शिवराजाभिषेक
  मुडस् ऑफ रायगडच्या निमित्ताने
  मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली
  धर्मरक्षक - राजा शिवाजी
  शिवरायांचा समकालीन गणिती
  आईसाहेबांची सुवर्णतुला
  रायगड परिक्रमा
  छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी
  रायगड
  संक्षिप्त रायगड
  भट्ट घराणे
  श्रीशिवराजाभिषेक सुमुहूर्त पाऊसाळयांत कां धरिला?
  शिवराज भूषण
  छत्रपति शिवाजी महाराज व भवानी माता वरप्रदान
  राजधानी रायगडाच्या बांधणीतील काही अभिनव वैज्ञानिक प्रयोग
  किल्ले रायगडावर प्रकाशित झालेली पुस्तके
  ‘गनिमीकावा’ या युध्दशास्त्राचे अनमोल उदाहरण “प्रतापगड युध्द”
  मंचकारोहण आणि सिंहसनारोहण
  शिवराजाभिषेक कारण, कार्य, भाव
  शिवराजाभिषेक समयास उपस्थित ब्रह्मवृंद
  राज्याभिषेक
  मराठा राजघराण्याची नाणी
  पहिला श्रीशिवराजाभिषेक
शिवराजाभिषेक
श्री. आप्पा परब

१८ ऑगस्ट १६६६ रोजी आ याहून निसटलेले शिवराय १३ सप्टेंबर १६६६ रोजी किल्ले राजगडावर पोहोचले. म्हणजेच शिवरायांना या प्रवासास सुमारे २५ दिवस लागले. तदनंतर जेधे शकावलीनुसार युवराज शंभाजी २० नोव्हेंबर १६६६ रोजी किल्ले राजगडावर आले.

छत्रपती शाहू यांच्या मातोश्री महाराणी येसूबाईसाहेब यांची दिल्लीहून सुटका झाल्यावर महाराष्ट्रात येण्याचा मार्ग व कालावधी याचा एक कागद उपलब्ध आहे. त्यावरून त्या १२ एप्रिल १७१५ला इंद्रप्रस्थ येथून निघाल्या. त्या ८ मे १७१५ला तापी तीरी पोहचल्या. या ठिकाणी ही नोंद दर्शविण्याचे कारण म्हणजे सन्मानित येसूबाईसाहेबांच्या सुटकेनंतरचा प्रवासाचा कालावधी व आपत्काळी शिवरायानी सुटका करून घेतल्यानंतरचा प्रवासाचा कालावधी व आपत्काळी शिवरायानी सुटका करून घेतल्यानंतरचा प्रवासाचा कालावधी यातील तुलनात्मक साम्य, यावरून त्याकाळी इंद्रप्रस्थ ते पुणे-सातारा प्रवास कोणत्या मार्गाने होई व त्यास किती दिवस लागत ते समजते.

शिवराय आ याहून आल्यावर मातोश्री आऊसाहेबास आनंद झाला. किल्ले राजगडास आनंद झाला. प्रस्थापित राज्यास आनंद झाला. हा आनंद दीर्घकाळातीत होता. डिसेंबर १६६९ औरंगजेबासी झालेला तह तुटला. याच सुमारास किल्ले राजगडावरून राजधानी किल्ले रायगडावर नेण्याचे ठरले असावे. सन १६७०ची सुरूवात ही मोंगली सत्तेवरील आक्रमणाने झाली. २४ फेब्रुवारी १६७० रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला. याच अवधीत जुनी राजधानी सोडताना मावळातील वतनदारास आणि शासकीय व लष्करी अधिकाऱ्यास भोजनास बोलविल्याची एक कथा शिवदिग्विजय बखर सांगते ती संयुक्तिक वाटते. की कथा अशी - ‘पुढे प्रयोजन सरकारात जाहले. त्यात तमाम मंडळी, ब्राह्मण आदी करून सर्व मानकरीस पदाधिकारीस अमीर, उमराव, सरदारसुध्दा जमा जाले. त्याजला भोजनास सांगितले, ते समयी कारभारी याणी मोठा चवरंग होता, त्याजवरी कचेरीत गादी ठेवून, काही उंच जागा करविली. नंतर दुतर्फा मंडळी बसली. त्यात मोहीते, महाडिक, शिर्के, निंबाळकर, घाडगे, जाधव, आदीकरून जमा झाले होते. त्याणी, महाराजांची जागा उंच करून गादी धातली हे पाहून ईर्षा वाटली की, आता आम्हा मराठयात सभ्य, थोर, मोठेपणा शिवाजी राजांकडे आला. आम्ही कदीम(जुने) तालेवार, राजे, मोर्चेलाचे अधिकारी असता, यांच्या बापानी दौलताबादकर बादशहाचे मुलाचे खिजमतीनी तक्तानर बसले. मोर्चेले हजरतीची उडाली, ती कानू धरून विजापुरकराकडे आले. ते समयी मोर्चेले घेऊन भेटणे, वागणे जाले, तेव्हा आम्ही सर्वानी मनी विचार केला, कोणाचेही बरे असो, या मोर्चेला विशी आपण कलह करावा, तरी तंटा कोणीकडे जाईल? असो. प्रसंगी पाहता येईल. असे असता अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्ही सेवकभावी दाखविणार. त्यास आम्हास या कचेरीत बसावयाची गरज काय ?’’ म्हणोन बोलोन उठोन चालीले. ते समयी कारभारी याणी समजूत केली की, आम्ही मेजवानी केली, यांत आम्हास धणी, तुमचा आमचा स्नेह, तुम्हास तेही मालक, तुम्ही कलह वाढविण्यात नीच नाही. महाराजास कळल्यावरी दोष ठेवितील. तुम्हास विचारावयास चिंता काय आहे? वेगळे वाटेनी पुसावे, सांगतील त्याप्रमाणे करावे, चौघात अशा करण्याने धणीनाही, असे लोक म्हणतील. तेव्हा मालकीचे करणे त्याजला येईल. मग आपणासही संकट पडेल. याजकरीता विचारानी करावे. बोलोन मंडळी बसविली. पुढे उपश्रुति महाराजांचे कानी गेली त्यावरून महाराज विचारात पडले. यास उपाय काय करावा?’’

