शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
श्री. गोपाळ चांदोरकर

सभासद बखरीत एकूण वरप्रदानासंबंधीचे नऊ उल्लेख आहेत. त्यांतील पहिला उल्लेख श्री. मालोजी राजांसंबंधाने आहे.
दुसरा उल्लेख श्री. शहाजी राजांसंबंधाने आहे.
पुढील सात उल्लेख हे छत्रपति शिवाजी महाराजांसंबंधाने आहेत. ते खालीलप्रमाणे.

१) अफजलखान प्रकरणी
२) अफजलखान प्रकरणी
३) अफजलखान प्रकरणानंतर
४) शाहिस्तखान प्रकरणी
५) मिरजा राजे जयसिंग प्रकरणी.
६) अऱ्यातील कैदेत.
७) संभाजी राजे दिलेरखानाकडून परत आले त्या संबंधाने.

श्री भवानीमातेने महाराजाना भवानी तलवार भेट म्हणून दिली या सर्वपरिचित गोष्टीचा मात्र उल्लेख नाही.

साठ वर्षापूर्वी मुंबईतून “लोकसत्ते” प्रमाणेच “लोकमान्य” हे दैनिक प्रसिध्द होत असे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते बंद पडले. लोकमान्यचे संपादक श्री. पां. वा. गाडगीळ हे होते. श्री. पां. वा. गाडगीळ हे विद्वान तसेच अभ्यासू होते. ते समाजवादी विचारांचे होते. त्यांनी लोकमान्यमध्यें या भवानी तलवारीसंबंधानें दोन लेख लिहिले. गाडगीळ हे समाजवादी विचाराचे असल्यामुळें त्यांनी त्या दृष्टीने लेख लिहिले होते.

छत्रपति शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब प्रचंड फौजफाटा घेऊन दक्षिणेत आला. छत्रपति संभाजी महाराज मारले गेले. राजधानी रायगड मोंगलांचे हाती पडली. महाराणी येसूबाई व बाल शिवाजी (शाहूराजे) औरंगजेबाच्या कैदेत पडले. स्वराज्याला राजधानी नाही खजिना नाही. प्रधान मंडळ नाही. अशा बिकट परिस्थितीत छत्रपति राजाराम महाराजांपुढे एकच मार्ग होता तो म्हणजे महाराष्ट्र सोडून जिंजीस जाणे. पण सर्व मुलुख मोंगली सैन्याने व्यापला होता. अशा बिकट परिस्थितीत राजाराम महाराजांना देवीने स्वप्नात येऊन सांगितले कीं, “लेकरा तू जिंजीस जा मी तुला सुखरूप पोहचविते चिंता न करावी”. या गोष्टी आहेत तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या आधुनिक काळांतील विचारसरणीप्रमाणे या गोष्टींमागील अर्थ समजणे व समजावून घेणे अवघड आहे.

कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रांत म्हणतो.

विजिगीषुः परग्राममवाप्तुकामः सर्वज्ञ दैवतसंयोगख्यापनाभ्यां स्वपक्षमुध्दर्षयेत् परपक्षं चोद्वेजयेत् - १३-१-१
अर्थ :- शत्रूची तटाच्या आंत असलेली राजधानी काबीज करावयाची असल्यास विजिगीषूने आपले सर्वज्ञत्व आणि आपला देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी जाहीर करून स्वतःच्या लोकांना उल्लसित करावे व शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे.

