शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक

भट्ट घराणे ...
संकलन व लेखन - तु. वि. जाधव

विजयनगरच्या ऱ्हासानंतर भारतीय पंरपरा व वैदिक ज्ञान जतन करुन ठेवण्याच्या अमोल कामगिरीत पैठणचे गोविंदभट्ट, त्यांचे पुत्र, पौत्र व प्रपौत्र यांचा मोठा सहभाग होता.

भट्ट घराण्याचे गोत्र विश्वामित्र व घराणे ऋग्वेदी ... या व्युत्पन्न घराण्यातील प्रमुख पुरुष गोविंदभट्ट ... गोविंदभट्टांचे सुपुत्र रामेश्वरभट्ट यांनी पैठण येथे एक वेदाभ्यास केंद्र सुरु केले होते ... रामेश्वरभट्ट अतिशय विद्वान, तेजश्वी व सिध्द पुरुष होते ... त्यांनी अहमदनगरच्या निजामशाही राजपुत्रास एका महाव्याधीतून मुक्त केले होते ... पैठणच्या अनेक भट्ट घराण्यांपैकी बारा घराणी प्रसिध्द पावली म्हणून त्यांना ‘बाराभट्टी’असे संबोधले जाऊ लागले ...!

रामेश्वरभट्टांनी द्वारका येथे देखिल एक वेदाभ्यास केंद्र सुरु केले होते ... तिथून ते काशीस गेले ... रामेश्वरभट्टांना तीन पुत्र असून त्यापैकी नारायणभट्ट हे अतिशय तेजश्वी सत्पुरुष होते ... त्यांचा जन्म इ.स. १५१३ चा ... प्रसिध्द राजा तोरडमल याच्या घरी एका धार्मिक समारंभात त्यांनी तेथील सर्व गौड व मैथिली पंडितांना धार्मिक वादविवादात जिंकून घेतले होते ... तद्वत मोगल सम्राट अकबराच्या विनंतीवरुन, दारुण, अवर्षण परिस्थितीत पर्जन्ययज्ञ करुन चोवीस तासात पर्जन्यवृष्टी घडवून आणली होती ... त्यामुळे काशी विश्वेश्वर मंदिराचे नुतनीकरण करण्यास अकबराने त्यांस मान्यता दिली होती ... त्यांनीच काशीविश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोध्दार केला ...!

पाऊस व वारा यांना आवाहन करणारे मंत्र पूर्वी बरेच प्रभावशाली होते .... त्याचे तंत्र बरेच विकसीत झाले होते ... उपरोक्त ‘पर्जन्यवृष्टी’वरुन आठवण झाली अकबराच्या राजदरबारी असलेल्या नवरत्नांपैकी तानसेन या विश्वविख्यात गायकाची .... तानसेन याच्या शास्त्रशुध्द गायनाने पर्जन्यवृष्टी आणि दीपप्रज्वलन होत असे असे म्हटले जाते ... तानसेनच्या ठायी गायनकलेतील अत्युत्कृष्ट गुण होते ... तो संगीततज्ञ होता ... एकदा म्हणे बादशाहाने त्याला मध्यान्हीचा म्हणजे रात्रीचा राग माध्यान्ही म्हणजे भर दुपारी गावयास सांगितला ... तेव्हा तानसेनच्या या मंत्रगायनाने सारा राजप्रासाद अंधारून गेला ... ! भारतातील विख्यात संगीततज्ञ त्यावेळी आपल्या गायनाने आग विझवीत असत असे म्हटले जाते ...!

चौसष्ट कलांच्या मांदियाळीत संगीत या कलेला अग्रमान दिला गेला आहे ... ती एक स्वर्गीय कला समजली जाते ... ‘गायनशास्त्राचे अनेक राग वायुलहरीचे बनले आहेत ... त्या रागांनी दिवे लागतात व पाऊस पडू शकतो’ असे समर्थ रामदास म्हणतात!.

