “श्री राजा” या दोन शब्दांच्या मध्ये आणखी एक रेघ दिली. या पध्दतीच्या नाण्यास “दुदांडी शिवराई” असे म्हणतात. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या अनपेक्षित निधनानंतर शाहू महाराजांनी पेशवाईंची वस्त्रे त्यांचा तरुण, तडफदार मोठा मुलगा थोरले बाजीराव यांना सुपूर्द केली. थोरल्या बाजीरावांनी आपल्या भीमपराक्रमी लहान बंधू चिमाजी अप्पांच्या साथीने पार दिल्लीपर्यंतची यावनी सत्ता खिळखिळी करुन सोडली. तदनंतरच्या काळात मराठा सैन्याने थेट अफगाणिस्तानातील अटकेपर्यंत आपल्या घोडयांना धाव मारायला लावली. ज्या बलाढय मुघल सत्तेचा एकेकाळी नव स्थापित मराठीसत्ता चिरडण्याचा प्रयत्न चालू होता त्याच मुघल सम्राटांना आता अंतर्गत दुफळी तून स्वत: आणि राजसत्ता वाचविण्यासाठी बलिष्ठं अशा मराठा सत्तेचा आधार घ्यावा लागणे अपरिहार्य बनले होते. शाहू महाराजांनी जरी चौथाईच्या सनदा दिल्लीहून आणवल्या होत्या तरी आता त्याच तख्तावर कोण सम्राट बसणार हे मराठे ठरवित होते. थोरले बाजीराव व नंतरच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानात गुजरातेत प्रथम दाभाडे नंतर कायमस्वरूपी गायकवाड, इंदरो येथे मल्हारराव होळकर, ग्वाल्हेरला राणोजी शिंदे व कालांतराने दिल्लीश्वरांनी “वकील-ई-मुतालिक” म्हणून गौरविलेले महापराक्रमी महादजी शिंदे, मध्यप्रदेशातीलच धार आणि देवास-थोरली पाती (सिनिअर ब्रांच) व धाकली पाती (ज्युनिअर ब्रांच) येथे पवार घराणे असा मराठा महासंघ (कॉन्फेडरसी) प्रस्थापित झाला. नागपूरला जानोजी, रघुजी भोसले होतेच. सावंतवाडी, वेंगुर्ला येथे सावंत घराणे सत्ताधीश होते.

छत्रपतिंची मध्यवर्ती सत्ता केंद्रस्थानी मानून पेशव्यांच्या अधिपत्याखाली ही सारी मराठा राजघराणी जोरकसपणे उभी ठाकून हिंदवी स्वराज्याचा विस्तार करीत होती. तसेच औरंगजेबानंतर एकही समर्थ बादशहा न मिळालेल्या मुघली सत्तेला आपल्या सामर्थ्यावर नाचवित होती. आपल्या तलवारीच्या व अनुशासनाच्या जोरावर संपूर्ण हिंदुस्थानात मराठी सैन्याचा दबदबा जाणवत होता. कालातंराने पेशव्यांच्या हातातील छत्रपतिंच्या मध्यवर्ती केंद्रसत्तेप्रमाणे या सर्व राजघराण्यांनी स्वत:ची स्वतंत्र राज्यकर्त्यांप्रमाणे नाणी पाडण्यास सुरुवात केली. पश्चिम भारतातील बडोदा संस्थानचे अधिपती गायकवाड घराणे, मध्य भारतातील इंदोर येथील होळकर घराणे, मध्य भारतातीलच ग्वाल्हेरचे शिंदे घराणे व मध्य भारतामधील धार आणि देवास (धाकटी पाती, मोठी पाती म्हणजे सिनीयर ब्रांच व ज्युनियर ब्रांच येथील पवार राजघराणे ही प्रामुख्याने पराक्रमी मराठा घराणी होत.