यंत्रैरूपनिद्योगैसर््तीक्ष्णैव्यासक्तधातिभिः।
मायाभिर्देवसंयोगैः शकटैर्हस्तिभीषणैः॥
१० - ६ - ४८

दूष्यप्रकोपैर्गोयूथैः स्कन्धावारप्रदीपानैः।
कोटीजघनघातैर्वा दूतव्यंजनभेदनेः॥ १० - ६ - ४९

‘दुर्ग दग्धं हतं वा ते कोपः कुल्यः समुत्थितः।
शत्रुराटविकोवे’ ति परस्योद्वेगमाचरेत्॥
१० - ६ - ५०

अर्थ : यंत्रांच्या द्वारा गुह्य प्रयोग करून दुसऱ्या कामात गुंतलेल्यांना (गैरसावध असलेल्यांना) ठार मारणाऱ्या तीक्ष्ण हेरांच्या द्वारा. जादूच्या प्रयोगाने (राजाचा) देवतांशी संपर्क असल्याचा भासनिर्माण करून, गाडयांच्या द्वारा, हत्तीमुळे भीती उत्पन्न करून, दुष्य अधिकाऱ्यांना चिथावणी देऊन, गाईचे कळप व्यूहात सोडून देऊन, छावणीला आग लावून, पुढच्या टोकावर आणि पिछाडीवर एकदम मारा करून, बातमीदारांचे सोंग आणणाऱ्या हेरांकरवी “तुझा दुर्ग जाळून टाकला आहे किंवा सर केला आहे. तुझ्या कुलातील माणसाने बंड करून, तुझा शत्रू अथवा रानटी लोकांचा मुख्य तुझ्या विरूध्द उठला आहे.” अशा बातम्या पसरवून शत्रूसैन्यात घबराट उत्पन्न करावी.
दैवतसंयोगख्यापनं १३ - १ - ३

राजाचा देवतांशी संपर्क असल्याचे पुढीलप्रमाणे दाखवावे.
तदस्य स्वविषये कार्तान्तिकनैमित्तिकमौहूर्तिकपौराणिके
क्षाणिकगूढपुरूषाः साचिव्यकरास्तद्दर्शिनश्च प्रकाशयेयुः॥ १३ - १ - ७

अर्थ : भविष्य कथन करणारे. शकुन सांगणारे, मुहुर्त पहाणारे, पौराणिक, प्रश्न पहाणारे आणि गुप्तहेर तसेच ते अद्भूतदर्शन घडविण्यास मदत करणारे व ते पहाणारे यांनी (राजाच्या सर्वज्ञतेची व दैवतसंयोगाची) ही हकिकत त्याच्या स्वतःच्या देशांत पसरवावी.

परस्य विषये दैवतदर्शनं दिव्यकोशदंडोत्पत्ति चास्य ब्रुयुः॥ १३ - १ - ८

अर्थ : शत्रूच्या देशात त्यांनी विजिगीषूला देवतांचे दर्शन होत असल्याचे व दिव्य कोश व दिव्य सैन्य प्राप्त होत असल्याचे सांगावे.

दैवतप्रश्ननिमित्तवायसाङूविद्यास्वप्नमृगपक्षिव्याहारेषु चास्य विजयं ब्रुयुः॥ १३ - १ - ९

अर्थ : आणि देवतांना लावलेला कौल. विचारलेला प्रश्न, शकुन, कावळयाचे उड्डाण, अंगविद्या, पडलेले स्वप्न, पशुपक्ष्यांचे आवाज या गोष्टींचा अर्थ सांगताना विजिगीषुचा (राजाचा) विजय होईल. शत्रूचा पराजय होईल असे सांगावे.

ततःसत्त्री राजः कथयेत् “असौ सिध्दः पुष्पितं निधि जानाति” इति १३ - २ - ७

अर्थ : नंतर हेराने राजाला सांगावे “त्या सिध्द पुरूषाला पुष्प असलेल्या भूमिगत निधीचे ज्ञान आहे.”

महाराजांनी मोंगलांची व आदिलशहाची अनेक शहरे लुटली त्या शहरातून रस्त्याने जाताना महाराज कोणत्या घरात भूमिगत द्रव्य आहे ते सांगत असत असे उल्लेख अनेक ठिकाणी आहेत.

