शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
राज्याभिषेक
श्री. बाबासाहेब पुरंदरे

रायगड पाहुण्या-रावळयांनी फुलून गेला. गडाची राजबिदी हत्तीघोडयांनी व मेणे-पालख्यांनी गजबजून वाहूं लागली. राजबिदीवरची भव्य भव्य दुकानांनी नटलेली बाजारपेठ आता अधिकच थाट मांडून बसली. केवढा दिमाख ! या बाजारपेठेंतील दुकानांचीं जोतीं अगदी सरळ सुतांत उभीं होतीं. त्यांची उंची पुरूष पुरूष होती अन् त्यांची जडणघडणहि सायसंगीन होती. दुतर्फा अशी घाटदार जोतीं घालून त्यावर भव्य दुकानें बांधलेलीं होतीं. मधला राजरस्तासुध्दा लांब, रूंद, ऐसपैस होता. गडावरती राजप्रासाद, राण्यांचे व अष्टप्रधानांचे महाल, राजसभा, नगारखाना, महाद्वार, राजसेवकांचीं लहानमोठीं असंख्य घरें, श्रीजगदीश्वराचें मंदिर, अश्वशाळा, गजशाळा, गोशाळा इत्यादि इमारती; अठरा कारखाने, बारा महाल; त्यांवरील अधिकायांची घरें, माडया, सोपे, मनोरे; यांशिवाय खास समारंभासाठी आलेल्या सुमारे वीस हजार पाहुण्यांसाठी उभारलेले शामियाने, मंडप, राहुटया इत्यादि विविध प्रकारच्या वस्तूंनी रायगड हा खरोखर राजधानी म्हणून शोभू लागला. फार सुंदर दिसूं लागला.

या गडाचें रूप कांही आगळेंच. चहू अंगाला हजार हजार हात खोल सरळ ताशीव कडे, जणू अखंड एका दगडाच्या ताठ भिंतीच. तें पाहा टकमक टोक ! डोकावूं नका ! डोळे फिरतील ! केवढी भीषण खोल दरी ही ! पाताळच ! वरून जर माणूस निसटला तर - ! पण या टकमक टोकाचा उपयोग मुळी माणसांना वरून लोटून देण्यासाठी करीत ! स्वराज्याशीं हरामखोरी करणारे फितूर टकमक टोकावरून पाताळांत भिरकावले जात. या टकमक टोकाचा दरारा महाराजांच्या भवानीपेक्षाहि भयंकर होता.

अन् तें थेट पूर्वेला भवानी टोक. तें थेट पश्चिमेला हिरकणी टोक. त्याच्याच शेजारी तें श्रीगोंदें टोक. कैलासनाथाच्या कैलासासारखेंच रायगडचें शिखर आहे. कैलासावरून हिम निथळत असतो. रायगडावरून आनंद निथळत होता.

गंगासागर तलाव, कुशावर्त तळें, इतर स्वच्छ सुंदर टाकीं पाण्याने समृध्द होती. वारा भळाळत होता आणि महाद्वारावर भगवा झेंडा अविरत फडफडत होता. राज्याभिषेकाकरिता येणाया पाहुण्यांची आणि प्रजाजनांची या महाद्वारांतून रीघ लागली होती.

आईसाहेब पांचाडाहून गडावरती राहावयास आल्या होत्या. आयुष्यांत अनेक त-हेच्या प्रचंड उलथापालथी पाहून, मानसिक कष्टांची सीमा ओलांडून त्या या शिखरावर येऊन पोहोचल्या होत्या. त्यांचें शरीर आता अगदी जीर्ण झालें होतें. आयुष्याची वाट चालून त्या आता दमल्या होत्या. आता एवढा एकच अमृतसोहळा पाहण्यासाठी त्यांचे नेत्र खोळंबले होते. शिवबाच्या मस्तकावर छत्र धरलेलें पाहावें, शिवबाला सोन्याच्या सिंहासनावर बसलेला पाहावा, वेदमंत्रांच्या घोषांत शिवबाला अभिषेक झालेला पाहावा, त्याचा जयजयकार झालेला ऐकावा आणि डोळे मिटावेत, बस्स ! एवढीच आता आईसाहेबांच्या पंचप्राणांची इच्छा होती. आयुष्याच्या व्रताचें तेवढें उद्यापन पाहून खुशाल शांत चिरनिद्रा घेण्यासाठी त्यांचीं गात्रें खोळंबली होतीं.

