शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
श्री. आप्पा परब

‘सुमुहूत’ संबंधी चर्चा करण्याइतपत मी कांही कोणी शास्त्री - पंडित - ज्योतिषी नाही. माझ्या या लेखाचें शीर्षक मूलतः चूक आहे. कारण वास्तविक शतपथ उपनिषदांतील षडवा ऋतवः संवसरस्य या संकेतानुसार १) वसंत - चैत्र, वैशाख. २) ग्रीष्म - ज्येष्ठ, आषाढ. ३) वर्षा - श्रावण, भाद्रपद. ४) शरद - आश्विन, कार्तिक. ५) हेमंत - मार्गशीर्ष, पौष. ६) शिशिर - माघ, फाल्गुन. हा अनुक्रम आहे. तसेंच प्राचीनतम साक्ष पहातां कवि कालीदासाच्या मेघदूत काव्यानुसार “आषाढस्य प्रथम दिने” ही पाऊसकाळाची सुरूवात आहे. वर्षा ऋतुचा प्रथम महिना आषाढ आहे. परंतु आकाश, तेज, वायु, पृथ्वी, पाणी हीं पंचमहाभूतें सीमामुक्त आहेत. म्हणूनच पृथ्वीवरील उन्हाळा - पाऊसाळा - हिवाळा या तीन ऋतूंच्या संवत्सरांतील सीमा निश्चित नाहीत. मात्र शास्त्री - पंडितानीं संवत्सरांतील बारा महिन्यापैकीं या तीन ऋतूंमध्यें चार - चार महिन्यांची ठोकळ मानानें विभागणी केलेली आहे.

श्रीशिवराजाभिषेकाचा ज्येष्ठ शुध्द द्वादशी हा सुमुहूर्त शास्त्री - पंडितानीं निश्चित केला होता. (सूर्योदयानंतर ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस दरबार भरवून “राजदर्शन” झालें) शिवकालीन शास्त्री - पंडितानां चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे चार महिने ग्रीष्म ऋतुचे आहेत, हें शास्त्रानुसार ठावुकी होतें. पण आषाढ महिन्यांत पर्जन्य काळ संभवतो हें ही त्या शास्त्री - पंडितानां अनुभवानें ठावुकी होतें. कारण त्यांच्या हयातीतील कांही पाऊसाळे त्यांच्या माथ्यावरून गेले होते.

शके १५९६ आनंद संछर जेस्ष्ट शुध १२ शुक्रवार घटी २१ पले ३४ वि ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हा राजश्री सिवाजीराजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ १० रबिलवल सु॥ खमस सबैन अलफ. ही आहे जेधे शकावलीतील नोंद.

शके १५९६ आनंदनाम संवत्सरे जेष्ठ शु॥ द्वादसी राज्याभिषेक सिंव्हासनारूढ जाले - ही आहे शिवापूर दप्तरांतील यादीतील नोंद.

शके १५९६ आनंदनाम संवत्सरे जेष्ट शु॥ १२ शुक्रवासर २१॥०३४ विष्कंभ ३८॥-४. सि ४२ तीन घटिका रात्री उरली तेव्हां सिवाजीराजे सिंहासनी बैसले. छ १० रौ।वल सु॥ खमस सबैन अलफ. - ही आहे शिवापूरकर देशपांडे वहीतील शकावलीतील नोंद.

वास्तविक शके १५९६ आनंदनाम संवत्सरामध्यें धर्मशास्त्रानुरूप साडेतीन शुभ मुहूर्तापैकीं चैत्र शुध्द प्रतिपदा व अक्षय तृतीया हे दोन पूर्ण मुहूर्त श्रीशिवराजाभिषेकास संभाव्य येऊन गेले. पण ते शुभमुहूर्त हिंदुधर्माभिमानी धर्मशील शिवरायांनी लक्ष्यांत घेतले नाहीत. याचे संयुक्तिक कारण नियोजित श्रीशिवराजाभिषेक दिन यामध्यें दिसतें.

इ.स. १६७३ मध्यें किल्ले रायगडावर गेलेला मुंबईकर इंग्रजांचा वकील टॉमस निकल्स आपल्या रोजनिशीत परतीच्या प्रवासांत दिनांक ७ जून १६७३ रोजीं लिहीतो - मी चौलकडे निघालो. मेघांचा गडगडाट होऊन पाऊस कोळल्यामुळे नदीला उतार नव्हता. रात्रभर राहिल्यावर पाणी ओसरले.
यावरून जर १६७३ जून ७ रोजी पाऊस आला, तर जून १६७४ ला पाऊसाचा संभव होता.