बडोदा नरेशांनी गाईचे रक्षणकर्ते म्हणून गायकैवार अथवा गायकवाड असे उपनाम लावले आसा एक सर्वसाधारण समज आहे. सुरूवातीला बडोदा प्रांतातील दाभाडे यांचे वर्चस्व मोडून यांनी पेशव्यांच्या सूचनेप्रमाणे स्वतःची सत्ता बडोदा प्रांतात स्थिरस्थावर केली. या घराण्याचा मूळ संस्थापक म्हणजे दमाजी गायकवाड. त्यांना इ.सन १७२१ मध्ये ‘समशेर बहाद्दर’ हा किताब मिळाला. म्हणून गायकवाडांच्या बहुसंख्य नाण्यांवर तलवार हे चिन्ह दिसून येते. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी पुण्याच्या पेशव्यांचे व काही प्रमाणात जोधपूरच्या राजाचे बडोद्यावरील वर्चस्व झुगारून स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. पुढील वाटचालीत अंतर्गत सत्तासंघर्षात पुढे आनंदराव गायकवाड यांनी इ. स. १८०० मध्ये ब्रिटिशांना (ईस्ट इंडिया कंपनी) मध्यस्थ करून सत्ता टिकवली. १८१८ मधील पेशवाईच्या पाडावानंतर यांनी ब्रिटीशांशी सलोख्याचे धोरण स्वीकारून १९४७ पर्यंत हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले. या घराण्यात नाणी पाडणारे राजे (१) गोविंदराव, (२) सयाजीराव - पहिले, (३) फतेसिंगराव, (४) मानाजी राव, (५) आनंदराव, (६) सयाजीराव - दुसरे, (७) गणपतराव, (८) खंडेराव, (९) मल्हारराव, (१०) सयाजीराव - तिसरे, (११) प्रतापसिंहराव हे होऊन गेले. यानी तांबे, चांदी, सोने इ. धातूंची नाणी पाडली. बडोदा संस्थानाच्या १) अहमदबाद, २) अमरेली, ३) बडोदा, ४) पेटलाड या ठिकाणी टांकसाळी (mint - म्हणजे नाणी पाडण्याची जागा) होत्या. यांच्या नाण्यांवर अंकुश, झेंडा, तलवार, कटयार, फुल, सूर्यचंद्र, हत्ती, श्री इत्यादी चिन्हांबरोबर त्या त्या राजाची आद्याक्षरे कोरलेली असायची.

पश्चिम मध्य भारतील नाव घेण्याजोगं परंतु तसे छोटेखानी मराठा संस्थान म्हणजे देवास. देवास धाकली पाती (ज्युनियर ब्रांच) व देवास थोरली पाती (सिनियर ब्रांच) अशी ही जुळी संस्थाने. तुकोजी व जिवाजी पवार या दोन भावांची सत्ता येथे इ.स. १७२६ पासून प्रस्थापित झाली. चमकदार कामगिरी बद्दल त्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडून या संस्थानांची जहागिरी मिळाली. परंतु त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे त्यांच्यावर बहुदा वर्चस्व होळकर तसेच शिंदे घराण्याचेच राहिले. त्यांना पेंढारी टोळयांच्या लुटालुटीचा उपसर्ग ही मोठया प्रमाणात झाला. तरीही आज मराठा राजमंडळात पवार घराण्याचे नाव आदराने घेतले जाते. इ.स. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी याही संस्थानाचा ताबा घेतला. ज्युनियर ब्रांच मध्ये नाणी पाडणारा राजा म्हणजे नारायणराव. कालावधी इ.स. १८६४-१८९२. यांनी फक्त तांब्याची नाणी पाडली. सिनीयर ब्रांचमध्ये कृष्णाजीराव (इ.स. १८६०-१८९९) आणि विक्रमसिंहराव (इ.स. १९३७-१९४८) यांची नाणी दृष्टीक्षेपात येतात. यांनीही मुख्यत्वेकरुन तांब्याचीच नाणी पाडली. यांच्याच भाऊबंदाची सत्ता असणारे मराठा संस्थान म्हणजे “धार”. हे पवार घराणे मूळ राजपूत परमारांचे वारस आहेत. नवव्या ते तेराव्या शतकात याच परमार घराण्याच्या हातात धार होते. पुढे ते मुस्लिमांनी जिंकले. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात थोरल्या बाजीरावांनी पवारांची स्थापना या संस्थानावर केली. प्रसंगी शिंदे, होळकरांच्या सत्तांशी संघर्ष करीत यांनी आपले १८१९ पर्यंत स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले. मग ते इंग्रजांचे मांडलिक झाले. यांनी सोन्याची वा चांदीची नाणी पाडली नाहीत. पण इ.स. १८१५ मध्ये इंग्रजांचा चांदीचा रुपया आपल्या राज्यात विनिमयाकरता स्वीकारला. या राजघराण्यात १) यशवंत राव (इ.स. १८३४-१८५७) २) आनंदराव-तिसरे (इ.स. १८६०-१८९८) ३) आनंदराव-चौथे (इ.स. १९४३-१९४८) यांचीच नाणी उपलब्ध आहेत. क्रूड (ओबड-धोबड, हाती पाडलेली) व मशिन कट पध्दतीची तांब्याची नाणी ज्यांवर झेंडा (जरी पटका) हनुमान आणि व्हिक्टोरिया राणीचे चित्र आढळून येते.