आता राज्याभिषेकाचा मुहूर्त अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला. कामाधामांची गर्दी उडाली. सरदार, पेशवे, सरकारकून, मुत्सद्दी, महाराजांचे सर्व सखेसांगाती कमरा बांधून हालत झुलत होते. सर्व देवदेवतांना समारंभाची अक्षता गेली. महाराष्ट्राच्या भाग्याच्या, आनंदाच्या, परमोच्च सुखाच्या वैभवशाली सर्व शुभशकुनांनो या या ! महाराष्ट्राच्या आणि भारतवर्षाच्या देवदेवतांनो या ! सहकुटुंब सहपरिवार या ! श्रीमन्मंगलमूर्ति मोरेश्वरा ऋध्दिसिध्दीच्या नायका, विघ्नहरा, सर्वांआधी आपण या ! खंडेराया, घृष्णे वरा, पंढरीराया अवघे अवघे या ! हातचीं हजार कामें टाकून वेगें वेगें या !

महाराज प्रतापगडावर आले. भाळी मळवट लेऊन ती अष्टभुजा आदिशक्ति प्रसन्न स्मित करीत उभी होती. तिचा परमभक्त परमपराक्रमी शिवराज तिच्यापुढे हात जोडून नम्र होऊन आला. भवानीदेवीच्या तेजस्वी प्रेरणेनेच हें स्वराज्य निर्माण झालें होतें. महाराजांनी व त्यांच्या सैनिकांनी भवानीचा जयजयकार करीत करीतच आजवर प्रत्येक कार्यास हात लावला व विजय मिळवले. उभ्या महाराष्ट्राची ही कुलदेवता. महाराष्ट्रधर्मरक्षिका. महाराजांनी तिला दंडवत घातलें. नंतर यथाविधि षोडशोपचारें तिची महापूजा केली. सवा मणाचें सुवर्णछत्र तिला अर्पण केलें आणि मस्तक चरणीं ठेविलें.

गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकविधीसाठी स्वतः एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार केला होता. ‘राजाभिषेकप्रयोग’ हें या ग्रंथाचें नांव. राज्याभिषेकविधि कसाकसा करावयाचा, कोणकोणते धार्मिक संस्कार व समारंभ करावयाचे वगैरे गोष्टींची तपशीलवार शास्त्रीय माहिती गागाभट्टांनी अत्यंत दक्षतापूर्वक अभ्यासली होती. त्यानुसार आता धार्मिक विधींस प्रारंभ होणार होता. रायगडच्या महाद्वारावर तोरण चढलें. नगारे, शिंगें, चौघडे कडकडूं लागले. श्रीगणरायाची प्रतिष्ठापना झाली. तांदुळांत कुंकू मिसळलें गेलें. स्वस्तिक चिन्हें उमटलीं. गागाभट्टांनी गणरायास आवाहन केलें. श्रीमन्महागणाधिपतयेनमः! एकेका विधीस प्रारंभ झाला. पहिला विधी महाराजांचें मौंजीबंधन ! महाराजांची मुंज व्हायची राहिली होती, म्हणजे केलेलीच नव्हती ! कारण जरी भोसले क्षत्रियकुलोत्पन्न होते. तरी त्यांचे संस्कार लुप्त झाले होते. मुंजीशिवाय ब्राम्हणाला ब्राम्हणत्व आणि क्षत्रियाला क्षत्रियत्व प्राप्त होत नाही, म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज होणें जरूर होतें. गागाभट्टांनी मुंजीची तिथि ज्येष्ठ शुध्द चतुर्थी ही निश्चित केली होती. मुंजीसाठी देवदेवकाची प्राणप्रतिष्ठा, कुलधर्मकुलाचारादि विधि झाले.

मुंजीच्या दुसयाच दिवशीं (दि. ३० मे) सोयराबाई राणीसाहेबांचा महाराजांशीं समंत्रक विवाह झाला. लग्नांत थाट-समारंभ मात्र मुळीच करण्यांत आला नाहीं. नंतर सकवारबाईसाहेब व पुतळाबाईसाहेब यांचींही महाराजांशीं लग्नें झालीं. मुंजीप्रमाणेच आपल्या आई-वडिलांच्या लग्नाला हजर राहण्याचें गमतीदार भाग्य मुलांना लाभलें !

एकेका दिवशीं एकेक विधि होत होते. ऋत्विजवर्णन - पुण्याहवाचनपूर्वक यज्ञास प्रारंभ करून विनायकशांति करण्यांत आली. नक्षत्रशांती, गृहशांति, ऐंद्रियशांति, पौरंदरीशांति वगैरे विधि पार पडले. महाराज या कालांत व्रतस्थ होते. दुग्धपान व फलाहार करून ते अतिशय श्रध्देने प्रत्येक धार्मिक विधी यथासांग करीत होते.