४ एप्रिल १६७४ रोजीं मुंबईकर इंग्रजांचा वकील नारायण शेणवी हा डेप्युटी गव्हर्नरला मुंबई येथें किल्ले रायगडवरून कळवितो कीं, नव्या वर्षारंभी जून मध्यें स्वतःला राजाभिषेक करून घेण्याच्या इराद्यानें सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजीराजे बनवीत आहेत.

या उल्लेखांतील “नव्या वर्षारंभी” हा शब्दप्रयोग विचारांत घेण्याजोगा आहे. शिवराय हिंदु होते. त्यांच्या धर्मानुसार २८ मार्च १६७४ रोजीं शके १५९६ आनंदनाम संवत्सरांतील चैत्र शुध्द प्रतिपदा होती. नारायण शेणवीहि हिंदु होता. त्याला त्या वर्षींचा “गुढी पाडवा” होऊन गेला, हें माहीत होतें. तरीही नारायण शेणवी ४ एप्रिलच्या आपल्या पत्रांत “नव्या वर्षारंभी” असा उल्लेख करतो. इतकेंच नव्हे तर तो आपल्या पत्रांत इसवी सनाच्या त्या वर्षाच्या जून महिन्यात श्रीशिवराजाभिषेक असल्याचे सांगतो. त्यामुळें हिंदुधर्मानुसार दुसरें कालगणनेचे वर्ष विक्रम संवत याचा तो “नव्या वर्षारंभी” हा उल्लेख नाही.

मग या “नव्या वर्षारंभी” शब्दप्रयोगाचे तत्कालीन दख्खनमध्यें प्रचलित असलेल्या हिजरी सुहूर व फसली या कालगमनेविषयीं स्पष्टीकरण देताना प्रसिध्द इतिहास संशोधक ग. ह. खरे. आपल्या “संशोधकाचा मित्र” या ग्रंथांत सांगतात -
हिजरी : हिजरत या शब्दाचा अरबीमध्यें “निष्क्रमण” असा अर्थ आहे. ज्या दिवशीं मुहम्मद पैगंबरानें मक्केतून मदिनेस निष्क्रमण केले, त्या दिवसापासून या कालाची गणना सुरू झाली. असें समजत असल्यानें यास हिजरत, हिजरिय्यह इत्यादी म्हणतात. या प्रसंगाची गणितागत तारीख १५ जुलै ६२२ इसवी ही असून परंपरागत तारीख १६ जुलै ६२२ इसवी ही येते. याचे वर्ष पूर्णपणे चांद्रमानाचे असल्याने एक वर्ष कधी ३५४ तर कधीं ३५५ दिवसांचे होते.

शुहूर : यास सुहूर, सूर किंवा अरबी सन अथवा मृगसाल म्हणतात. याच्या नांवाची व्युत्पति निश्चयाने सांगता येत नाही. पण अरबी भाषेत शुहूर हें शहर या मासवाची शब्दाचें बहुवचन आहे. तेव्हा त्याचा यौगिक अर्थ महिन्यांचे (महिन्यास महत्त्व असलेलें) वर्ष असा होईल. पण व्यवहारांत तसें दिसत नाही. उलट यांत महिन्यांस मुळींच महत्त्व नाही. हें वर्ष सौरमानाचें अर्थात् ३६५ दिवसांचे असून याचा आरंभ दर वर्षी सूर्य मृगनक्षत्रांत शिरतांना होतो. (जुनी पध्दत २३, २४ किंवा २५ मे, नवी पध्दत ५, ६, किंवा ७ जून) यांतील महिने हिजरी गणनेंतील अर्थात चांद्र किंवा मोहरमादि असल्यानें याचा प्रत्येक नवीन वर्षारंभ हिजरी तारखांच्या दृष्टीनें १०, ११ किंवा १२ दिवस उशीरा होतो. उदाहरणार्थ, एक सुहूर वर्ष मोहरम पहिलीस सुरू झालें तर त्यापुढचे सुहूर वर्ष ११, १२ किंवा १३ मोहरमला सुरू होईल......