त्यानंतर कारभारी यांची वेगळाली बोलणी जाहली, तशीच पदाधिकारी यांचीही बोलणी जाहली. त्यात खुषामती लोक बोलणी ऐकिली, महाराज धणी आहेत. जो मालक उंच स्थानी बसला, म्हणून चिंता काय आहे? कोणी बराबरीचे आहेत, त्यांचा सत्कार राहीला पाहीजे. त्यांचा विचार मान-महत्त्वात कमी काय पडेल? मग रूसावयाचे काय कारण? असे पर्याय बोलण्यात आले. परंतु तथ्य असावे, या करण्यात सर्वानी वागावे, असा निश्चय होईना. तेव्हा बाळाजी बावास एकांती विचारीतो जहाले. त्यावरून चिटणीसानी विनंती केली की, ‘महाराज धणी सर्वास असता, आपलाले मताभिमानानी आपली गणना करीत नाहीत. या, जरब असल्याशिवाय, हे सुरळीत वागणार नाहीत. तेव्हा दोन पोटाशी धरून, जरब कोणास द्यावी, हलके कोणत्या रीतीने करावे, त्यांचीच सल्ला घेऊन, त्यांचेच हातून बंदोबस्त करावा. दोन सरदार तसे राहिले, म्हणोन चिंता नाही. मागे-पुढे त्यांचा विचार होईल. राहण्यात किर्ती सरकारची आहे की सरकारची गणना करीत नाहीत, असे आडमाडू सरदार महाराजांचे सेवेत आहेत. आपण गैरचीलीनी वागलो असता, महाराजास समजून काय करतील न कळे, अशी भिती पोटी राहती उद्वास केल्यात लौकीक नाही.’’ या प्रमाणे विनंती केल्यावरून महाराज सुप्रसन्न जाहले. ठिक आहे उत्तर केले.

शिरके, मोहिते, महाडीक, घोरपडे, निंबाळकर मंडळीस आणिले, विचारिले. त्याणी सांगितले की, ”आपण बहुत सल्ला चांगली विचारिली. त्यास तुम्ही दौलताबादेच्या पादशहापासोन या प्रांती लौकिकास आला. तत्पूर्वी आमचे वडील पाच-चारशे वर्षे हजरतीची कामे काजे करून किताब मेळविले. दौलती मेळविल्या आमचे प्रारब्धे न राहिल्या, म्हणोन अमर्याद वर्तणूक कशी पाहावेल? यास्तव तुम्हीच विचार करून सांगणे ते सांगा. तेव्हा महाराजानी उत्तर केले की, ज्यास प्रतिष्ठितपणे राहाणे, त्याणी कचेरीचे समयी येऊ नये. कारण पडेल ते समयी बोलावून घेऊ. उगाच बाखेडा माजवण्याचे कारण नाही. ज्यास बखेडा करण्याची इच्छाच असेल त्याणी या समयी निधून जावे, राहू नये.’’ त्यावरून ज्यास आपले महत्त्वाची प्रौढी मनात होती, त्याणी उत्तर दिले की, महाराज आज्ञा करितात ती नीटच आहे. ज्याजला काम असेल, येणे प्राप्त, तेव्हा भेटीचा समय कोणता तो सांगावा. त्याप्रमाणे येण्याजाण्यास नीट येतील-जातील. त्यावरून त्याजला उत्तर दिल्हे की, तुम्हासारिखे चार बखेडेखोर मिळाले, म्हणजे असाच प्रकार होणार. तुमची गरज आम्ही ठेवितो, म्हणून अशी बोलणी ऐकावी, नाहीतरी अर्थ किती? तुमचे कामकाज असेल, तुम्हास कचेरीत न यावयाचे, तरी कारकून कारभारी यास पाठवित जावे. तुम्ही कचेरीस परिछिन्न येऊ नये, आणि अशी बोलणी बोलू नये. असा निर्बंध ठरून, विडे-पानसुपारी देऊन, कचेरी बरखास जाली.

नंतर बाळाजी आवजीस महाराजानी विचारिले, ‘‘पुढे योजना कोणते प्रकारे करावयाची, ती सांगा. त्यावरून विनंती करीते जाले की, महाराज या नावास छत्रसिंहासन पाहिजे!

शिवरायानी राजाभिषेकाचा जो निर्णय घेतला, त्याला अनेक कारणे आहेत. त्यातील वरील उताऱ्यातील कारण बरेच संयुक्तिक वाटते. तत्कालीन मावळातील समाजस्थिती आणि लोकांची प्रवृत्ती पाहता शिवदिग्विजय बखरीतील वरील घटना सत्य मानणे योग्य होय. सांप्रत शिवरायांचे जे स्थान महाराष्ट्रात आहे. तेवढे महत्त्व तत्कालीन मावळात शिवरायाना लाभले नाही. शिवरायांच्या अष्ट राज्ञीपैकी कोणीही मावळातील राव घराण्यापैकी नव्हते. हे एक उदाहरण विचार करण्यास पुरे आहे.

