शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
श्री. आप्पा परब

शिवाराजाभिषके समयीचे मंचकारोहण आणि सिंहासनारोहण हे दोन्ही निधी निरनिराळे आहेत. मंचक म्हणजे चौरंग आणि सिंहासन म्हणजे राजदरबारांतील उच्चासन. शिवराजाभिषेक समयीचे सर्व मंगल धार्मिक विधि मंचकावर झाले. राजाभिषेकहि मंचकावर झाला आणि शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरोहण केलें; आणि पुनश्च सिंहसनावरून अवरोहण केलें. नंतर धर्मशास्त्रानुसार कांही लौकिक कार्यक्रम झाले. हें सर्व इंग्रजी कालगणनेअनुसार शुक्रवार ५ जून १६७४ रोजीं प्रथम ऐन्द्रीशांतीचे मुख्य कार्य संपविलें. अयुक, सहस्त्र किंवा शत ब्राह्मणभोजन झालें व कर्म संपूर्णता वाचली. हे सर्व विधी सपत्निकच झाले. नंतर मुख्य राजाभिषेकविधीस प्रारंभ झाला. शुक्रवारी २२ घटिका ३५ पळें द्वादशी होती. त्रयोदशीचा मुहूर्त असल्याने सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा धार्मिक विधी चालला. राजाभिषेक, सिंहासनारोहण व राजदर्शन असे तीन समारंभ त्रयोदशीस झाले. त्रयोदशी शनिवार ६ जून १६७४ रोजी घटिका ४९ पळेपर्यंत होती. म्हणजेच शुक्रवार ५ जूनचा सूर्य उगवल्यानंतर सरासरी दुपारी ३ वाजेपर्यंत द्वादशी होती. दुपारी ३ नंतर त्रयोदशी लागली. ती सरासरी ५ जूनच्या रात्रौ ११ वाजेपर्यंत व पुढे ही होती. ती सरासरी ६ जूनच्या दुपारी ३ वाजेपर्यंत त्रयोदशी होती. मुहूर्त कालावधी ४८ मिनिटांचा म्हणजे दोन घटकांचा असतो. शिवराजाभिषेकाचा मुहूर्त २ घटकांचा होता.

१) श्रीशिवराजाभिषेक प्रयोग - गागाभट्ट.
२) राजधर्मकौस्तुभः - अनंतदेव
३) श्रीसिध्दांतविजय ग्रंथांतील राज्याभिषेक प्रयोग. परिशिष्ट - प्रकाशक महादेव गणेश डोंगरे.
४) श्रीराज्यभिषेक पध्दती - उका व्यास.
५) राज्यभिषेक - संपादक काशिनाथ लक्ष्मण उर्फ भाऊसाहेब लेले.
६) श्रीमंत महाराज प्रतापसिंहराज गायकवाड राज्याभिषेक ग्रंथ.
७) श्रीमुकूटाभिषेक महोत्सवः - नारायणशास्त्री.

हे सात ग्रंथ राजाभिषेक विधिची माहिती देणारे मुद्रित स्वरूपांत उपलब्ध आहेत.
याशिवाय अमुद्रित पोथ्यांतील राजाभिषेक प्रकरणें पुढील प्रमाणें आहेत -

१) नीलकंठभट्टाच्या नीतियुस्व यांतील राजाभिषेक प्रकरण.
२) अनंतदेवाची राजाभिषेक पध्दति.
३) टोडरानंदातील ‘राज्याभिषेक’.
४) दिनक्ररोद्योतांतील ‘राजाभिषेक पध्दति’.
५) अनंताचा ‘राजाभिषेक’.
६) शिवविश्वकर्मायाची ‘राज्याभिषेक पध्दति’.
७) कमलाकरभट्टाची ‘राज्याभिषेक पध्दति’.
८) रघुनाथ माधवाची ‘राज्याभिषेक पध्दति’.

हीं आठ ‘राजाभिषेक’ प्रकरणें आहेत. यांतील कांही प्रतींवरी ‘राज्याभिषेक’ म्हणून उल्लेख असला तरीं पोथींतील शब्दप्रयोग ‘राजाभिषेक’ असाच आहे.