गाईंचे कळप शत्रूच्या सैन्यात सोडून त्याच्यात गोंधळ उत्पन्न करावा असा उल्लेख १० - ६ - ४९ मध्ये आला आहे. “शिवकाव्य” म्हणून एक ऐतिहासिक संस्कृत काव्य आहे. त्याच्या संबंधाने अनेक वाद प्रतिवाद आहेत. त्या काव्यांत महाराजांनी पन्हाळगडावरून रात्रीच्यावेळी हजारो गाईबैलांच्या शिंगाना जळते पलीते लावून पन्हाळगडावरून खाली शत्रूच्या सैन्यात सोडले व त्यांतून जो गोंधळ झाला त्याचा फायदा घेऊन महाराज पन्हाळ गडावरून निसटले असा उल्लेख आहे.

या सर्व गोष्टींचा कसा अर्थ लावावयाचा हा एक प्रश्नच आहे. महाराज भोळे भाबडे नक्कीच नव्हते ते पक्के राजकारणी होते. त्यानी अशा गोष्टींचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात कौटिलीय अर्थशास्त्र वाचून त्यांतून त्यांनी ह्या कल्पना घेतल्या असे म्हणता येणार नाही. महाराज स्वयंभू होते. शिवाय कौटिल्याचा काळ व महाराजांचा काळ यांत जवळ जवळ दोन हजार वर्षाचे अंतर आहे. याचा पण विचार केला पाहिजें.
सभासद बखर ‘वरप्रदान’