शिवरायाना राजाभिषेकाचे महत्त्व पटल्यावर राजधानीस योग्य किल्ला शोधणे आवश्क वाटले. सन १६४२ पासून १६७० पर्यंत राजधानी असलेला किल्ले राजगड शिवरायानी सोडण्याचे ठरविले. त्याला अनेक कारणे आहेत. पण त्यातील महत्त्वाची म्हणजे

१) आदिलशाही आणि मोंगली मोहिमा किल्ले राजगडच्याच रोखाने झाल्या.
२) चढत्या वाढत्या स्वराज्य संवर्धनास किल्ले राजगडची भूमी संकुचित होती.
३) किल्ले राजगड भोवतालच्या मावळातील वतनदारांचे प्रेम स्वराज्यापेक्षा आपल्या वतनावर अधिक होते.
४) किल्ले राजगड देशावर असल्यामुळे आदिलशाही व मोंगली घोडदळास व पायदळास त्यांच्या पायथ्यापर्यंत येणे सुलभ होत होते.
५) किल्ले राजगड चहुअंगाने मोकळा होता आणि विस्तृत होता. त्यामुळे संरक्षित राखणे काहीसे कठिण होते.

किल्ले रायरी शिवरायानी राजधानी म्हणून निवडला. सन १६७० ते १६७४ या कालावधीत किल्ले रायरीचा किल्ले रायगड झाला. किल्ले रायगडावर शिवराय आले. त्याला अनेक कारणे आहेत. पण त्यातील महत्त्वाची म्हणजे

१) किल्ले रायगड कोकणात होता. सह्याद्रिची १००मीटर भिंत ओलांडल्याशिवाय किल्ले रायगडास वेढा घालणे शक्य नव्हते.
२) स्वराज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी पश्चिम किनाऱ्यावरील व्यापारावर पकड राखणे आवश्यक होते.
३) शिर्के, सावंत, दळवी, सुर्वे, मोरे हे किल्ले रायगडाभोवतीलीचे वतनदार शिवरायाना शरण आलेले होते.
४) किल्ले रायगड निसर्गत: बेलाग, उत्तुंग, विस्तृत आणी काळ नदीच्या खोऱ्याने संरक्षित होता.
५) आरमार, बंदरे, घाट आणि कोकणातील उत्पादने यावर नियंत्रण राखण्यास कोकणात स्वराज्याच्या मध्यभागी किल्ले रायगड होता.

शिवरायानी किल्ले रायगडावर कोणत्या वास्तु उभारल्या होत्या. त्या समकालीन शिलालेखावरून, उत्तरकालीन बखरीवरून व समकालीन शिलालेखावरून, उत्तरकालीन बखरीवरून व समकालीन अवशेषांवरून आपणास समजते. त्यापैकी बालेकिल्ल्याचा विचार या लेखापुरता मी मांडीत आहे.

बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडील दरवाजास ‘नगारखाना’ म्हणतात. त्यातून प्रवेश केल्यावर विस्तृत पटांगण लागते तो ‘दिवाण-इ-आम’. दक्षिणेकडे दोन इमारतीचे अवशेष दिसतात. त्यापैकी छोटी विद्वतसभा व मोठी न्यायसभा. पश्चिमेकडे पूर्वाभिमुख सिंहासनाची जागा. उत्तर-पूर्व-दक्षिण तटबंदीलगत सचिवालय. उत्तरेकडील दिंडी, चतुर्थ श्रेणीतील लोकांसाठी व न्यायालयात ये-जा करणाऱ्यासाठी. दिवाण-ई-आम मधील ईशान्येकडील खडक, रायरीचा किल्ले रायगड करताना केलेल्या वास्तूपूजनाचा.

दिवाण-ई-आम मधून आत गेल्यावर उत्तरेस तटबंदीलगत देवघर. सिंहासनाच्या मागे शस्त्रागार व वस्त्रागार. त्याच्या मागील आयताकृती चौथरा म्हणजे दिवाण-इ-खास. त्याच्याहि मागे दुय्यम प्रकारच्या संपत्तीची कोठारे. नंतर उत्तरेकडे जमीनी खाली कोषागार. त्याच्यालगत शिवरायांच्या महालाचा सज्जा. सज्जातून प्रवेशकेल्यावर दफ्तरखाना. मध्यभागी शिवरायांचे निवासस्थान. वायव्येस कोपऱ्यात स्नानगृह. हे स्थळदर्शन दर्शविण्याचे कारण म्हणजे राजाभिषेक समयी या जागांचा वापर निरनिराळया मंगलप्रसंगी करण्यात आला.