ज्येष्ठ शुध्द एकादशीस (दि. ४ जून) महाराजांची सुवर्णतुला व इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचें ठरलें होतें. सोळा महादानांपैकी तुळादान हें एक आहे. या दिवशीं महाराजांची सुवर्णतुळा करण्यांत आली. तराजूच्या एका पारडयांत महाराज बसले. दुसयांत सोन्याचे होन घालण्यांत येत होते. ब्राम्हण मंत्र म्हणत होते. पारडीं समभार झाली. महाराजांची तुळा झाली. एकूण सतरा हजार होन लागले. म्हणजे महाराजांचें वजन पक्के दोन मण (१६० पौंड) होतें. या पारडयांत महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली व या सर्व धनाचा दानधर्म केला. सोन्याशिवाय चांदी, तांबें, कापूर, साखर, लोणी, फळें, मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यांत आली व ते सर्व पदार्थ दान करण्यांत आले.

ज्येष्ठ शुध्द १२ चा दिवस उजाडला. रायगडावरचा आनंद आणि गोड गडबड शिगेला पोहोचली. रायगड म्हणजे स्वर्गीय नगरी शोभूं लागली. दिवस संपून रात्र झाल्याचें भान तरी कोणाला राहिलें असेल का ? अंधार वगळला तर रायगडावरची रात्र दिवसासारखीच होती ! राजमंडळांतील सर्व लोकांना कामेंधामें इतकीं होतीं की, वेळ पुरत नव्हता. दुसयाच दिवशीं सूर्योदयास तीन घटका अवधी असतांना म्हणजे (पहाटे पांच वाजता) उषःकालीं महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. हा पहाटेचा मुहूर्तच महाराजांना ‘लाभत’ होता म्हणून गागाभट्टांनी तो निश्चित केला होता. राज्याभिषेक समारंभांतील प्रत्येक विधि अत्यंत अभ्यासपूर्वक, शास्त्रीय चिकित्सेने गागाभट्टांनी ठरविलेला होता व ते अत्यंत साक्षेपाने तो पार पाडीत होते.

मोठी पहाट झाली. दीपज्योत उजळल्या. चौघडा दणाणूं लागला. आकाशांत शुध्द द्वादशीचा चंद्र व तारकामंडळ ढगांच्या दाटींतून डोकावत होतें. मंगल वाद्यांचे निनाद रायगडावर कोंदले. सर्व स्त्रीपुरूषांची समारंभासाठी पहाटेच्या अंधारांत - छे - मशालींच्या व चिरागदानांच्या सुंदर केशरी उजेडांत गर्दी उडाली. कल्पनाच करा, सह्याद्रीच्या उंच उंच शिखरांच्या दाटींत, एका उत्तुंग शिखरावर, पहाटेच्या काळोखांत सहस्रावधि दिवे तेजाळत आहेत, वाद्यांचे प्रतिध्वनि भवतीच्या दयाखोयांत निनादत आहेत, कसें दिसत असेल तें दृश्य ? गरूडाच्या उंच घरटयांत आज गोड तारांबळ उडाली होती. शिंगांच्या ललकाया उठत होत्या. आज राजा शिवाजी राजराजेश्वर छत्रपति होणार होता.

राजमंदिरांत गागाभट्टांच्या, बाळंभट्ट राजोपाध्यायांच्या व इतर विद्वानांच्या मुखांतून वेदमंत्रांचा उच्चरवाने घोष सुरू झाला. महाराज व राजकुलांतील सर्व मंडळी लवकर उठून धार्मिक विधींसाठी सिध्द झाली. बाळंभट्टांच्या पौरोहित्याखाली महाराजांनी कुलदेवतांची पूजा केली. त्यांनी कुलगुरू म्हणून बाळंभट्टांचीहि पाद्यपूजा केली.

गागाभट्टांनी अभिषेकप्रयोगास प्रारंभ केला. ते व इतर महापंडित मंत्रघोष करूं लागले. पंचामृतस्नान व शुध्दोदकस्नान महाराजांना व महाराणीसाहेबांना घालण्यांत आलें. नंतर अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, सिंधु वगैरे सप्तगंगांच्या धारा महाराजांच्या मस्तकावरून, भालप्रदेशावरून, अंगाखांद्यावरून घळघळूं लागल्या. केवढा अपूर्व योग ! युगानुयुगे शेकडो थोर भारतीय राजांना स्नान घालणाया गंगायमुनांना आता असा कोणी राजाच भेटत नव्हता. सगळे नष्ट झाले होते. उरले होते ते सुलतानांचे गुलाम झाले होते. राज्येंच उरलीं नाहीत, तर मग अभिषेक कुठले ? पण दक्षिणापथांत हा एक स्वतंत्र राज्यसंस्थापक, प्रतापवंत राजा झाला. सप्तगंगा आनंदित झाल्या. या नद्यांच्या नांवांचा उल्लेख मंत्रांतून झाला, तेव्हां महाराजांनाही केवढी धन्यता वाटली असेल ! गंगे च यमुने चैव गोदावरि, सरस्वति ! नर्मदे सिंधु कावेरि -