ही कालगणना कोणी व केव्हां सुरू केली याविषयीं निश्चित माहिती नाही. पण हिचा आरंभ फसली गणनेच्या तत्वावरच झाला असल्यास हिचें पहिले वर्ष हिजरी ७४४ मोहरम १ अर्थात् २६ मे १३४३ रोजीं मृगनक्षत्रावर सुरू झालें असलें पाहिजे. मात्र या वेळीं हिचेंही ७४४ वे वर्ष सुरू झालें असें गृहीत धरल्याने हिचें इसवीमध्ये रूपांतर करतानां हिच्या वर्षांत ५९९ किंवा ६०० मिळवावे लागतात. यावेळीं मुहम्मद तुघ्लक दिल्लीस राज्य करीत होता व त्याचा निदान नामधारी अमल दक्षिणेवर चालू होता. इकडे अलाउद्दीन हसन बहमनी स्वतंत्र होण्याची खटपट करीत होता. तेव्हां फसली वर्ष ज्याकरितां पुढें सुरू करण्यात आलें त्यासाठींच दक्षिणेंत सुहूर सन सुरू झाला असावा.

याचा उपयोग जुन्या साधनापैकीं आदिलशाही, निजामशाही व थोडया फरकानें फारूकी, फार्सी व मराठी फर्मानें, खुर्दखतें व मिसली यांत सरसहा केलेला आढळतो. विशेषतः जमिनीचे इनाम, नोकरांचे वेतन व बदली, द्रव्य गोळा करण्याचे हक्क इत्यादि बाबतीत अर्थात् जमिनीचे पीक व त्यापासून मिळणारा पैसा यांचा जेथे जेथे संबंध तेथें तेथें या सनाचा हटकून उपयोग केला आहे. थोडक्यांत सांगावयाचें तर लष्करी हालचाली व्यतिरिक्त सर्व प्रकरणीं याचा निर्देश आढळतो. याचा उल्लेख करण्याचा मूळ व खरा हेतु वर सांगितलेले व्यवहार, शेवटच्या पिकांची काढणी - मळणी, फाळाभरणी इत्यादी झाल्यावर चालू व्हावे अर्थात् जमीन लागणीच्या दृष्टीनें नव्या वर्षापासून सुरू व्हावे हा होता. यामुळेंच फर्मानांतून याच्या प्रयोगाची सुरूवात “अझ शुहूर सनह” अशा शब्दानीं करून अरबी अंकवाची शब्दांत त्याचा निर्देश करतात. पुढें या प्रयोगास मामुली स्वरूप येऊन सुहूर सनाचा उल्लेख करणें ही एक रुढीच होऊन बसली. पण याचा महसुलाशीं घनिष्ठ संबंध आहे हें एका फारुकी फर्मानांतील “शुहूर सनह अलफुल्महसूलियह” या प्रयोगावरून स्पष्ट होतें.

फसली : फसल या शब्दाचा अर्थ हंगाम; हंगाम कशाचा तर पिकांचा. अर्थात् जें वर्ष पिकांच्या हंगामावर अवलंबून असतें त्यास फसली काल म्हणतात. पिकें सूर्यामुळें पडलेल्या पाऊसावर अवलंबून असल्यानें फसली वर्ष साहजिकच सौर बनलें. दक्षिणेमध्ये फसली वर्ष म्हणजे शुहूर सनाचें एक रूपांतरच आहे. हें शुहूर सनाप्रमाणेंच सूर्य मृगनक्षत्रांत शिरतांच सुरू होऊन पुन्हा मृगनक्षत्र येईपर्यंत चालू रहातें. दक्षिणी फसली वर्षांत ५९० - ५९१ मिळविले म्हणजे इसवी वर्ष येतें. याचा अर्थ असा कीं, शुहूर वर्ष फसलींपेक्षां नऊ वर्षानीं मागे आहे किंवा दोहोंमध्यें नऊ वर्षांचे अंतर आहे. शुहूर व फसली यांचे जोड उल्लेख आले आहेत तेथें - तेथें हें अंतर निरपवाद आढळतें. उत्तरी फसलीत ५९२ - ५९३ मिळविले असतां इसवी सन येतो. त्याचा नववर्षारंभ पंजाब, बंगाल व संयुक्त प्रांत यांत पूर्णिमांत आश्विन कृष्ण १ या मितीस होतो. फसली किंवा शुहूर महाराष्ट्रांत सौर मृगनक्षत्रावर सुरू होत असल्यानें जुन्या पध्दतीनें २४ किंवा २५ मे दिवशीं व नव्या पध्दतीप्रमाणें ४, ५ किंवा ६ जून दिवशीं याचे नवीन वर्ष सुरू होतें.