शिवराजाभिषेक विधी गागाभट्टानी शिवरायांचे तत्कालीन पुरोहीत बाळंभट्ट यांच्याकडून करवून घेतला. यावरून दोन गोष्टी दिसून येतात. गागाभट्ट पूजाविधीचे सर्व साहित्य आपणासच मिळावे. म्हणून लालची नव्हते. दुसरे म्हणजे शिवरायांचे परंपरागत पुरोहित प्रभाकरभट्ट यांचे राजाभिषेकाआधी निधन झाले. असूनही त्यांचे उत्तराधिकारी दत्तकपुत्र बाळंभट्ट याना त्यानी डावलले नाही. राजाभिषेक समयी किल्ले रायगडावर उपस्थित असलेल्या ब्रह्मवृंदावरून मुख्य पुरोहित गागाभट्टानी सर्वाना सामावून घेतले. सर्व काही आपल्याच ताटात ओढून घेतले नाही. गागाभट्टाचे घराणे मूळ दक्षिणेतील असूनही पैठणचे अनंतदेव भट्ट हे त्यांचे गुरूबंधू होते. त्यामुळे ते अधून मधून पैठणास येत असत. गागाभट्टाचा कोकणच्या सामाजिक वादाशीही पूर्वी बराच संबंध आला होता. शेंडे-गोळक यांच्यावरील ग्रामण्य निर्णयात त्यांचा प्रथम संबंध आढळतो. त्यानंतर गागाभट्ट कोकणात सन १६६३ मध्ये आले. तेव्हा सन १६६४च्या सुरवातीस श्येनवी जातीच्या भांडणाचा निर्णय त्याने अनेक काशिस्थ व महाराष्ट्रातील पंडीत, उपाध्याय इत्यादिकांची शिवाजीमहारांच्या विनंतीवरून राजापूरात सभा करून दिला. तो देताना इंदूरहून आधारग्रंथ येईपर्यंत तरी त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातच होते. बरोबर अनंतदेवभट्टही होते. त्यानंतर कायस्थ प्रभूंबाबत निर्णय गागाभट्टानी सन १६६९ ते १६७२ मध्ये दिले. कायस्थधर्मप्रदिप ग्रंथ लिहून त्यांच्या षोडश संस्कारांच्या अधिकारांचे विस्तृत विवेचन केले. याहि निर्णयात अनंतदेव भट्टस्वामींचा संबंध असल्याचा रघुनाथ पंडीतरावानी उल्लेख केला आहे. गागाभट्ट व शिवरायांची सन १६६३ मध्ये चांगली ओळख होती. त्यांच्या श्येनवी जातिनिर्णयास शिवप्रशस्ती जोडण्याइतका शिवाजीराजांविषयी त्याना आदर वाटू लागला होता. यात शंका नाही. महाराजांचा हिंदुधर्मासंस्कार लोप, महाराजांचा उपनयन संस्कार, महाराजांच्या हातून युध्दात घडलेली ब्रह्महत्यादोष, यामुळे शिवरायांच्या क्षत्रियत्वास बाधा येते. याबाबत उल्लेख डाग रजिस्टर मधील, बेंगर्ुल्याचा डच वखारवाला अब्राहम याने आपल्या पत्रात केला आहे.

शिवरायांच्या पदरी असलेले कऱ्हाडे व शृंगारपुरचे पंडीत या कार्यास अनुकूल होते. गागाभट्टांसी वाद घालण्याइतपत त्या काळी कोणी विद्वान ब्राह्मण नव्हता. यासाठीच राजाभिषेकसमयी गागाभट्टांची मुख्य पुरोहीत म्हणून नियुक्ती झाली. त्यानीही इतर ब्रह्मवृंदास सन्मानित केले. छत्रसिंहासनाच्या धर्मसिध्द प्रतिष्ठेचे हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिक, राजकीय, नैतिक आणि सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे सामान्य उद्दिष्ट या राजाभिषेकामागे होते. त्याजबरोबर वर्णाश्रमधर्माच्या आचार वैशिष्टयामुळे सोसाव्या लागणाऱ्या अडचणी दूर होणार होत्या. शिवरायांचे राज्य म्हणजे त्यानी संपादिलेली लहानमोठी जहागिर समजली जात होती. असे लहानमोठे जहागिरदार बरेच होते. राज्यातील सुसूत्रता आली नव्हती. शिस्तीने कारभार चालण्यात अडचणी होत्या. राजा या शब्दाने राज्यसंस्थेचा प्रतिनिधी म्हणून जो सहज आदर किंवा पूज्यभाव उत्पन्न व्हावयास पाहिजे होता, तो होत नसे. राजाभिषेक विधीने मात्र महाराजांना वर्णाश्रमधर्मपध्दतीप्रमाणे आपोआपच श्रेष्ठ स्थान प्राप्त होऊन छत्रचामरयुक्त अधिकाराने महाराजास वेगळे स्थान व निराळी कर्तबगारी व्यक्त होणार होती. काजकारभारातील दुसरी मोठी अडचण म्हणजे ब्राह्मण गुन्हेगारांच्या शासनाबाबतचे परावलंबित्व. कोणताही वाद ब्राह्मणानी उपस्थित केला तर शिवाजी महाराजाना निर्णय घेण्याला रूढीने मान्यता नव्हती. ब्रह्मवृंदास जमवून किंवा काशिस्थ ब्राह्मणांकडून किंवा पैठण येथील धर्मपीठाकडून सर्व ब्राह्मणवाद सोडवावे लागत. यात बराच कालावधी जात असे. तत्संबंधीच्या आज्ञा पंडीतरावांच्या नावाने काढाव्या लागत. इतर जमातीमध्ये त्यामुळे असूया निर्माण होई. त्यांचेवर त्यामुळे अन्याय होई. राजनिष्ठेमुळे रघुनाथ पंडीतास इतर ब्राह्मणांकडून द्वेष सोसावा लागे. त्याचा हेवा ते करीत.