मराठा संस्थानिकांतील एक अत्यंत सामर्थ्यशाली घराणे म्हणजे मध्य भारतातील शिंदे घराणे. थोरल्या बाजीरावांचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा या घराण्याच्या मूळ संस्थापक पुरुष. असे म्हणतात, की बाजीराव एकदा थोरल्या शाहू छत्रपतिंच्या भेटीसाठी गेले असता महाला बाहेर त्यांचे चढाव छातीशी घट्ट धरुन राणोजी थकव्यामुळे झोपी गेले होते. बाजीराव बाहेर येताच त्यांनी स्वामी निष्ठेचे हे असाधारण उदाहरण लक्षात घेऊन राणोजींना सैन्यात मानाची जागा दिली. आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवीत राणोजी पुढे ग्वाल्हेरला प्रस्थापित झाले. ग्वाल्हेरची राजधानी पूर्वी उज्जैन (दार-उल-फतेह) होती, पण नंतर ग्वाल्हेर हेच राजधानीचे ठिकाण झाले. या घराण्यातील अत्यंत नावलौकिकाला पोहोचलेला पुरुष म्हणजे महादजी शिंदे. हा राणोजींचा सर्वात लहान मुलगा. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले. महादजी इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आला. याच सुमारास आक्रमक अहमदशाह अब्दालीशी लढताना पानिपत येथे मराठयांचे सव्वा लाख सैन्य कापले गेले. त्यांचा दारुण पराभव झाला. शिंदे घराण्यातील अजून एक योध्दा दत्ताजी शिंदे याचवेळी मारला गेला. त्यावेळेच त्याचे वारोचित उद्गार “बचेंगे तो और भी लढेंगे” हे आजही सर्वांना सुपरिचित आहेत. या घराण्यात नाणी पाडणारे राज्यकर्ते म्हणजे १) जयापाराव (इ.स १७५०-१७६१) २) महादजी शिंदे (इ.स. १७६१-१७९४) ३) दौलतराव (इ.स. १८९४-१८४३) ४) बायजाबाई (दौलतरावांची विधवा पत्नी, इ.स. १८२७-१८३३ ५) जनकोजी (इ.स. १८८६-१९२५) ६) जयाजीराव (इ.स. १८४३-१८८६) ७) माधवराव (इ.स. १८८६-१९२५) ८) जिवाजीराव (इ.स. १९२५-१९४८) हे होत. यांनी तांब्याची, चांदीची तसेच सोन्याचीही नाणी पाडली. यांच्या नाण्यांवर श्री, परशु, धनुष्य-बाण, फुल, त्रिशूळ, शिवलिंग, कटयार, तलवार, नाग, पाने, झेंडा, तोफा, कुऱ्हाड, भाला, सूर्य, हनुमान, तसेच राज्यकर्त्यांची नावे, चित्रे इ. चिन्हे दिसून येतात. यांच्या नाण्यात खूप विविधता आढळून येते. शिंदे राजघराण्याने १) अजमेर, २) बजरंगगड (जयनगर), ३) बासोडा, ४) भिलसा (आलमगीरपूर), ५) भरोच, ६) बुऱ्हाणपूर ७) चंदेरी, ८) दोहाद, ९) गढकोटा (रविशनगर-सागर), १०) ग्वाल्हेर किल्ला, ११) इसागढ, १२), जावद, १३) झाशी (बळवंतनगर), १४) लष्कर, १५) मंदसोर, १६) नरवर, १७) राजोद, १८) रथगड (दौलतगड), १९), शाडोरा, २०) शेवपूर, २१) सिप्री, २२) उज्जैन या ठिकाणांहून आपली नाणी पाडली. इ.स. १८०३ मध्ये दौलतरावाच्या नेतृत्वाखालील शिंद्यांचे सैन्य ब्रिटिशींशी लढताना पराभूत झाले. कालांतराने त्यांनी ब्रिटिशांशी सलोखा निर्माण करुन आपले संस्थान १९४७ पर्यंत टिकवून ठेवले.

