शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही
अभिनव वैज्ञानिक प्रयोग
श्री. प्र. के. घाणेकर

दुर्ग दुर्गेश्वर रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानी ! “दुर्गम इति दुर्गः” हे वचन खरं मानायचं, तर रायगड म्हणजे स्वराज्याचं हृदय. तेव्हा तिथं जाणं, हे सर्वसामान्यपणे प्रायः अशक्यच असायला हवं, ते तर तसं आहेच. पण इतर शिवनिर्मित किल्ल्यांप्रमाणे येथेही दुर्गबांधणीत काही रचना विशेष विचार करून केलेल्या दिसतात.

शिवकालात रायगडावर आलेल्या परकीय-पाश्चात्य प्रवाशांनी रायगडाच्या दुर्गमत्वाबद्दल काही लिखाण केलेलं दिसतं. शिवकालोत्तर कालखंडातसुध्दा रायगडाच्या कठिणपणाबद्दल अनेक लिखाणात उल्लेख मिळतात. एका शिवशाहीरानं तर, “..... एक वेळ सीतेच्या हृदयामध्ये रावणाला प्रवेश मिळेल, पण रायगडच्या अभेद्य तटबंदीतील महाद्वारातून शत्रू सैनिकांच पाऊल आत पडणं अशक्य .....” अशा समर्थ शब्दात रायगडाचं दुर्गमत्व शब्दबध्द केलं आहे.

पण तरीही रायगडाचे दुर्गमत्व नेमकं कशात आहे किंवा हे दुर्गमत्व रायगडाला कशामुळे प्राप्त झाले आहे ? याचा उलगडा करणारं फारसं लिखाण मात्र उपलब्ध नाही. इतर सर्व दुर्गरचनाकारांपेक्षा काहीतरी वेगळं असं दुर्ग स्थापत्य सर्वच शिवनिर्मित दुर्गांप्रमाणे रायगडावरही आढळतं. विशेष विचार करून वापरलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान, असं मी मानतो. त्यामुळे बांधकाम, बांधकामाची रचना, आदी गोष्टींमध्ये काही निश्चित वैज्ञानिक विचार लक्षात घेऊनच याप्रकारची बांधकामे झालेली आहेत. श्रीशिवछत्रपतींचे ‘दुर्ग विज्ञान’ समजावून घेणे व त्याचा परिचय इतरांना घडवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
महादरवाज्यासमोरील कडयामधील टाकी

कोणत्याही किल्ल्यावर पाणी अतिशय महत्त्वाचे, “..... पाणी बहुत जतन राखावे .....” हे रामचंद्रपंत अमात्य लिखित “आज्ञापत्र” ह्या पुस्तकातील वाक्य अतिशय महत्त्वाचे. पाऊस हाच काय तो पाण्याचा एकमेव स्त्रोत. पावसाचे पाणी जमिनीवर पडले की ते जमिनीत मुरते किंवा उताराकडे वाहून जाते. मुरलेले पाणी मिळवण्यासाठी पाण्याची टाकी खोदणे आणि वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तलाव बांधणे ह्या गोष्टी मध्ययुगातील किल्ल्यांवर सर्रास आढळतात.

पाण्याचा उपयोग गडावरील बांधकामासाठी, किल्ल्यावरील झाडांना घालण्यासाठी, गडावरील घोडे - हत्ती - गायी आदी प्राण्यांसाठी, किल्ल्यावर राहणाऱ्या गडकऱ्यांना पिण्यासाठी - आंघोळीसाठी - कपडे धुण्यासाठी - भांडी स्वच्छ करण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी होत असे.

रायगडाच्या महादरवाज्यातून आत शिरले व उजव्या हातास नजर टाकली की, ५-५० मीटर उंचीचा कडयाचा भाग दिसतो. या कडयात २-४ टाकी आहेत. पण तिथवर जाणं दुरापास्त आहे. त्यामुळे ह्या टाक्यातील पाण्याचा दैनंदिन उपयोगासाठी वापर करणं अशक्यच आहे. कारण हे पाणी रोजच्य वापरासाठी उपयोगात आणण्यासाठी नाही.