सारांश, अभिषिक्त राजा म्हणून प्रतिष्ठा नसल्याने शिवाजी राजाना सामाजिक व धार्मिक बाबतीत सत्ता नव्हती. हा रूढीचा दंडक राजकारणाक आडवा येउ लागला. अशा परिस्थितीत उभारलेले राज्य वाढत्या तेढीने लयास जाण्याची धास्ती वाटू लागली. प्रजेलाही हाच जाच जाणवत होता. परंतु या मंडळीना दूर करण्यापलिकडे त्यास शिक्षा करण्याचा अधिकार शिवरायाना नव्हता. इतर जातीयाना कडक शासन तात्काळ मिळत असे. छत्रसिंहासनाची प्राणप्रतिष्ठा करून अधिकार राज्यमिळविण्याखेरीज श्रेष्ठ जातीतील गुन्हेगाराना शासन करण्याचा अन्य उपाय राहीला नव्हता. ही राजप्रतिष्ठा झाल्यानंतर मात्र शिवरायानी आपल्या न्यायाधिशांकडून किंवा सरकारकुनांकडून चौकशी करवून अथवा जातीने चौकशी करून कडक शासन देण्यास मागे-पुढे पाहिले नाही. राजाभिषेक होताच अवघ्या पंधरा दिवसातच शिवाजीमहाराजानी जातीधर्माच्या व्यवस्थेबद्दल आज्ञापत्रे आपल्या नावाने काढली.

गागाभट्ट दक्षिणेत आले. तत्पूर्वी त्यांच्या मनात या राजाभिषेकाचा विचार आलेला नसावा. नाहीतर ते प्रयोगाच्या तयारीने आल असते. सन १६७३च्या पावसाळयानंतर ते काशीक्षेत्राहून प्रवासास निघाले. नाशिक - त्र्यंबकेश्वरास सन १६७४ प्रारंभी पोहचून नंतर ते आपल्या गुरूबंधूकडे पैठणास गेले. तेथून रायगडास आले. राजाभिषेकाचा निर्णय घेऊन पुन्हा अनंतदेवभट्ट याजकडे पैठण येथे गेले. तेथे पुरातन ग्रंथाधारे ‘राजाभिषेकप्रयोग’ व ‘तुला पुरूषदानविधी’ या दोन पोथ्या तयार केल्या. परत रायगडास आले. गागाभट्टांचे हे पुनरागमन फेब्रुवारीच्या शेवटास झाले. इतक्यात काशीबाईसाहेबांचे निधन झाले. तशाही सुतकात व दु:खात राजाभिषेकाची सिध्दता चालली होती. या ठिकाणी महाराजांचे मनसंतुलन ध्यानात घेण्याजोगे आहे. मागे ५सष्टेंबर१६५९ राज्ञी सईबाईस देवाज्ञा जाली. तरीही १० नोव्हेंबर १६५९ स्थिर मनाने अफझलखान मारिला. श्रीमद्भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञाचे हे लक्षण होय! इंग्रज दुभाष्या किल्ले रायगडावर २९ मार्चला आला. तेथे २ एप्रिलपर्यंत राहिला. त्याला गडावर राहूनही सिंहासन तयार होत असल्याचे, जूनमध्ये राज्याभिषेक असल्याचे, नवीन शक सुरू होणार असल्याचे त्याला निश्चित समजू शकले नाही. कारण तो आपल्या लिखाणात स्पष्ट लिहीतो की, शिवराय स्वत: किंवा दुसरा राजपुत्र की जो निजामशाहीचा त्यांच्या कैदेत आहे. त्याला राजाभिषेक करणार आहेत. ही गुप्तता राखणे राजकियदृष्टया आणि विशेषत: इस्लामी सत्तांच्या या बाबतीतील विचार केल्यास आवश्यक होते. राजाभिषेकाची तयारी करण्यास मार्चपूर्वी सुरवात झाली होती. नद्यांची व सागरांची जले जमविण्यास शिवरायानी आपले लोक रवाना केले होते. राज्यातील व दूरवरच्या निरनिराळया शाखांच्या ब्राह्मणांना निमंत्रणे पाठविली होती. कलाकुसरीचे सुवर्णसिंहासन घडविले जात होते. राजाभिषेकवीधी चातुर्मासापूर्वीच उरकून घेणे आवश्यक असल्यामुळे अगदी शेवटचाच मुहूर्त धरणे प्राप्त झाले. महाराजांचा व्रतबंध व पत्नीशी समत्रंक पुन्हा विवाह करणे हे विधी मध्यंतरीच्या कालावधीत उरकून घेणे शक्य होते. युवराज संभाजी राजांचे व्रतबंधनही शक्य होते. परंतु कौटुंबिक व राजकीय अडचणी निर्माण झाल्याने ते वीधि तहकूब ठेवून शेवटच्या दिवशी करवून घेतले. २४ फेब्रुवारीला नेसरीच्या खिंडीत सेनापती प्रतापराव कामी आले. १६मार्चला राज्ञी काशीबाईसाहेबांचे निधन झाले. २८ मार्चपर्यंत सुतक पाळले. ८ एप्रिलला हंसाजी मोहितेला हंबीरराव किताबत देवून सेनातपीपद दिले. २४ एप्रिलला केळंजा कोट घेतला. १५मे नंतर किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी मातेस छत्र अर्पिण्यास गेले. २१ मे रोजी किल्ले रायगडावर आले. २३ मे रोजी दोन राज्ञीशी पुन्ही समंत्रक विवाह झाले. शंभाजी १७ वर्षाचा असल्यामुळे धर्मशास्त्रामुसार त्यास व्रतबंधनाविना युवराज म्हणून पटबंधन करण्यास अडथळा नव्हता. मात्र हंबीररावास याच सुमारास प्रतबंधनविधी करवून सेनापतीस पटबंधन अडचणीतून निवारले.