अनंतदेवभट्टाच्या प्रयोगाखेरीज उपलब्ध झालेले इतर प्रयोग लहान असून त्यांतील विधि एकाच दिवसाचा आहे. सिंहासनारोहणाची पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने ती रचना आहे. अशा कार्याला मराठी इतिहासांत ‘मंचकारोहण’ म्हणून संबोधले आहे.
गागाभट्टांच्या व अनंतदेवभट्टांच्या रााजभिषेकविधि प्रयोगांतील तपशिलांत बरेंच साम्य आहे. कदाचित् या गुरूबंधूनीं हा प्रयोग एकत्र बसून तयार केला असावा असें भाषेच्या व प्रयोगाच्या सारखेपणावरून वाटतें. मात्र अनंतदेवभट्टांनी हा विस्तार आपल्या ‘राजधर्मकौस्तुभ’ यांत प्रकरणवारीनं विभागला असून त्याची विषयवारीनें मांडणी केली आहे. उलट गागाभट्टांनी आपल्या ‘श्रीशिवराजाभिषेक प्रयोग’ यांत त्यांतील निरनिराळे विधी दिनवारीनें सात दिवसांत जसे करावयाचे होते, तसे शिवाजी महाराजांच्या मुख्य पुरोहितांच्या मार्गदर्शनार्थ लिहून काढलेले आहेत. अनंतदेवभट्टांचे राजाभिषेकाच्या पौराणिक मंत्रांचे स्वतंत्र प्रकरण आहे. परंतु त्यांतील कांहीहि गागाभट्टांनी न घेतल्यामुळें “श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः” पूर्णपणे वैदिक आहे.

गागाभट्टकृत श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः पोथींत ज्येष्ठ शुध्द ६ शनिवार शके १५९६ : ३० मे १६७४ रोजी झालेल्या पहिल्या दिवसाच्या विधींत शिवरायांचा उल्लेख पुढील प्रमाणे आलेला आहे.-अतिसृष्टो द्वेष्टया योऽस्मान्द्वेष्टि यं च वयं द्विष्मः । शिववर्मणः च दातुः।

पुनश्च ज्येष्ठ शुध्द ७ रविवार शके १५९६ : ३१ मे १६७४ रोजी झालेल्या दुसऱ्या दिवसीच्या विधींत शिवरायांचा उल्लेख पुढील प्रमाणे आला आहे. ब्रह्मचारिणं शिववर्मणः कामाभिमं राजा राजाभिषेकं संवर्ध्दय वैश्रवणाय राज्ञे नमः।

यावरून गागाभट्टकृत श्रीशिवराजा-भिषेकप्रयोगः ही पोथी गागाभट्टानीं श्रीशिवरायांच्या राजाभिषेक कार्यासाठींच तयार केलेली होती.

शके १५९६ आनंद संवछरे जेस्ष्ट शुध १२ शुक्रवार घटी २१ पळे ३४ वि ३८/४० मी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हां राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ. १० रबिवलवल सु॥ खमस सबैन अलफ. असे जेधे शकावली सांगते.

शके १५९६ आनंदनाम संवत्सरे जेष्ठ शु. ॥ द्वादसी राज्याभिषेक सिव्हासनारूढ जाले. असे शिवापूर दप्तरांतील यादी सांगते.

शके १५९६ आनंदनाम संवत्सरे जेष्ठ शु ॥ १२ शुक्रवारसर २९॥०३४ विष्कंभ ३८॥-४-सि ४२ तीन घटिका रात्री उरली तेव्हा सिवाजी राजे सिंहासनी बैसले. छ १० रौबलै सु॥ खमस सबैन अलफ. असें शिवापूरकर देशपांडे वहीतील शकावली सांगते.

शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ मासीं, शुध्द १३ मुहुर्त पाहिला. असे शिवचरित्र आद्य बखरकार सभासद सांगतो.

शकावलीतील नोंदी सिंहासनारोहणाचा मुहुर्तकाल निरर्शित करतात. शकावलींतील नोंद सूर्योदयात् तिथिगणननें दिली आहे. पंचांगांत हि पध्दति स्विकारलेली असते. ज्योतिषशास्त्रानुसार मुहूर्त चंद्र - सूर्य यांच्या राशी नक्षत्राच्या गतीवरून मोजतात व दर्शवितात. मध्यरात्रीनंतर ३ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत ब्राह्म मुहूर्त असतो; आणि ५ वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत गर्गाचार्यांचा मुहूर्त असते. तिनसांजेला गोरज मुहूर्त असतो. पण शुभकार्यास्तव शुभमुहूर्त ज्योतिष शास्त्रानुसार काढावा लागतो.