“आईन-इ-अकबरी” मध्यें लिहिलें आहे कीं, फसली सौर वर्ष असून त्याचा पिकाशीं संबंध आहे. हिजरी सनाचा हंगामाशीं नीट हिशेब न बसल्यानें जमीनधारा वसूल करणे सुलभ जाईना. यासाठीं अकबरानें सौर हिजरी वर्ष सुरू करून त्याचे नांव फस्ली ठेविलें. याची सुरवात अकबराच्या राजाभिषेकानंतर झाली असली तरी त्याची मोजणी अकबराच्या राजाभिषेकाच्याही पूर्वीपासून करावी अशी त्यानें आज्ञा दिली होती. अकबराने दोन्ही काल १ मुहर्रम ९६२ हिजरीपासून मोजण्यास सुरूवात केली होती. अकबरानंतर ८० वर्षानीं शाहजहाननें हिजरी १०४४ मध्यें दक्षिणेंतील कांही प्रदेश जिंकल्यानंतर तेथें नवीन फसली सन सुरू केला. त्याचाही आरंभ १०४४ मधून ८० वर्षें कमी करून ९६४ सालीं झाला.

पूर्वी शेतीवरील धान्य रूपानें मिळणारा कर ही सरकारची उत्पन्नाची मुख्य बाब होती. पिकें पाऊसावर अवलंबून असतात आणि पाऊस तर सूर्यानें उत्पन्न केलेल्या ऋतूंशी संबंध्द असतो. तेव्हां पिकें सहजच सूर्याच्या भासमान गतीशीं किंवा सौर वर्षाशी निगडित आहेत. यामुळे चांद्रवर्षाच्या मानाने ठरविलेला महसूलीचा काल पिकें तयार होण्याच्या मानानें अधिकाधिक अगोदर येऊं लागला. अर्थात् पिकें तयार होण्यापूर्वींच धान्य रूपानें करवसूली होणें शक्यच नव्हतें. म्हणून विशेषतः करवसुलीवरच कोणत्याही त्या कालीन सरकारचें जीवन अवलंबून असल्यामुळें महसूलाचे बाबतींत प्रत्येक सरकारला चांद्रमान टाकून देऊन सौरमान स्वीकारणें भाग पडलें. याचा परिणाम असा झाला कीं, कोणताही मुसलमानी देश घेतला तरी त्यांत हिजरी कालगणनेस केवळ धार्मिक दृष्टया महत्त्व राहिलें असून लोक व्यवहारांत कोणत्या ना कोणत्या रूपांत सौर वर्षासच एकमेव स्थान मिळाले आहे. हिंदुस्थानांत सौरमान किंवा चांद्रसौरमान मुसलमानपूर्वकाळांत सर्रास प्रचारांत होतेंच; पण मुसलमान येथें राज्यकर्ते म्हणून नांदू लागल्यावर त्यांनी येथें शुहूर, फसली, विलायती, अमली, इलाही इत्यादी तत्वतः एकच पण नामरूपातः भिन्न असे अनेक काल सुरू केले.

इतिहास संशोधक ग. ह. खरे यांचे शिवकालीन कालगणेचे हें स्पष्टीकरण ध्यानीं घेतल्यावर या लेखाचें माझे शीर्षक मूलतः योग्य आहे, असें मला वाटतें.

या कालगणनेच्या गोंधळांतील स्पष्टीकरण देतानां “शककर्ते शिवराय” लेखक विजयराव देशमुख आपल्या ग्रंथांत सांगतात - राजाभिषेक मुहूर्त शोधतानां तत्कालीन यावनी रूढीचाही विचार सोयीसाठी केला गेला, हें उघड आहे. मुसलमानी फसली १०८४ वे वर्ष दिनांक २४ मे १६७४ रोजी लागत होते. त्या सुमारास राजाभिषेकाच्या पूर्वीचे विधी सुरू करून हिंदु पध्दतीने शुभ मुहूर्तावर राजाभिषेक करण्याचे ठरले. राजाभिषेकाचा अविस्मरणीय प्रसंग हिंदू - मुसलमान या दोघांच्याही लक्ष्यांत कायमचा राहण्याच्या दृष्टीने नव्या फसली सनाच्या सुरूवातीला हा विधी झाला.

अकबराचा मंत्री राजा तोडरमल, निजामशाहीचा मंत्री मलिक अंबर आणि शिवरायांचा मंत्री अण्णाजी दत्तो हे तिघेही जमीन महसूलाच्या बाबतींतील तज्ञ होते. अण्णाजी दत्तो यानीं शिवकाळांतील कागदपत्रांतील प्रचलित “शुहूर” सन, शिवकाळांतील जमीन महसूलाशीं संबंधीत “फसली” सन यांचा “श्रीशिवशक” याच्याशीं समन्वय साधण्यासाठीं श्रीशिवराजाभिषेकाचा मुहूर्त काढला असावा. शिवकालीन जनसामान्यांच्या मनांतील “मृगसाल” ही अण्णाजी दत्तो यानीं विचारांत घेतलें.