गागाभट्टानी सर्व वीधी भोसल्यांचे कुलोपाध्ये व पुरोहीत प्रभाकरभट्टाचे दत्तक चिरंजीव बाळंभट्ट यांच्या हाते करविला. बाळंभट्ट्च्याच्या सहाय्यास सर्व वेदांचे व शास्त्राचे पढिक ब्राह्मण दिलेले होते. दान व भोजनार्थ सहस्त्र ब्राह्मण आणले होते. यज्ञ शाळा व राजसभा यात लागणाऱ्या ब्राह्मणासच फक्त किल्ले रायगडावर नेले होते. बाकीचे पाचडात ठेवले होते. गागाभट्ट निर्मित पोथीनुसार मार्गदर्शन करीत होते.

२९ मे १६७४ शुक्रवार रोजी जेधे शकावलीतील उल्लेख की, ज्येष्ठ शुध्द ४ घटी ५ राजश्रींची मुंज झाली. याच दिवशी अपराण्ह काली प्रायश्चित वीधी झाले. हेन्री ऑक्झिंडन लिहीतो की, या दिवशी शिवरायांची सुवर्णतुला झाली. तीला १६००० होन लागले. ते होन आलेल्या ब्राह्मणांपैकी समारंभात कार्यरत असणाऱ्या ब्राह्मणासच वाटले. वेंगर्ुल्याचा डच वखारवाला लिहीतो कि, किल्ले रायगडच्या परिसरात ११००० ब्राह्मण पुरूष, स्त्रीय व मुले जमली होती. त्याना ४ जूनला १७००० होनांची दक्षिणा वाटली. शिवरायांच्या हातून कळत-नकळत घडलेल्या पापक्षालनार्थ नंतर सोने, रूपे, तांबे, जस्त, शिसे, लोखंड, लिनन कापड, मीठ, सुकामेवा, जायपत्री, मसाले, लोणी, साखर, फळे, खाद्यपदार्थ, पाने इत्यादींची तुला झाली. ही तुला युध्दप्रसंगी ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, बालहत्या, गौहत्या इत्यादी पापक्षालनार्थ करून दान केली.

गागाभट्टानी मौजीबंधन आणि तुलापूरूषदानादी वीधि एकाच दिवशी केले. उशीरा मुंज झाल्याबद्दल प्रायश्चित म्हणून तुलादान वीधि आणी ब्रह्महत्यादी महत्पापांच्या क्षालनार्थ तुला पुरूषदानविधी केले. या विधीत व राजाभिषेकविधीत एका रात्रीचा खंड राखला. या वीधितीव सर्व जिन्नस राजाभिषेकानंतर फक्त प्रत्यक्ष यज्ञयागादि कर्मे करणाऱ्या ब्राह्मणानाच वाटले. त्यामुळेच नायकादि तांत्रिक नाखूष झाले. वरची दक्षिणा द्यावयाची त्यात जापकादि ब्राह्मणांची गणना द्वारपाळ, अंध वगैरे लोकात केली. व्रतबंध व दानविधी यांचा संबंध प्रत्यक्ष राजाभिषेक संबंधाशी नव्हता. अल्पकालावधिमुळे तो उरकावा लागला.

३० मे १६७४ ज्येष्ठ शनिवारी समंत्रक विवाह केला. असे शकावल्या सांगतात. यावरून पट्टराज्ञी आणि एक राज्ञी यांच्याशी मंत्रयुक्त विवाह झाला. नंतर ८ जूनला चौथ्या राज्ञीशी विवाह झाल्याचे हेन्री लिहीतो. २७ मे च्या हेन्रीच्या पत्रात दोन बायकांशी लग्नविधी व्हावयाचा असा उल्लेख करून ८ जूनला चौथ्या राज्ञीशी विवाह झाला असा उल्लेख हेन्री करतो. वास्तविक शिवरायांच्या किल्ले रायगडावरील अंमलात सकवारबाई, पुतळाबाई, काशीबाई व सोयराबाई या चार राण्यांचा उल्लेख आढळतो. हेन्रीच्या लिखाणानुसार २७ मेच्या उल्लेखात दोन व ८ जूनच्या उल्लेखात एक अशा तीनच राण्यांचा उल्लेख आढळतो. मग हेन्री ८ ज़ूनला चौथी राणी असा उल्लेख करत असताना, १६ मार्चला निधन पावलेल्या काशीबाईना तो तिसऱ्या क्रमांकावर मोजून त्याला चार राण्या माहित असल्याचे दर्शवित आहे. ३० मे शनिवार प्रथम दिन. लग्नविधी समंत्रक झाल्याने वैदिक पध्दतीप्रमाणे राजाभिषेकविधी सपत्नीक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक झाली. महाराजानी आरंभी संकल्प सोडून प्रथम गणेशपूजन, कलशसंस्थापन, पुण्याहवचन, यजमानास अभिषिंचन, षोडशमातृकापूजन, नांदीश्राध्द, पुरोहितवरण, रक्तसूत्रकंकण, पट्टबंधन, इत्यादी विधी झाले. नंतर ऋत्विगवरणाविना विनायक शांती होमासहित झाली. बलि दिला. शेवटी आचार्याला दानवस्त्रे व इतर ऋत्विशाना यथाशक्ती दक्षिणा दिल्यावर विनायकांबिकयोरूत्तर पूजा झाली. आचार्यांस नमस्कार करून विभूति लावल्यावर आणि विसृज्य केला.