१) मालोजी राजानी शिखर शिंगणापूर येथे तलाव बांधला. तलाव पाण्याने भरला. हे करीतां रात्रौ शंभुमहादेव स्वप्नांत येऊन प्रसन्न होऊन बोलिले जे “तुझ्या वंशांत आपण अवतार घेऊन देवब्राम्हणांचे संरक्षण करून म्लेच्छांचा क्षय करतो. दक्षण देशाचे राज्य देतो.” म्हणोन त्रिवार वचन करून वर दिला. त्याचवरून राजे बहुत संतोषी होऊन दानधर्म बहुत केला.
२) जिजाऊ आऊ तिचे पोटी राजश्री शिवाजीराजे पुत्र होताच श्रीशंभुमहादेव जागृतीं येऊन स्वप्न झाले कीं “आपणच आवतरलो आहे. पुढें बहुत ख्यात करणे आहे. बारा वर्षेपर्यंत तुम्ही आपलेजवळ ठेवावे, पुढें न ठेवणें जातिल तिकडे जाऊ देणे. आटोप न करणे” ऐसी जागृती झाली.
३) अफजलखानाने श्री भवानी कुलदेवता महाराजांची तीस फोडून जातियांत घालून भरडून पीठ केले. भवानी फोडतांच आकाशवाणी जहाली कीं “अरे अफजलखाना नीचा आजपासून एकविसावे दिवशी तुझें शीर कापून तुझे लष्कर अवघें संहार करून नवकोटी चामुंडास संतुप्त करते.”
४) अफजल प्रकरणांत : रात्री श्री भवानी तुळजापुरची मूर्तिमंत दर्शन दिलें आणि बोलली कीं “आपण प्रसन्न जाहालो. सर्वस्वें साह्य तुला आहे. तुझें हातें अफजलखान मारवितो. तुजला यश देतो, तूं कांही चिंता करूं नको” म्हणून धीर भरंवसा देऊन अभय दिले राजे जागे होऊन जिजाबाई आऊस बोलऊन आणून स्वप्नाचे वर्तमान सांगितले. व गोमाजी नाईक पानसंबळ जामदार व कृष्णाजी नाईक व सुभानजी नाईक असे मातबर लोक व सरदार व सरकारकून मोरोपंत व निळोपंत व अण्णाजीपंत व सोनाजीपंत व गंगाजी मंगाजी व नेताजी पालकर सरनोबत व रघुनाथ बल्लाळ सबनीस व पुरोहित असे बोलावून सर्वांस स्वप्न सांगितले. “श्री प्रसन्न जाहली आतां अफजलखान मारून गर्दीस मेळवितो.”
५) अफजल प्रकरणांनंतर : श्री भवानी राजीयांचे स्वप्नांत येऊन बोलू लागली की “आता अफजल तुझ्या हाते मारविला. व कित्येक पुढेंही आलें त्यांस पराभवांत नेले. पुढेही कर्तव्य उदंड कारणें करणें आहे. आपण तुझ्या राज्यांत वास्तव्य करावें आपली स्थापना करून पूजा-पूजन-प्रकार चालविणें” त्याऊपरी राजियाने गंडकी द्रव्य देऊन गाडियावर घालून गंडकी पाषाण आणून श्री भवानी सिध्द करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली.
६) शाहिस्ताखान प्रकरण : तों ते दिवशी रातीं श्री भवानी राजियांचे अंगांत बोलूं लागली कीं “लेकरास म्हणावें की शास्ताखान येतो त्याची फिकीर न करणें. जैसा अफजलखान मारिला. तैसा शास्ताखान येऊन उतरल्यावरी त्याचे गोटांत शिरून मारामारी करणे. पराभवातें पाववितें” असे श्रींने सांगोन मागती राजे सावध जाहले. जवळ कारकून होते त्यानी श्रींची वाक्यें लिहून ठेविली होती. ती राजियास सांगितली. राजियानें श्री प्रसन्न जाहली हे कळोन हिंमत धरली.
७) मिरजा राजा जयसिंग प्रकरण : महाराज बोलीले. श्रींचे राज्य, श्रीवर भार घातला आहे. तिचे चित्तास येईल तें ती करील, असें बोलिले. त्यावर तो दिवस गेला. दुसरे दिवशीं श्री भवानी येऊन बोलू लागली कीं “अरे मुला, या वेळचा प्रसंग कठिण आहे. जयसिंगास मारवत नाही. तो सल्ला करीत नाही. भेटावे लागते. भेटून दिल्लीस जावें लागते. तेथें कठिण प्रसंग होईल. परंतु आपण बरोबर येईन. लेकरास नाना यत्नें करून रक्षून घेऊन येईन. यशस्वी करीन. चिंता न करणें म्हणोन लेकरास सांगणे. लेकरास आपले राज्य आपण वरदान दिलें ते आपण कांही एक पिढी दिले नाही. सत्तावीस पिठी दिले. दक्षणचे (राज्य) नर्मदापर्यंत दिले असे, राज्याची चिंता मला आहे. पूर्ण समजणें. लेकरू वेडी वाकडी वर्तणूक करील ती सर्व आपणांस सावरणें लागते. कोणेवीशीं चिंता न करणें” असे सांगोन अदृश्य जाहली. ती वाक्यें लिहिणाऱ्यांनी लिहून ठेविली होती. त्याउपर राजे सावध जाहले. मग श्रींची वाक्यें सर्वांनी निवेदन केली. त्यावरून राजे बहुत संतोष होऊन हिंमत धरली.
८) अऱ्यास कैदेत. : राजे बोलले जे “आतां काय हुन्नर करावा” असा विचार करितां रात्र झाली. मग भवानी स्वप्नात येऊन साक्षात्कार झाला कीं, “कांहीं चिंता न करणे. येथून पुत्रासहवर्तमान घेऊन जाते. चिंता न करणे” म्हणोन अभय झाले. मग जागृत होऊन आप्तांविषयीं लोकांस सांगितले. आणि समाधान मानिले.
९) संभाजीराजे दिलेरखानास मिळाले तेव्हां : संभाजी राजे दिलेरखानाकडून परत आले. पितापुत्रांची भेट जाहली. बहुत रहस्य जाहले. त्याउपरी राजे म्हणू लागले की, “लेकरा मला सोडू नको. औरंगजेबाचा आपला दावा. तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य झाला.”

संदर्भ : १) सभासद बखर २) कौटिलीय अर्थशास्त्र - प्रा. र. पं. कंगले

Site Designed and Maintain by Net Solutions