‘रायगडची जीवनकथा’ ह्या श्री. शांताराम विष्णू आवळसकर लिखित ग्रंथात (१९६२) पृष्ठ १३४ वर एक महत्त्वाचा उल्लेख आढळतो. तो असा, “..... इ. स. १७८७ मध्ये रायगडावर मुसळधार पाऊस पडून महादरवाजावरील हौद रात्रीचे वेळी फुटला व पाण्याचा लोंढा वाहू लागला. दरवाजा उघडून पाण्यास वाट देणे अशक्य झाले. मोऱ्या ठेवल्या होत्या, त्या तुंबल्या व पाणी जाईना. .....” परंतु हा प्रसंग निस्तरला. दरवाजा व इतर बांधकाम शाबूत राहिले.

शिवछत्रपतींचे पिताश्री शहाजीराजे भोसले यांनी आपल्या लष्करी कारकिर्दित भातवडी येथे बंधारा फोडून शत्रू सैन्याची दाणादाण उडवल्याची गोष्ट, त्यांच्या निश्चितपणे स्मरणात असणार.

या सर्व गोष्टींची तार्किक सुसंगती लावली, तर ही गोष्ट स्पष्ट होते की, काही कारणांमुळे शत्रूचे सैनिक रायगडाच्या महाद्वारातून आत शिरलेच, तर ही टाकी फोडायची. पाण्याचा लोंढा कडयावरील गवत - माती - राडारोडा - झाडझाडोरा घेऊन खाली जाईल. हा मलबा आणि टाक्यातील पाणी यांचा खूप चिखल होईल. तेथे शत्रूला साधी हालचाल करणे अशक्य होईल. पाण्याच्या लोंढयात काही शत्रूसैनिक वाहूनही जातील. आणि मुख्य म्हणजे अशा अचानक येणाऱ्या पाण्याच्या लोंढयाची अन् तयार होणाऱ्या चिखलाची शत्रूला कल्पनाच नसल्याने, तो गोंधळून तर जाईलच. पण अजून पुढचा चढाईचा टप्पा पार करताना व पार केल्यावर आणखी किती अकल्पित संकटांशी सामना करावा लागणार आहे? या काळजीने शत्रूचे मनोधैर्यही खचेल.

मानसशास्त्रीय दबाव आणून शत्रूला जेरीस आणण्याचा हा एक कौतुकास्पद प्रयत्न मानावा लागेल. टाक्यांमध्ये साठविलेल्या पाण्याचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी उपयोग करणारा शिवाजी हा पहिला आणि बहुदा एकमेव राजा असावा !
शिवनिर्मित किल्ल्यांची आणखी काही वैशिष्टये

शिवाजी महाराजांच्या ताब्यात जरी सुमारे ३५० हून अधिक किल्ले असले, तरी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची संख्या १५-२० च्या वर जात नाही. यातील डोंगरी किल्ल्यांवर काही सामायिक गोष्टी आढळतात. त्यामध्ये डोंगराच्या दोन तृतीयांश उंचीवर किल्ल्याची पहिली तटबंदी असणे, महादरवाज्याची गोमुखी रचनेची बांधणी, गडाचे महाद्वार दर्शनी नसणे, महाद्वारासमोर चढणीच्या मार्गावर छोटया व अरूंद पायऱ्या असणे, महादरवाज्यापुढे दोन बुरूजांच्या कवेत येणारा अरूंद मार्ग असणे आणि गडाच्या महाद्वारापर्यंत पोहोचण्याआधी चढणाऱ्याच्या उजव्या हाताला डोंगरावरील तटबंदीवरून लहान मोठे दगड, बाण, भाले, बंदुकांच्या गोळया यांचा मारा करण्याची सोय असणे.

ही सारी वैशिष्टये रायगडाबाबतही वापरलेली आढळतात. त्या साऱ्यांचा अधिक तपशीलासह उहापोह माझ्या “अथातो दुर्गजिज्ञासा” आणि आगामी “शिवरायांचे दुर्ग विज्ञान” ह्या पुस्तकात केलेला आहे.

शिवाजी महाराजांनी केवळ दगडावर दगड ठेवून किल्ले उभारले नाहीत, तर त्या दुर्ग बांधणीत वेगवेगळे वैज्ञानिक निकष वापरून, खास दुर्गरचना केल्या आहेत. किल्ले बांधणीत असे प्रयोग फक्त श्रीशिवछत्रपतींनीच केलेले आढळतात. हा वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा आमचा शिवाजी राजा अलौकिकच मानावा लागेल. शिवरायांची विज्ञाननिष्ठा आपण आवर्जून सर्वांपुढे मांडली पाहिजे.

Site Designed and Maintain by Net Solutions