ज्येष्ठ शुध्दं त्रयोदशी अर्थात शिवराजाभिषेकदिन !
            पुढे तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्तं सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिध्दं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिध्दं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमिला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुध्द १३स मुहूर्त पाहिला.’

            :- कृष्णाजी अनंत सभासद विरचित ‘शिवछत्रपतिंचे चरित्र.’ (छत्रपति शिवरायांचा प्रथम चरित्रकार)
कलम ८७ :- राजाभिषेक : त्याऊपर वेदमूर्ती गागाभट वाराणसीकर येऊन रायेगडी (रायगडावर) राजेस्वामीस (शिवाजी महाराजांस) मुंजी बंधन (मुंजकरून) पटाभिषेक सिंहासनारूढ झाले. छत्रपति झाले. शके १५९६ आनंदनाम संवछरे (संवत्सर) चैत्र सुध (शुध्दं) प्रतिपदा शुक्रवार.

            :- मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनिविस विरचित ‘९१ कलमी बखर’
            ‘शाके षण्णव बाण भूमि गणनादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त किर्ती महिते शुक्लेष सार्पे तिर्थो’।

            :- रायगड निर्मिती समयी (राजाभिषेकाचे वेळी)
श्री शिवरायांच्या आज्ञेने रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादात लावलेल्या शिलालेखातील उल्लेख. अर्थ असा, ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ गणल्या जाणाया अशा ‘शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्दं त्रयोदशी’ या शुभदिनी शिवरायांना राजाभिषेक झाला.
            जेस्ष्ट श्रुध (शुध्दं) १२ श्रुक्रवार (शुक्रवार) घटी २१ पले ३४ वी ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्रं उरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले. छ १० रबिलवल सु॥ खमस सबैन अलफ