मराठा संस्थानीकांतील अजून एक तोडीचे नाव म्हणजे होळकर. या घराण्याचा मूळ पुरुष म्हणजे मल्हारराव होळकर. हे एका सर्वसामान्य घराण्यातील होते. थोरल्या बाजीरावांनी त्यांचे गुण हेरून आपल्या घोडदळाचा अधिपती म्हणून नेमले. इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव मरण पावले. पानिपतच्या रणसंग्रामात यांचा भाग होता. त्यांचा मुलगा दुर्दैवाने त्यांच्याच हयातीत मरण पावला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कर्तृत्ववान सून महाराणी अहिल्याबाई हिने तब्बल तीस वर्षे राज्यकारभार अत्यंत कुशलतेने आणि लोकाभिमुख रीतीने करुन सगळयांचीच वाहवा मिळवली. धर्मरक्षणाकरिता त्यांनी मंदिरे, घाट, पाणपोई ठिकठिकाणी उभारली. अहिल्याबाईनंतर या घराण्यात काही प्रमाणात तुकोजी-१ व यशवंतराव-१ यांचा अपवाद वगळता सर्वच राज्यकर्त्यांनी ब्रिटिशांशी सामोपचाराचे धोरण ठेऊन आपले अस्तित्व टिकवून धरले. पहिल्या यशवंतरावांनी संस्कृत भाषेत लिहिलेला रुपया पाडून नाण्याच्या विश्वात एक अद्वितीय नाव मिळविले आहे. यांनी चांदीची तसेच तांब्यांची विविध नाणी पाडली. होळकर घराण्यातील राज्यकर्ते याप्रमाणे होते. १) मल्हारराव - १ (इ.स. १७२८ – १७६६) २) अहिल्याबाई (इ.स. १७६५ - १७९५), ३) तुकोजी - पहिले (इ.स. १७९५ - १७९७), ४) काशीराव (इ.स. १७९७-१७९८), ५) यशवंतराव - पहिले (इ.स. १७९८ – १८११), ६) मल्हारराव - दुसरे (इ.स. १८११ - १८३३), ७) मार्तंडराव (इ.स. १८३४ - १८४३), ८) हरीराव (इ.स. १८३४ - १८८६), ९) खंडेराव (इ.स. १८४३ - १८४४), १०) तुकोजी - दुसरे (इ.स. १८४४ – १८८६), ११) शिवाजीराव (इ.स. १८८६ – १९०३), १२) तुकोजी - तिसरे (इ.स. १९०३ – १९२६), १३) यशवंतराव - दुसरे (इ.स. १९२६ - १९४८) या सर्व राज्यकर्त्यांनी १) चांदोर, २) इंदौर, ३) माहेश्वर, ४) मल्हारनगर, ५) सिरोंज या ठिकाणच्या मिंटस मध्ये नाणी पाडली. यांच्या नाण्यांवर फुल, सूर्य, शिवलिंग, बेलाचे त्रिदलपान, गाय, राजाचे चित्र, होळकर संस्थानची मुद्रा, क्वचित प्रसंगी कुऱ्हाड (बॅटल ऍक्स), कटयार इ. चिन्हे आढळून येतात.

या सर्व मराठा घराण्यांचा हा उत्कर्ष झाला तो सुदिन म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांनी “ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी” ला केलेला राजाभिषेकदिन हाच होय हे आपण प्रत्येक महाराष्ट्रधर्मी मराठयांनी सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Site Designed and Maintain by Net Solutions