श्रीशिवराजाभिषेक मुहूर्त या बाबत “शककर्ते शिवराय” ग्रंथांतील उल्लेख - शुक्रवार, ज्येष्ठ शुध्द द्वादशी शके १५९६. दिनांक ५ जून १६७४ या दिवशीं सकाळी प्रथम ऐन्द्रिशांतीचे कार्य आटोपले आणि त्यानंतर मुख्य राजाभिषेक विधीला सुरूवात झाली. राजाभिषेक विधी शुक्रवारी, सायंकाळ पासून तो शनिवार पहाटेपर्यंत चालला. सिंहासनारोहणाचा मुहूर्त शनिवार पहाटेचा होता......

आणि तो अमृत क्षण आला. वेदमंत्रौच्चार थांबले, मुहूर्ताची घटिका बुडाली व त्याचक्षणी श्रीनृपशालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार, घटी २१ पले ३४ वि. ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हां राजश्री शिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ १० रबिलवल सु॥ खमस सबैन अलफ. ही नोंद सूर्योदयात् तिथी गणनेने दिली आहे. पंचांगानुसार सूर्योदयानंतरच पुढील तिथी व वार मोजतात. उलट इंग्रजी तारीख व वार मात्र रात्री १२ वाजल्यानंतर बदलतो. त्यामुळे लोकिकात राजाभिषेक मुहूर्त शनिवार दिनांक ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी असा समजला जातो. वस्तुस्थिती अशी आहे की द्वादशी शुक्रवारी २२ घटी ३५ पळें होती. त्यानंतर त्रयोदशी शनिवारी १९ घटिका ४९ पळे होती. म्हणजे सिंहासनारोहण द्वादशीला तर राजदर्शन सोहळा त्रयोदशीला झाला. सारांश सिंहासनारोहण विधी शनिवार दिनांक ६ जून १६७४ रोजी सूर्योदयापूर्वी सुमारे १ तास २० मिनिटे म्हणजे पहाटे ५ वाजण्याच्या सुमाराला झाला. हिंदू पंचांगाप्रमाणें अर्थातच सूर्योदयापूर्वी शुक्रवारच समजला पाहिजे.

शिवकाळांत पूजा - पाठादि ब्राह्मण व दैनंदिन पंचांग सांगणारे ज्योतिषी- जोशी यानांच फक्त हिंदू साल गणना पध्दत ज्ञात होती. राज्यकारभारांतील शेणवी जाती आणि प्रभू जाती लेखनिक वर्ग यादवोत्तर दख्खनमधील मुसलमानी अंमलामुळें व्यवहारासाठीं मुसलमानी कालगणना अंगीकारत होता. स्वराज्याच्या आर्थिक स्थिरतेच्या जमीन महसूल विषयक एक माध्यमांतील मुसलमानी व हिंदु समन्वय साधण्याकरितां शिवरायानीं “श्रीनृपशिवराजाभिषेक शक” सुरू केला. शिवशक कधीं सुरू करावा, ही मूळ कल्पना शिवरायांची आहे. त्यासाठीं शिवरायानीं मंत्री मंडळाशी विचार विनिमय केला. शिवशक सुरू करण्याचा मुहूर्त मात्र किल्ले रायगडमधील शिवमंडळांतील ब्राह्मण ज्योतिषानीं निश्चित केला. बहुदा शिवकुलोपाध्याय बाळंभट यानीं श्रीशिवराजाभिषेक मुहूर्त निश्चित केला आणि त्या कार्याची धुरा वाहण्यासाठी गागाभट्ट यानां आमंत्रित केलें.

“राजे शिवाजी या नांवास छत्र सिंहासन पाहिजे” ही मूळ कल्पना “श्रीशिवदिग्विजय” बखरींत उद्धोषित केल्याप्रमाणें प्रभू कुलोत्पन्न बाळाजी (बल्लाळ) आवजी चित्रे चिटणवीस यांची आहे. गागाभट्टानां जर अशी सूचना करावयाची असती तर काशीहून येतानांच ते पूर्व तयारीनिशी आले असते. पण ज्या अर्थी “राजाभिषेक प्रयोगः” व “तुलापुरूषदान विधी” या पोथ्या त्यानीं दक्षिणेत आल्यानंतर लिहिल्या, त्याअर्थी त्यांच्या मनांत तशी सूचना करण्याचा विचार होता, असें म्हणता येत नाही. शिवाय तशी सूचना गागाभट्टानां करावयाची असती तर त्यांनी स्वतःचा दूत स्वतःहूनच किल्ले राजगडावर अथवा किल्ले रायगडावर पाठविला असता, पण तसें घडलेले नाही. शिवरायानींच गागाभट्टानां किल्ले रायगडावर बोलावले आहे. तेव्हां राजाभिषेकाची मूळ कल्पना गागाभट्टानीं दिली, असें म्हणतां येणार नाही.