            :- जेधे शकावली.
            श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना तिथीनुसार राजाभिषेक झाला. त्या दिवशी ६ जून १६७४ ही इंग्रजी तारीख होती. मात्रं ६ जून १६७४ ला राजाभिषेक झाला आणि कर्म-धर्म-संयोगाने त्या दिवशी ही शिवतिथी जुळून आली असे मात्रं खचितच नव्हे. परंतु काही संस्थांचे असे मत आहे की, हा सोहळा यापुढे इंग्रजी तारखेनुसार साजरा करावा. तशी घोषणा त्यांनी दि. २८ जून २००७ रोजी रायगडावर ३३४ व्या शिवराजाभिषेका समयी केली. मात्र समोर राजसभेत उपस्थित असणाया बहुसंख्य शिवप्रेमींनी त्यांना आक्षेप घेतला. या संस्थांना हा सोहळा ६ जून या इंग्रजी तारखेप्रमाणे का करावासा वाटतो याची त्यांनी काही कारणे दिली आहेत ती अशी - १) ६ जून या दिवशी गडावर पाऊस नसतो त्यामुळे उपस्थित शिवभक्तांची गैरसोय होत नाही, २) परकीय मुस्लिम सत्तांना विरोध करून महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे एकप्रकारे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिना इतकेच महत्त्व ६ जूनला मिळावे, ३) इतिहासकारांनी ६ जूनलाच मान्यता दिली आहे, ४) शिवरायांना रयतेला त्रास द्यायला आवडत नसे म्हणून त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ६ जूनलाच राजाभिषेक व्हावा.
            यावर बहुसंख्य शिवप्रेमींचे म्हणणे असे आहे की, शिवकाळात इंग्रजी कॅलेंडरच अस्तित्वात नव्हते आणि हिंदू धर्मशास्त्र पंचांगाप्रमाणे सर्व कार्यक्रम निश्चित केले जात. आजही कॉम्प्युटरच्या युगात सामान्यातील सामान्य व्यक्तीही स्वतःच्या घरातील छोटयाशा कार्यक्रमासाठीही मुहूर्त पाहते. इंग्रजी दिनांक, अथवा सुट्टीचा दिवस नाही. मुळात शिवाजी महाराजांनी राजाभिषेकानंतर जे ‘स्वस्ति श्री राजाभिषेक शक’ सुरू केले ते तिथीनुसार बदलते, इंग्रजी तारखेनुसार नाही. जर का जास्तीत जास्त लोक गडावर यावेत असे कोणाचे म्हणणे असेल तर हा सोहळा मे महिन्याच्या सुट्टीत घ्यावा म्हणजे असंख्य लोक येतील. कारण आजही ६ जूनला रायगडावर पाऊस पडणारच नाही असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. एक तर रायगडावर असणाया सोयी-सुविधा या मुळातच अपुया आहेत. त्यात जरी पावसामुळे थोडी भर पडत असली तरी तेथे येणारा शिवभक्तं एका दुर्दम्यं भावनेने, शिवरायांच्या ओढीने येत असतो. त्याला सुख-सोयींसाठी अन्य ठिकाणे आहेत की... जेव्हा तो दुर्गराज रायगडासारख्या बेलाग किल्ल्यावर येण्याचे ठरवितो तेव्हाच त्या शिवप्रेमीचा अडचणींशी सामना करण्याचा निर्धार पक्का झालेला असतो. घनघोर कोसळणाया आषाढीच्या पावसात लाखो आबालवृध्द वारकरी ज्याप्रमाणे एकादशीस विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीच्या वाटेला लागलेले असतात. त्यांना कोणत्याही सुख सोईंची अपेक्षा नसते. होणाया कष्टांची, त्रासाची तमा नसते. फक्तं एकच लक्ष्यं त्यांच्या नजरेसमोर असते ते म्हणजे विठूरायाचे दर्शन. महाराजांचा वारसा सांगणारे तमाम शिवभक्तं ही त्याच भावनिक ओढीने शिवरायांच्या दर्शनासाठी, राजाभिषेक सोहळयासाठी अनेक अडचणी सहन करून रायगडावर येतात आणि यापुढेही येत राहतील. कारण रायगड ही त्यांची पंढरी आहे, ‘शिवराय’ हे दैवत.
            शिवरायांनी परकीय यावनी सत्तांच्या छातीवर पाय देऊन स्वराज्याची, स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली तो शिवभक्तांच्या दृष्टीने हिंदूसाम्राज्यदिन आहेच. मात्रं तो सोहळा आपण तिथीनुसार (कारण ही तिथी स्वयं महाराज व गागाभट्टांनी निश्चित केली होती) म्हणजे ‘शिवशका’ नुसार साजरा करणार का? ६ जून या परकीय इंग्रजी तारखेनुसार म्हणजेच ‘ख्रिस्तशका’ नुसार हा महत्त्वाचा प्रश्नं प्रत्येक शिवभक्ताने स्वतःच्या मनाला विचारणे आवश्यक आहे. कारण ज्या छत्रपति शिवरायांनी स्वधर्म, स्वराज्य व स्वभाषा यासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावले त्याच महाराजांचा राजाभिषेक परकीय इंग्रजी तारखेप्रमाणे करण्याचे प्रयोजन कोणत्याही शिवभक्ताला पटण्यासारखे नाही. सर्व इतिहासकारांनी ६ जून ही तारीख मान्य केली. त्याप्रमाणे सर्वसामान्यांनाही याच दिवशी राजाभिषेक झाला हे माहित आहेच. इथे प्रश्नं येतो तो ‘स्व’ त्वाचा नि आपल्या अस्मितेचा. सर्वत्र साजरा होणारा दसरा म्हणजे ‘विजयादशमी’, त्याच्या आदल्या दिवशी येणारी खंडे नवमी (शस्त्रास्त्रं पूजन), श्री गणेश चतुर्थी, दिपावली (धनत्रयोदशी), अक्षय्यतृतीया, शालिवाहन शकानुसार बदलणारे हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा, होळी पौर्णिमा, घटस्थापना (नवरात्रौत्सव), जन्माष्टमी (दहीहंडी) इ. महत्त्वाचे सण हे वर्षानुवर्षे आपण परंपरेप्रमाणे तिथीनुसारच साजरे करीत आहोत.

                                                        त्यामुळे हिंदूसाम्राज्याची (ज्यामध्ये कोणत्याही जाती-धर्माची उपेक्षा होत नव्हती.) मुहूर्तमेढ रोवणारा शिवराजाभिषेकदिन म्हणजेच तमाम शिवभक्तांचा ‘हिंदवी साम्राज्य दिन (शिवपाडवा)’ हा तिथीनुसारच साजरा करणे योग्य आहे.
   
Site Designed and Maintain by Net Solutions