- यांतील एकहि नदी स्वराज्यांत नव्हती ! सर्वजणी स्वराज्याच्या बाहेरून वाहत होत्या ! महाराजांच्या मस्तकावरून ओसंडतांना या सप्तगंगा महाराजांना काय म्हणाल्या असतील ? खरेंच, काय म्हणाल्या असतील ? - हे राजा तूं आम्हांला इतक्या प्रेमाने तुझ्या राज्याभिषेकाला बोलावून आणलेस; फार आनंदित झालों आम्ही. आम्ही माहेरीं आलों. पण राजा, तूं आम्हांला कायमचें मुक्त केव्हा करणार ? आम्ही पारतंत्र्यांत आहोंत रे !

अन् मग राजानेहि मुक्या बोलांनी या सप्तगंगांना वचन दिले असेल की, मातांनो, मी तुम्हांला मुक्त करीन ! मला आयुष्य अपुरें पडलें, तर माझा मुलगा आणि माझे वारसदार हें कार्य करतील ! माझ्या या राज्याचा जन्महेतूच तो आहे - तीर्थाची व क्षेत्रांची मुक्तता ! तुम्ही निर्धास्त असा !

सप्तगंगा हर्षभरे खळाळल्या. समुद्रोदकस्नान झालें. उष्णोदकाने स्नानें झालीं. वेदमंत्रांच्या प्रचंड घोषांत अमृताभिषेक पूर्ण झाला. उष्णोदकाचे कलश महाराजांच्या मस्तकावर रिते होऊं लागले. मंगल वाद्यें वाजूं लागलीं. पुढच्या अतिमहत्त्वाच्या उत्तरार्धाची गडबड सुरू झाली. पूर्वार्ध म्हणजे अभिषेक. उत्तरार्ध म्हणजे सिंहासनारोहण.

अभिषेक झाल्यावर लगेच राजाराणींना सुवासिनींनी ओवाळलें. कांशाच्या पात्रांत भरलेल्या तुपांत महाराजांनी आपलें मुखावलोकन केलें. नंतर शुभवस्त्रें व अलंकार धारण केले. वस्त्रालंकार अत्यंत मौल्यवान् अप्रतिम होते.

वस्त्रभूषणें धारण केल्यावर महाराजांनी आपल्या ढालतलवारीची व धनुष्यबाणांची पूजा केली व तीं शस्त्रें धारण केलीं. आता महाराज सिंहासनारोहणासाठी निघाले. राणी व राजपुत्रासह त्यांनी कुलदेवतांना नमस्कार केला. बाळंभट्टांना, गागाभट्टांना, ब्रम्हवृंदांना व वडीलधाया मंडळींना नमस्कार केला आणि ते आईसाहेबांस नमस्कार करावयास आले.

नंतर कोदंडधारी महाराज राजसभेकडे निघाले. सुवर्णदंड घेतलेले प्रतिहारी, अष्टप्रधान व चिटणीस यांच्यासह महाराज राजसभेंत प्रवेशले. राजसभेंत उत्सुक मनाने उभ्या असलेल्या हजारो लोकांचीं हृदयें आनंदाने भरून आलीं.

गागाभट्टांनी धार्मिक विधि केले. सर्व राजचिन्हें व राज्यचिन्हें सिंहासनाभवती झळकत होतीं. सोन्याचे अनेक भाले लखलखत होते. त्यांतील एका भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक सुंदर तराजू झुलत होता. दोन भाल्यांच्या टोकांवर मोठया दांतांचे सुवर्णमत्स्य लटकावले होते. कांही भाल्यांना अश्वपुच्छें बांधलेलीं होतीं व तीं भुरभुरत होतीं. अष्टप्रधान आपआपल्या जागीं उभे राहिले. राजसभेंत प्राचीन भारतीय संस्कृतीचा फार सुंदर अविष्कार झालेला दिसत होता. तसेच मुघली संस्कृतीचे नमुनेहि तेथे झळकत होते. भाल्यांच्या टोकांवर बसविलेलीं सर्व चिन्हें मुघली होतीं. सिंहासनावर असलेल्या अष्टस्तंभाच्या सुवर्णमंडपीचा डौल पूर्णपणे इस्लामी होता. एकूण राजसभेसह सिंहासनाचा थाट अत्यंत अप्रतिम होता. आणखी एक हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे सिंहासनाच्या अगदी समोर असलेल्या भव्य प्रवेशद्वाराकडे नजर टाकली की, दर्शन घडत होतें पूर्वक्षितिजावरील तोरणा आणि राजगड किल्ल्यांचे !