इसवी सन १६६७ मध्यें किल्ले रायरी संकल्पित राजधानी म्हणून अभ्यासण्यास आणि बांधकाम मुहूर्ताचे पूजन करण्यास शिवराय किल्ले रायरीवर आलेले होते. याच सालीं गागाभट्ट किल्ले रायरीवर आले होते. याची साक्ष “सह्याद्रिखण्ड पूर्वार्ध - उत्तरार्ध अर्थात कोकणाख्यान” ही शिवकालीन पोथी देते. ही पोथी शिवकालीन प्लवंग संवत्सरांत म्हणजे इसवी सन १६६७ मध्ये रचलेली आहे.

या प्रथम भेटींत शिवरायानीं आपल्या राजाभिषेकविधीचा कार्यभार गागाभट्टानां सांगितलेला नाही.

यानंतर इसवी सन १६७३च्या अखेरीस गागाभट्ट महाराष्ट्रात आले. गागाभट्ट नाशिकला आले असतानाच शिवरायानां त्यांच्या आगमनाची वार्ता पोहचली. गागाभट्ट नाशिकहून अनंतदेव भट्टांकडे पैठणला गेले. तेथें त्यानां शिवरायांचे निमंत्रण मिळाले. शिवरायानीं गागाभट्टानां किल्ले रायगडी सन्मानपूर्वक आणण्यासाठी पालखी रवाना केली होती. राजाभिषेकाच्या संदर्भात महाराजांच्या वतीने महत्त्वपूर्ण हालचाली बाळाजी आवजी चिटणीसांनीच केलेल्या दिसतात.

किल्ले रायगडावर गागाभट्टांचे आगमन इसवी सन १६७४च्या जानेवारीमध्ये झाले. महाराजांनी सरकारकुनांसमवेत सामोरे जाऊन भेट - घेऊन सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत केलें. गागाभट्टांसमवेत आणखीही निवडक १० - १२ ब्राह्मण, शिष्ट, पंडित किल्ले रायगडी आले. तिथी निश्चय करून गागाभट्ट पैठणला परतले. कारण अभिषेकाआड येणाऱ्या शास्त्रीय अडचणीचा परिहार मीमांसाशास्त्रानुसार करून या सर्व गोष्टी शास्त्रीय चौकटीत बसविणे व त्यासाठी शास्त्रार्थ सांगणे ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यासाठीच गागाभट्ट आपले गुरूबंधू अनंतदेव भट्ट चितळे यांच्याकडे पैठणला आले. तिथे त्यांच्या सहकार्यानें त्यांनी “राजाभिषेकप्रयोगः” व “तुलापुरूष दानविधि” या पोथ्या प्रचंड परिश्रमपूर्वक लिहून काढल्या. सर्व सिध्दता झाल्यावर ते परत किल्ले रायगडावर आले.

उपरोक्त दोन्ही परिच्छेद “शककर्ते शिवराय” या ग्रंथामधून घेतलेले आहेत.

गागाभट्टकृत श्रीशिवराजाभिषेक प्रयोगः या पोथींतील उल्लेख - गागाभट्टानीं सर्व विधी भोसले घराण्याचे कुलोपाध्याय व पुरोहित प्रभाकरभट्ट निधन झआलेले असल्यामुळें प्रभाकरभट्ट यांचे उत्तराधिकारी दत्तक चिरंजीव बाळंभट यांचे हातें करविला. आपण जवळ मार्गदर्शन करीत बसले. बांळभटाच्या साह्यास सर्व वेदांचे व शाखांचे पढिक ब्राह्मण दिले होते. दान व भोजनार्थ सहस्त्र ब्राह्मण आणले होते.