पळ - २४ सेकंद. अडीच पळे - मिनीट. साठ पळे - घटका. अडीच घटका - तास. ६० घटका - दिवस. प्रहर - तीन तास. आठ प्रहर - दिवस. मुहूर्त - ४८ मिनिटे कालावधी.

शिवराजाभिषेक विधि शुक्रवारी सकाळीं व सायंकाळी झाला ; व तो रात्रभर चालला. शनिवार पहाटे सिंहासनारोहण विधि झाला. वरील स्पष्टीकरणानें इतिहास लेखकांच्या लहिण्यांत द्वादशी आणि त्रयोदशी व शुक्रवार व शनिवार यांचा घोटाळा कां होत आहे; हे कळेल. वास्तविक हा कालदर्शन पध्दतीचा फरक आहे. मूळ प्रसंगाच्या कालाचा नाही.

शके १५९६ आनंद संवत्सरे ज्येष्ठ शुध्द द्वादशी शुक्रवार ५ जून १६७४. सकाळी ऐन्द्रीशांति उरकल्यानंतर सायंकाळी, त्रयोदशीस राजाभिषेकविधीस प्रारंभ झाला. प्रथम गणेश पूजन, स्वास्तिवचन, मातृकापूजन, वसोध्दारापूजन झाल्यानवर नांदीश्राध्द, नारायणपूजन व आज्य होम केला. आज्याहुति दिल्यानंतर राजाभिषेकविधीस प्रारंभ झाला. जयमान सपत्नीक आल्यानंतर मंडपपूजा झाली. महावेदीभोंवती प्रत्येक दिशेस चार चार कुंभ स्थापिले. पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजतकुंभ, पश्चिमेस ताम्र कुंभ व उत्तरेस मातीचे कुंभ ठेवून त्यांतील एकेकांत घृत, दुग्ध, दधि व जल भरलें. पूर्वेच्या इतर कुंभांत फक्त मधु व इतरांत जल भरलें. ते कुंभ पल्लवपुष्पांनीं सुशोभित करून त्यांच्या गळयास वस्त्रवेष्टन करून ठेविलें. औंदुबरशाखांची आसंदी केली होती, ती स्थापिली. त्याशिवाय अनेक नद्यांच्या व सागारांच्या पाण्यांचे कुंभ व रत्न, गंध, पुष्प, फल इत्यादी औषधीपूर्ण जलांचे कुंभ जवळ ठेविले. नंतर महावेदीवर अग्नीची व ग्रहांची प्रतिष्ठा केली. मृदांची व कुंभाचीहि विधीपूर्ण प्रतिष्ठा केली. त्यानंतर सर्वप्रधान होम केला. या होमाचे प्रसंगी सर्व वेदीय व शाखीय ब्राह्मणांनी वेदमंत्राचा घोष केला. जापकानीं जप व द्वारपाळांनी द्वारजप (जयघोष) त्याचवेळीं केला. या सर्वांच्या जागा प्रथम नेमून दिल्या होत्या व कोणी कोणते मंत्र म्हणावयाचे तेंहि ठरवून दिलें होतें. अशा तऱ्हेनें पूर्वाहुति दिल्या. नंतर यजमान अभिषेकशाळेंत गेले. सुगंधी तैलें व चूर्णे यांनीं व उष्णोदकानीं यजमानांचे समंत्र स्नान झालें. नंतर यजमान शुक्ल वस्त्र गंधामाल्यादि लेऊन पीठावर आले. निरनिराळया मृदा मंत्रघोषांत त्यांस तेथें लाविल्या. नंतर पंचामृत स्नान घातलें. पुन्हां यजमान शुक्ल वस्त्रगंधानुलेपन करून वेदमंत्र मंगलघोषांत मंडपांत आले. वेदीवर प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर दोन गुडघे ठेवून (तळपाय लागूं न देतां) विधीपूर्वक आरोहण केले. हे विधीयुक्त मंचकारोहण होते. नंतर राजे यांस अभिषेकास सुरूवात झाली. तेथें आचार्य सांवत्सरपुरोहीतांनी समंत्र अभिषिंचन केलें. नंतर आसंदीखाली उतरून अग्निसमीप येऊन प्रार्थना केली. तेथून आभिषेकशालेंतील सुवर्णसिंहासनावर आरोहण केलें. हें विधीयुक्त सिंहासनारोहण होतें. आशय हा कीं, आसंदीवर इंद्र म्हणून केलेल्या अभिषेकाने प्रति इंद्र झालेला राजा सिंहासनास्थ केल्यानंतर इतर ब्राह्मणामात्यादि मंडळीनीं त्यांस आपला राजा मानून तेथून पुन्हा मंगलघोषांत अभिषेकशालेंत नेण्याकरितां ते त्यांचे समीप आले. तेथून ब्राह्मणामात्यानीं राजे यांचा हात धरून व -