३१ मे रविवार द्वितीय दिन: पूर्वरात्री महाराजानी आवश्यक फलशाकाहार, भूशय्या व ब्रह्मचर्य पाळले. ऐद्रीशांतीचे कार्य ठरले होते. त्याप्रमाणे करिण्यामाण राजाभिषेकांगत्वेन ऐद्रिशांती करिण्ये असा संकल्प सोडून कार्यारंभ केला. एद्रीशांती वीधी सुरू झाला. प्रथम कुंडात अग्निप्रतिष्ठा झाली. इंद्राणीचे पूजन, चतुष्कुंभस्थापन व त्यास बलीदान देऊन ऐन्द्रीशांतीविधी पूर्ण झाला. आचार्य व ऋत्विग याना यथाशक्ती हिरण्यदक्षिणा दिली. ऐशानयाग झाल्यावर या दिवसाचा वीधीकार्यसमारंभ संपला.

१ जून सोमवार तृतीय दिन: तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला एद्रिशांत्यत्वेन ग्रहयज्ञं करिष्यं, या संकल्पाने आरंभ झाला. ग्रह यज्ञानंतर नक्षत्रहोम केला. घेनुशंखादि दक्षिणा ग्रहयज्ञाबद्दल व घृतादि दक्षिणा नक्षत्रहोमबद्दल दिल्यानंतर ब्राम्हण भोजन झाले.

२ जून मंगळवार चतुर्थ दिन: मंगळवार व नवमी गे दोन्हीही योग राजाभिषेकाच्या कोणत्याही कार्याला निषिध्द असल्यामुळे वर्ज्य केले.

३ जून बुधवार पंचम दिन : पाचव्या दिवसाचे कार्यही ऐद्रीशंत्यत्वेन नक्षत्रयज्ञ करिण्ये, या संकल्पाने सुरू झाले. उत्तरपूजनानंतर आचार्याला प्रतिमा द्यावयाच्या त्या दिल्या.

४ जून गुरूवार: षष्ठम दिन: रात्री निऋतियाग. या यागात इतर याग द्रव्यात पक्व व अपक्व मांस, मत्स्य, सूरा यांचेही बलिदान झाले. कृष्णवस्त्र धारण करून हा विधी केला. कृष्णपुष्पगंधानीच पूजा केली. हे कार्य उरकल्यानंतर स्नान करून शुभ्रवस्त्र परिधान करून पुण्यहवाचन झाले. गायी दक्षिणा देऊन कर्य संपले.

५ जून शुक्रवार सप्तमदिन: प्रथम ऐन्द्रिशांतीचे मुख्य कार्य संपविले. अयुत, सहस्त्र किंवा शत ब्राह्मणभोजन झाले. व कर्मसंपूर्णता वाचली. हे सर्व विधी सपत्नीकच झाले.

नंतर मुख्या राज्याभिषेकविधीस प्रारंभ झाला. शुक्रवारी २२ घटीका ३५ पळे द्वादशी होती. त्रयोदशीचा मुहूर्त असल्याने सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा धार्मिक विधी चालला. राजाभिषेक सिंहासनारोहण, राजदर्शन असे तीन समारंभ त्रयोदशीस झाले. त्रयोदशी शनिवारी १९ घटिका ४९ पळेपर्यंत होती.