थोडेसे विषयांतर करावेसे वाटते. ओघानेच आले म्हणून सांगावेसे वाटते. सर्वधर्मसमभावाचे पालन करणाऱ्या अकबराने भगवद्गीतेचे फारशी भाषांतर करविले होते ... आणि आपल्या दरबारात कित्येक पाद्री रोमहून बोलावून घेतले होते ... त्याने वसविलेल्या फतेहपूर सिकरि या आपल्या नवीन राजधानीच्या शहरातील विजयकमानीवर मोठया भक्तीभावाने व प्रेमाने ‘हे जग म्हणजे एक पूल आहे... त्या पुलावरुन जा ... पण त्यावर घर बांधू नका’ हे भगवान येशूचे बोधवाक्य खोदले होते ... काशीविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यासाठी समंती देणारा आणि तत्सम कित्येक लोकोपयोगी कामे करणारा सम्राट अकबर हा प्रजाहितदक्ष व आदर्श राजा होता अशी सर्वसाधारण समजूत आहे ... तसे असेलही ... पण जेव्हा इ.स. १५६७-६८ च्या सुमारास त्याने चितोडवर स्वारी केली तेव्हा विजय प्राप्त होऊनही केवळ रजपुतांनी कडवा प्रतिकार केला म्हणून चिडून जाऊन त्याने सर्वसाधारण प्रजेच्या ‘कतले आम ’चा आदेश दिला ... त्यानुसार त्याच्या डोळयादेखत तीस हजार निर्दोषी प्रजानन कापले गेले ... चितोडच्या या सर्व हत्याकांडात जे राजपूत मारले गेले त्यांची जानवे, अकबराने उत्सुकता म्हणून तोडून आणली. त्यांचे वजन ७४॥मण भरले ... बंधूभाव आणि मानवतेचा संदेश देणारा इस्लामधर्म .... चांगल्या कामासाठी प्रयत्नशील असणे असे सांगणारा इस्लामधर्म .... ज्या व्यक्तीने एक जीव वाचवला त्या व्यक्तीने पूर्ण ‘इन्सानियत’ वाचवली असे सांगणारा इस्लामधर्म ... आणि निरपराध मानणारा इस्लमधर्म ... हे सारे ज्ञात असूनही धर्मबाह्य वर्तन करणाऱ्या अकबराला आदर्श राजा ठरविण्यासाठी कोणी कोणते निकष लावले हे ध्यानी येईनासे होते!.

अकबराच्या काळापासून मोगल सम्राटाला विष्णूचा अंश समजला जात असे ... शहाजहानच्याकाळी ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’असे जगन्नाथ पंडिताने म्हटले ... तेव्हापासून दिल्लीश्वर म्हणजेच जगदीश्वर हा भाव हिंदुस्थानभर दृढमूल झाला ... तर मग ‘रब्-अल्-आलमिन’म्हणजे विश्वाधिपती ... हे कसे ? त्या ‘सर्वेश्वर जगदीश्वराचा’वरदहस्त लाभलेल्या नारायणभट्टांची विद्वत्ता व सदाचरण यामुळे त्यांना ‘जगद्गुरु’ही पदवी लावली गेली ... मंत्रजागराच्या वेळी सर्व वैदिकांमध्ये त्यांच्या घराण्याला अग्रपूजेचा मान मिळू लागला ... नारायणभट्टांनी एकूण सतरा संस्कृत शास्त्रीय ग्रंथाची निर्मिती केली ... ! नारायणभट्टांचे ज्येष्ठ पुत्र रामकृष्णभट्ट .. रामकृष्णभट्टांचे ज्येष्ठ पुत्र दिवाकरभट्ट ... व दिवाकरभट्टांचे ज्येष्ठ पुत्र गागाभट्ट उर्फ विश्वेश्वरभट्ट ... गागाभट्ट म्हणजे कलियुगीचे ब्रम्हदेवच ... तत्कालीन भारताचे ते सर्वश्रेष्ठ पंडित व धर्मशास्त्रमिमांसक होते ... म्हणून महाराजांच्या त्या युगप्रवर्तक राज्याभिषेक समारंभाचे ते अध्वर्यु म्हणून विराजमान झाले ... राज्याभिषेकासाठी लागणारे सर्व ग्रंथ त्यांनी पैठणच्या, आपले गुरुबंधू अनंत देव भट्ट चितळे यांजकडून आणले होते ... त्यांच्या सहकार्याने त्यांनी ‘राज्याभिषेक प्रयोग’ व ‘तुला पुरुष दानविधि’या पोथ्या प्रचंड परिश्रमपूर्वक लिहून काढल्या ... !

‘गंगालहरी’कार पंडितराज जगन्नाथ सारख्या महापंडिताने अनुकुल परिस्थितीत दिल्लीश्वराला जगदीश्वर म्हणून गौरविले आणि प्रतिकुल परिस्थितीतही गागाभट्टांसारख्या प्रज्ञावंत प्रकांड पंडिताने, निरपराध लोकांना अभय देणाऱ्या ... प्रजाजनांच्या हिताची काळजी वाहणाऱ्या ... शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या ... विशेषत: श्रीतुळजाभवानीची कृपा असलेल्या ‘कैपक्षी परमार्थी’अशा आदर्श लोकोत्तर नृपाळाच्या मस्तकी अभिषेकधारा आणि छत्रचामरे धरून त्या ‘ईशान्यकडील जगदीश्वराच्या’साक्षीने राज्याभिषेक करविला ... हिंदवी अस्मितेची पुनप्रतिष्ठापना करणारा हा मंगल क्षण ठरला ... !

समर्थ रामदासांनी श्रीशिवछत्रपतींचा ‘शिवकल्याण राजा’असा जो गौरव केला तो किती सार्थ होता हे या श्रीशिवराज्याभिषेक पर्वावरुन सहज ध्यानी येते ... !

‘या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा ... मऱ्हाठा पातशाही येवढा छत्रपति जाला ... ही गोष्ट काही सामान्य जाली नाही ...’असा अत्यंत अल्प शब्दात फार मोठा अभिप्राय सभासदाने व्यक्त केला आहे ... !
‘श्रीमंत योगी’या आगामी शिवग्रंथातून

Site Designed and Maintain by Net Solutions