श्रीशिवराजाभिषेकाचा संकल्पित सुमुहूर्त साधण्यासाठीं त्या आधीचे आवश्यक विधी ज्येष्ठ शुध्द पंचमी शुक्रवार, २९ मे १६७४, ज्येष्ठ शुध्द षष्ठी शनिवार, ३० मे १६७४, ज्येष्ठ शुध्द सप्तमी रविवार, ३१ मे १६७४, ज्येष्ठ शुध्द अष्टमी सोमवार, १ जून १६७४, ज्येष्ठ शुध्द दशमी बुधवार, ३ जून १६७४, ज्येष्ठ शुध्द एकादशी गुरूवार, ४ जून १६७४ या दिवशीं करण्यात आले. ज्येष्ठ शुध्द नवमी मंगळवार, २ जून १६७४ रोजीं नवमी व मंगळवार हे दोन्हीही योग राजाभिषेकाच्या कोणत्याही कार्यास निषिध्द किंवा वर्ज असल्यामुळें हा दिवस भाकड सोडावा लागला.

ज्येष्ठ शुध्द द्वादशी शुक्रवार, ५ जून १६७४ रोजीं प्रथम ऐन्द्रिशांतीचे मुख्य कार्य संपविले. अयुत, सहस्त्र किंवा शत ब्राह्मणभोजन झालें व कर्मसंपूर्णता वाचली. हे सर्व विधी सपत्नीकच झाले.

नंतर मुख्य राजाभिषेकविधीस प्रारंभ झाला. शुक्रवारी २२ घटिका ३५ पळें द्वादशी होती. द्वादशीचा मुहूर्त असल्यानें सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा धार्मिक विधी चालला. राजाभिषेक व सिंहासनारोहण द्वादशीस झाले राजदर्शन समारंभ त्रयोदशीस झाला. त्रयोदशी शनिवारी ६ जून १६७४ रोजीं १९ घटिका ४९ पळेंपर्यंत होती.

इंग्रजी काल गणनेअनुसार शुक्रवार ५ जून १६७४ रोजीं रात्रौ बारा वाजल्यानंतर शनिवार ६ जून १६७४ हा दिवस सुरू झाला; आणि हिंदू कालगणनेअनुसार सूर्योदय झाल्यानंतर शनिवारचा दिवस सुरू झाला. म्हणजेच जेष्ठ शुध्द त्रयोदशी शनिवार, ६ जून १६७४ रोजीं सकाळी ७ - ८च्या सुमारास शिवाजीमहाराजानीं पहिला दरबार भरवून व सिंहासनावर पुन्हा आरोहण करून सर्वांस दर्शन दिले.

तत्कालीन सारा समाज समपातळीवर आणण्यासाठीं शिवरायानीं स्वतःला राजाभिषेक करवून घेतला. तत्कालीन साऱ्या समाजाला समान न्याय्य हक्क मिळावा म्हणून शिवराय सुवर्णसिंहासनाधिष्ठित झाले. तत्कालीन साऱ्या समाजाची आर्थिक घडी नीट बसावी म्हणून शिवरायानीं “श्रीशिवशक” चालू केला.

हिंदुस्थानांतील मला माहित नाहीं. महाराष्ट्रांतील मला माहित नाहीं. पण शिवकालीन स्वराज्यांतील मावळकोकणांतील तळागाळांतील कुणबी शेतकरी ७ जून रोजी “मिरग” पाळतो. “मृग” नक्षत्राची आठवण ठेवतो. आपल्या नांगराला “फाळ” लावतो. आपल्या शेताच्या तुकडयाची पूजा करतो आणि “सामिष्ट” भोजन बनवून सण साजरा करतो. घरांतील शिल्लक धनधान्याची म्हणजे धनरूपीधान्यांतून पाऊसाळयांतील बेगमी करून, सर्वांचे देकार देऊन, नवीन येणाऱ्या सुगीच्या धान्याची अपेक्षा धरून उत्साहित असतो. तेच त्याचे नवीन वर्ष असते. कारण शिवकाळांत आठ महिने तो मुलूखगिरी करून पर्जन्यकाळच्या चार महिन्यासाठी तो आपल्या गांवी - आपल्या घरीं आलेला असतो. कमरेची तरवार सोडून देवघरांत तरवार ठेवून तो आपल्या बायका-मुलांत, सगे - सोयऱ्यांत आलेला असतो. आतां पाऊसाळयाचे चार महिने तो आपल्या कुटुंबात राहणार असतो.