शुक्रवारी सायंकाळी प्रथम गणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृका पूजन, बसोध्दारापूजन, नांदीश्राध्द, नारायणपूजन, आज्यहोम केला. आज्याहुति दिल्यानंतर राजाभिषेकविधीस प्रारंभ झाला. यजमान सपत्नीक आल्यानंतर मंडपपूजा झाली. महावेदीभोवती प्रत्येक दिशेस चार चार कुंभ स्थापिले. पूर्वेस सुवर्णकुंभ. दक्षिणेस रजत कुंभ. पश्चिमेस ताम्रकुंभ. उत्तरेस मृण्मय कुंभ ठेवून त्यातील एकेकांत घृत, दुग्ध, दधि व जल भरले. पूर्वेच्या इतर कुंभात फक्त मधु व इतरात जल भरले. ते कुंभ पल्लवपुष्पानी सुशोभित करून त्यांच्या गळयास वस्त्रवेष्टन करून ठेविले. औदुंबर शाखांची आसंदी केली होती. ती स्थापिली. त्याशिवाय अनेक नद्यांच्या व सागराच्या पाण्याचे कुंभ आणि रत्न, गंध, पुष्प, फल इत्यादी औषधीपूर्ण जलांचे कुंभ जवळ ठेविले. नंतर महादेवीवर अग्नीची व ग्रहांची प्रतिष्ठा केली. मृदांची व कुंभाचीही विधीपूर्ण प्रतिष्ठा केवी. त्या नंतर सर्वप्रधान होम केला. या होमाचे प्रसंगी सर्व वेदीय व शखीय ब्राह्मणानी वेदमंत्राचा घोष केला. जापकानी जप व द्वार पाळानी जयघोष त्याचवेळी केला. या सर्वांच्या जागा नेमून दिल्या होत्या. कोणी कोणते मंत्र म्हणावयाचे तेही ठरवून दिले होते. अशा तऱ्हेने पूर्णाहूती दिल्या. नंतर यजमान अभिषेक शाळेत गेले. सुगंधी तेल व चूर्ण यानी उष्णोदकानी यजमानाचे समंत्र स्नान झाले. नंतर यजमान शुल्कवस्त्र व गंधामुलेपन करून वेदमंत्र मंगल घोषणात मंडपात आले. वेदीवर प्रतिष्ठित केलेल्या आसंदिवर दोन गुडघे ठेवून तळपाय लागू न देता विधीपूर्वक आरोहण केले. नंतर राजे यास अभिषेकास सुरवात झाली. तेथे आचार्य सांवत्सर पुरोहितानी समंत्र अभिषिंचन केले. नंतर आसंदीखाली उतरून अग्निसमिप येऊन प्रार्थना केली. तेथून अभिषेक शाळेतील सुवर्णसिंहासनावर आरोहण केले. आशय हा की आसंदीवर इंद्र म्हणून केलेल्या अभिषेकाने प्रतिइंद्र झालेला राजा सिंहासनस्थ केल्यावर इतर ब्राह्मणामात्यादि मंडळीनी त्यास आपला राजा मानून तेथून पुन्हा मंगल घोषात अभिषेक शाळेत नेण्याकरीता ते त्यांचे समीप आले. तेथून ब्राह्मणामात्यादि राजे यांचा हात धरून महते क्षत्राय महते अधिपत्याय महते जानराज्यायैष वो भरता राजा सोमो उस्मांक ब्राह्मणाना राजा! असे बोलत पुन्हा समंत्रघोषात निरनिराळया उदकानी अभिषिंचन करण्याकरीत अभिषेक शाळेत घेऊन गेले. तेथे निरनिराळया कुंभातील उदकानी यथाक्रमे अभिषिंचन करताना त्या सर्वानी पुन्हा शिवाजी राजांच्या मातापित्यांच्या नावासह संबोधून. इमं देवा असपत्न सुवध्य महते क्षत्राय महते ज्येष्ठाय महते राजातरास्यौंद्रियाय.. विष एव वोमी राजा सोमो अस्मांक ब्राह्मणाना राजा..... असा घोष केला. नंतर इतर अनेकविध मंत्रघोषात व वाद्यघोषात अभिषिंचन झाले.

या अभिषिंचनात सर्व वर्णानी एकत्रित भाग घेतला होता. नंतर पुत्रवंती सुवासिनीनी ओवाळिले. पुन्हा स्नान झाले. कांस्य पात्रातील घृतात मुखावलोन केल्यानंतर ब्राह्मणास दक्षिणा व अमात्यास गो-अश्व-भूमि-सुवर्णादि अपिमीत देऊन वस्त्रांलंकार लेऊन राजे मंडपात आले. तेथून गागाभट्टांबरोबर रथाजवळ गेले. रथविषयक समंत्रक वीधिनंतर रथावर सविध ध्वज व छत्र स्थापिले. अश्वविषयक मंत्रांनंतर राजे मंडपातील वेदीवर येऊन तेथ सुवर्णासनावर आरूढ होऊन अक्षक्रीडेनंतर शयनगृहात गेले. देवाब्राह्मणांचा प्रतिनिधी म्हणून गागाभट्ट रथात प्रथम बसले. नंतर त्यानी शिवरायाना तो रथ पृथ्वी जिंकण्यासाठी दिला.

६ जून शनिवार अष्टमदिन पहाटे महाराज सूर्योदयापूर्वी तास-सव्वा तास ज्या वेळेला गर्गाचार्यांचा मुहुर्त म्हणून संबोधतात. त्या वेळेस सिंहासनारोहण विधी झाला. म्हणूनच जेधे शकवालिने नोंद केली की, ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार घटि २१पळे ३४ विष्कंम ३८-४० सी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिव्हासनी बैसले. छ१० रविलावल सु॥ खमस सबैन अलफ. पहाटे महाराज सभामंडपातील सिंहासनाजवळ आले. त्यावर वृषमार्जारद्विपि सिंहव्याघ्रचर्मे घालून ते आच्छादित केले होते. सभामंडपात अमात्य, पौर, नैगम, पंडीत, वाणी आदि लोक उभे होते. त्याना दर्शन दिले. तेव्हा सांवत्सर पुरोहितानी शिवरायांचा मातृपितृ वेशपरंपरेत उल्लेख करून त्या सर्व मंडळीना तो क्षत्रिय राजा अभिषिक्त कल्याचे घोषित केले. तेव्हा ब्राह्मण पुरोहितामात्य वगैरेनी राजाला प्रणामपूर्वक नजरनजराणा दिले. शिवरायानीहि त्यास वस्त्रे, सुवर्ण, भूमि वगैरे महादाने दिली. नंतर सशर धेनु घेऊन मंडपास प्रदक्षिणी घातली. गागाभट्टास नमस्कार केला. सवत्स धेनूची पूजा केली. अश्वांची व गजांची समत्र पूजा केली. गजावर बसून नगरास प्रदक्षिणा घालून देवालयात जाऊन देवांची पूजा केली. व स्वगृहात गेले. सुवर्णादिक केतशा वगैरे अमात्यास दान दिले. येथे धार्मिक विधी संपला.
Site Designed and Maintain by Net Solutions