उषःकाल झाला. तोरणागडाच्या मागे पूर्वा उजळूं लागली. सूर्योदयास तीन घटका उरल्या. महाराज सिंहासनाच्या समोर आले. त्यांनी आपला उजवा गुडघा भूमीवर टेकविला व मस्तक लववून सिंहासनास वंदन केलें. नंतर ते पूर्वाभिमुख उभे राहिले. नगारे, चौघडे, शिंगें, कर्णे, हलग्या, शहाजणे, कालूसनया, ताशे, मर्फे इत्यादि तमाम वाद्यांचे ताफे आणि तोफाबंदुका कान टवकारून सुसज्ज झाल्या. सर्वांचें डोळे महाराजांच्या मूर्तीवर खिळले. हिंदवी स्वराज्याचा तो सुवर्णाचा, अमृताचा, कौस्तुभाचा, परमोच्च सौभाग्यक्षण उगवला. मुहूर्ताची घटका बुडाली. गागाभट्टांनी व इतर पंडितांनी परमोच्च स्वरांत वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला अन् त्या प्रचंड वेदघोषांत महाराज सिंहासनाला पदस्पर्श न होऊं देतां सिंहासनावर स्थानापन्न झाले ! आणि एकच महाकल्लोळ उडाला ! चौघडे, ताशे, नौबती इत्यादि तमाम वाद्यांनी एकच धुमधडाका उडविला. तोफा-बंदुकांनी दाही दिशा एकदम दणाणून सोडल्या. राजसभेंतील सहस्त्रवधि सभाजनांनी सोन्यारूप्यांच्या फुलांची, सुगंधी फुलांची, अक्षतांची, लाह्यांची महाराजांवर अविरत वृष्टि केली. हजारो कंठांतून एकच एक गर्जना उठली, शिवाजीमहाराज की जय ! शिवाजीमहाराज की जय ! शिवाजीमहाराज की जय ! टाळी कडाडली. नृत्यांगना नाचूं लागल्या. गायक गाऊं लागले. वाद्यें वाजूं लागलीं. कवि, भाट, चारण स्तुतिगीते गाऊं लागले. तोफा-बंदुकांची सरबत्ती सतत चालू राहिली. स्वराज्यांतील सर्व किल्लोकिल्लीं याचवेळीं तोफांचा दणदणाट सुरू झाला. सारें स्वराज्य आनंदाने धुंद झालें. त्या जयजयकाराने दिल्लीच्या कानठळया बसल्या ! विजापूर बधीर झालें ! फिरंग्यांची झोप उडाली ! रूमशामपावेतो दख्खनच्या दौलतीच्या नौबती ऐकूं गेल्या. राजसभा देहभान विसरली होती. कोणत्या शब्दांत सांगूं हें सारें ? आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुध्द १३, शनिवारीं, उषःकालीं पांच वाजतां महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले !

लगेच सोळा सुवासिनी व सोळा कुमारिका हातांत पंचारत्यांचीं ताटें घेऊन सिंहासनापाशी आल्या. त्यांनी महाराजांना कुंकुमतिलक लावून ओवाळिलें. सुवासिनींच्या व कुमारिकांच्या रूपाने जणू अवघ्या स्त्रीजातीने महाराजांना ओवाळलें व आपला आदर, प्रेम, कौतुक, कृतज्ञता आणि आशीर्वाद व्यक्त केला. या सुवासिनींना व बालिकांना महाराजांनी वस्त्रें व अलंकार दिले. नंतर, मोत्यांची झालर लावलेलें, रत्नजडीत राजछत्र गागाभट्टांनी हातांत घेतलें व महाराजांच्या मस्तकावर धरलें ! आणि गागाभट्टांनी उच्च स्वरांत घोषणा केली की, महाराज शिवाजीराजे आज छत्रपति झाले ! छत्रपति ! राजा शिवछत्रपति ! क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपति की जय ! जय ! जय !

Site Designed and Maintain by Net Solutions