महते क्षत्राय महते अधिपत्याय महते जानराज्यायैष वो भरता राजा समोऽस्माकं ब्राह्मणानां राजा!

असें बोलत पुन्हां समंत्रघोषांत निरनिराळया उदकांनी अभिषिंचन करण्याकरितां अभिषेकशालेंत घेऊन गेले. तेथें निरनिराळया कुंभांतील उदकांनी यथाक्रमें अभिषिंचन करितांना त्या सर्वानीं पुन्हा शिवाजीमहाराजांना त्यांच्या मातापित्याच्या नांवसह संबोधून -

इमं देवा असपत्नं सुवध्यं महते क्षत्राय महते ज्येष्ठाय महते राजावराजस्योंद्रियाय .... विषएष वोमी राजा सोमो अस्माकं ब्राह्मणानां राजा.....

असा घोष केला. नंतर इतर अनेकविध मंत्रघोषांत अभिषिंचन झाले.

या अभिषिंचनांत सर्व वर्णांनी एकत्रित भाग घेतला होता. नंतर पुत्रवंती सुवासिनींनी ओवाळिलें. पुन्हा स्नान झालें. कास्यपत्रांतील घृतांत मुखावलोकन केल्यानंतर ब्राह्मणांस दक्षिणा व अमात्यास गो-अश्व-भूमि-सुवर्णादि अपरिमित देऊन वस्त्रालंकार लेऊन राजे मंडपांत आले. तेथून आचार्यांबरोबर रथाजवळ गेले. रथविषयक समंत्र विधीनंतर, स्थावर सविध ध्वज व छत्र स्थापिलें. अश्वविषयक मंत्रांनंतर बसून तो चालविला. नंतर मंत्रित धनु धारण करणें वगैरे विधि संपल्यावर रथ परत आणला. अश्वविषयक मंत्रानंतर राजे मंडपांतील वेदीवर येऊन तेथें सुवर्णासनावर आरूढ होऊन अक्षक्रीडेनंतर शयनगृहांत गेले.

बहुदा या समयास शुक्रवार रात्रीचा दुसरा प्रहर संपला होता. म्हणजे रात्रीचे बारा वाजले होते. त्रयोदशी तिथी चालूच होती.

शुक्रवार रात्रीचा चौथा प्रहर चालू झाला. त्रयोदशी तिथी चालूच होती. ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे ३ वाजता -

पहाटे महाराज सभामंडपांतील सिंहासनाजवळ आले. त्यावर “वृषमार्जाचद्विपिसिंहाव्याघ्रचर्मे” घालून ते आच्छादित केले होते. मधुर्कादि मंत्र व मंगलवाद्यघोषांत सिंहासनावर आरूढ झाले. दरबारांत अथवा सभामंडपांत अमात्या, पौर, नैगम, पंडित, वाणि आदी लोक उभे होते. त्यांना दर्शन दिलें. तेव्हां सांवत्सरपुरोहितांनीं शिवरायांचा मातृपितृवंशपरंपरेंत उल्लेख करून जमलेल्या त्या सर्व मंडळीनां “तो क्षत्रिय राजा अभिषिक्त केल्याचे” घोषित केले. तेव्हां ब्राह्मणपुरोहितामात्य वगैरेनीं राजांना प्रणामपूर्वक नजरनजराणे दिले. शिवरायांनीहि त्यांस वस्त्रें, सुवर्ण, भुमि वगैरे महादानें दिलीं. नंतर सशस धनु घेऊन मंडपास प्रदक्षिणा घातली. गुरूंस नमन केलें. सवत्स धेनूंची पूजा केली. अश्वांची व गजांची समंत्र पूजा केली. गजावर बसून नगरास प्रदक्षिणा घालून देवालयांत जाऊन देवाची पूजा केली व स्वगृहांत गेले..... येथें धार्मिक विधि संपला.