हिंदुस्थानसारख्या शेतीप्रधान देशांत शेतकरी हा राज्यसंस्थेचा अंतीम महत्त्वाचा घटक होता. आठ महिने तो शेतकरी राज्यसंस्थेसाठीं मुलुखगिरी करून “मृगसाल” सुरूवातीला पाऊसाळयाचे चार महिने तो आपल्या शेतांत राबण्यासाठीं परतत असे. अशा वेळीं राज्यसत्तेला त्याचा मागील हिशेब चुकता करणें भाग पडे. तसेंच तत्कालीन शासन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असल्यामुळें पुढील “मृगसाल” शेतसारा आकारणी करण्यास सुलभता होई. म्हणूनच अमली, कटकी, बंगाली, विलायती, शुहूर, फसली, इलाही, श्रीशिवशक इत्यादि तत्वतः एकच पण नामरूपतः भिन्न अशा अनेक कालगणना पध्दति सुरू झाल्या. उत्पन्नाची प्रमूख माध्यमें बदलल्यावर आणि हिंदुस्थानावरील राज्यकर्ते बदलल्यावर त्या कालगणना पध्दति बंद झाल्या.

शेतकरी वर्गाचे “मृगसाल” प्रमाणित धरून शिवरायानीं आपला “शिवशक” त्या समयास सुरू केला. ५ सप्टेंबर १६७६ रोजी प्रभावळीच्या सुभेदारास पाठविलेल्या पत्रामध्यें शिवराय त्या शेतकरी वर्गाबद्दल सांगतात -

....त्या उपरी रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोस्टीस इलाज साहेबी (शिवरायानी) तुज येसा फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेती जे गोला करावे त्यात ज्याला ते सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्या पासी बैलदाणें संच आसीला तर बरेत जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे. माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही. त्यावीण तो आडोन निकामी जाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे. बैल घेवावे व पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढीदिडी न करिता मुदलच उसनेच हळु हळु याचे तवानगी माफीक घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवे. या कलमास जरी दोन लाख लारीपावेतो खर्च करिसील आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी (सामर्थ्य) ये ती करून कीर्द करिसील आणि पडजमीन लाऊन दस्त (सरकारी महसूल) जाजती (जास्ती) करून देसील तरी साहेबा कबूल असतील. तैसेच कुलबी तरी आहे. पुढे कष्ट करावया उमेद धरितो आणि मागील बाकीचे जलित (जुलूम) त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया मवसर तरी काही नाही. ते बाकीचे खंडवे तो कुलबी मोडोन निकाम जाला या उपरि जाऊन पाहतो येसी जे बाकी रयेतीवरी आसेल ते कुलाचे कुल माफ करावया खंडवे तोकुब करून पेस्तर साहेबास (शिवरायांस) समजावणे की ये रवेसीने कीर्द (लावणी) करऊन साहेबांचा (शिवरायांचा) फायेदा केला आहे आणि आमकी येक बाकी गैर उसली मफलीस (गरीब) कुलास माफ केली आहे. येसे समजावणे. साहेब (शिवराय) ते माफीची सनद देतील. जे बाकी नफर निसबत (माणसाच्या अंगची) आसली ते हिसेबीच उसूल घेत जाणे. बाकीदार माहाल न करणे. ये रवेसीने तुजला पदनसी येत (पदाला योग्य असा उपदेश) तपसिलेकरून हा रोखा लिहून दिधला आसे. आकलेने व तजवजीने समोजन याप्रमाणे कारबार करीत जाणे की तुझा कामगारपणाचा मजरा (मोबदला) होये आणि साहेब तुजवरी मेहरबान होत ते करणे. जाणिजे. राा छ ६ माहे रजब.

शेतकऱ्यांचा - कामकऱ्यांचा ऐसा राजा होणे नाही.

श्रीशिवशक चालू करण्यामागें शुहूर, हिजरी, यावनी गणना मागे पडावी, हा उद्देश होता. शिवरायानीं आपल्या हयातींत याचा उपयोग केला. शंभाजीराजांच्या हयातीत अस्थिरतेमुळे ती प्रथा सुटली आणि केवळ छत्रपतींनी दिलेली दानपत्रें, इनामपत्रें व तदनंतर पेशवे वगैरे दुय्यम अधिकाऱ्यांनी दिलेलीं संमतिपत्रें यात मात्र श्रीशिवशक राहिला. छत्रपति प्रतापसिंह पदच्युत होई तों श्रीशिवशक होता. इति. “संशोधक मित्र”

एकंदरीत समकालीन कारकुनांच्या मनांत श्रीशिवशक ठसला नाहीं आणि उत्तरकालीन राज्यकर्त्यानां श्रीशिवशकाचा अभिमान उरला नाही.

महाराष्ट्र सरकारने शाळांच्या उन्हाळयाच्या सुट्टीनंतर ज्येष्ठ शुध्द द्वादशी श्रीशिवशक ध्यानांत घेऊन शाळा सुरू केल्या तर चालणार नाहीं कां?

Site Designed and Maintain by Net Solutions