येथवर गागाभटकृत श्रीशिवराजाभिषेक प्रयोगः या पोथीतील धार्मिक विधि संपला. पोथीअनुसार राजाभिषेक विधि सात दिवस चालू होता.

शके १५९६ आनंदनाम सवंत्सरे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शनिवार ६ जून १६७४. सकाळी ७ - ८ च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी पहिला दरबार भरवून व सिंहासनावर पुन्हा आरोहण करून सर्वांस दर्शन दिलें.

१) औदुंबरशाखांची आसंदी केली होती. २) वेदीवर प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर दोन गुडघे ठेवून (तळपाय लागूं न देतां) विधीपूर्वक आरोहण केले. ३) आसंदीखाली उतरून अग्निसमीप येऊन प्रार्थना केली. ४) आशय हा कीं, आसंदीवर इंद्र म्हणून केलेल्या अभिषेकानें प्रति इंद्र झालेला राजा.....
ही औंदुबरशाखांची आसंदी म्हणजे मंचक होय.

१) तेथून अभिषेकशालेंतील सुवर्ण सिंहासनावर आरोहण केलें.हे सुवर्णसिंहासन म्हणजे मंचक होय.

१) अश्वविषयक मंत्रांनंतर राजे मंडपांतील वेदीवर येऊन तेथें सुवर्णासनावर आरूढ होऊन....हें सुवर्णासन म्हणजे मचक होय.
१) पहाटे महाराज सभामंडपांतील सिंहासनजवळ आले.हें सिंहासन म्हणजे राजदरबारांतील उच्चासन होय.
२) मधुपर्कादि मंत्र व मंगलवाद्य घोषांत सिंहासनावर आरूढ झाले.
१) सकाळीं ७ - ८ च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी पहिला दरबार भरवून व सिंहासन पुन्हा आरोहण करून सर्वांस दर्शन दिलें.हे सिंहासन म्हणजे राजदरबारांतील उच्चासन होय.

स्थान निर्देश

मंडप - किल्ले रायगडच्या बालेकिल्ल्यातील मोकळया उघडया दरबार प्रांगणावर घातलेला मंडप.
महावेदी - किल्ले रायगड निर्मिती समयीं प्रथम पूजाविधि केलेल्या उत्तुच्च खडक, पुढे बालेकिल्ला निर्मितानां महाराजांच्या वास्तव्य महालाच्या ईशान्य दिशेस आला. तो दरबार प्रांगणांत तसाच राखला. त्याला चहुंबाजूनीं साकारून त्या व्यासपीठावर महावेदी केली.
अभिषेकशाला - महाराजांच्या वास्तव्य महालाच्या वायव्य दिशेस असलेले स्नानगृह.
पीठ - ईशान्य दिशेस असलेल्या त्या खडकावरील व्यासपीठ.
शयनगृह - महाराजांच्या वास्तव्य महालांतील शयनकक्षा.
सभामंडप - मंत्रगृहासमोरील मंडप.
मंडपास प्रदक्षिणा - मंडपांत उपस्थित असलेल्या आश्रितांचे आपण रक्षणकर्ते असल्याचे शिवरायांनी दर्शविलें.
नगरास प्रदक्षिणा - राजगडनगरांतील रयतेचे व स्थावर - जंगम मालमत्तेचे आपण रक्षणकर्ते असल्याचे शिवरायांनी दर्शविले.
देवालय - किल्ले रायगडावरील दैवत मंदिरें.
स्वगृह - बालेकिल्ल्यांतील शिवरायांचा महाल.

(इतिहास संशोधक श्री. वा. सी. बेंन्द्रे संपादीत गागाभट्ट विरचित ‘श्रीराजाभिषेप्रयोगः’ या पोथीवरून उपरोक्त लिखान संकलित केलेलें आहे.)

Site Designed and Maintain by Net Solutions