प्रिय शिवभक्तहो,
            सविनय नमस्कार !
            छत्रपती शिवाजी महाराज हे भारतवर्षाचे श्रेष्ठ युगपुरूष, त्यांचे प्रेरणादायी जीवनकार्य म्हणजे नवसंजीवनी. हा बहुमोल ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी एकत्र आलेल्या शिवभक्तांची श्रीशिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही चळवळ.
            गेली दहा वर्षे महाराष्ट्रासह सर्व प्रांतातून शिवभक्त एकत्र स्वरुपात दुर्गराज रायगडावर श्रीशिवराजाभिषेकदिनोत्सव अर्थात ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी साजरी करीत आहोत. ही चळवळ अधिक लोकव्यापी होऊन लोकोत्सवात परिवर्तित होताना सर्व प्रकारचे राजकीय-सामाजिक-धार्मिक पक्षभेदविरहीत अनेक विधायक उपक्रम हाती घेऊन लोकजागृतीचे कार्य करीत आहे व तरूण पिढीला एकत्र आणून शिवचरित्र प्रसारकार्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे.
            शिवभक्तांच्या सहकार्याने मांडलेली ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होताना नोंदणीकृत सामाजिक संस्था स्वरूपात प्रकट होत आहे. शिवभक्तीची ही दिंडी पुढे नेण्यासाठी आपण सारे लवकरात लवकर समितीचे सभासद होऊन ह्या राष्ट्रीय कार्याला सिध्द व्हावे हे विनम्र आवाहन.

ध्येय व उद्दिष्टये :

  • छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासाचे आदर्श राष्ट्रपुरूष असून त्यांच्या जीवन चरित्राचा प्रसार करणे व लोकांमध्ये शिवचरित्राची व इतिहासाची आवड निर्माण करणे व जोपासणे. शिवचरित्राचे व इतिहासाचे संशोधन करणे व ते करण्यासाठी तत्सम व्यक्ती किंवा संस्थांना प्रोत्साहन व सहकार्य देणे.
  • भारतवर्षाला गौरवास्पद असा प्रेरणादायी छत्रपती शिवरायांचा राजाभिषेकदिनोत्सव शिवतीर्थ रायगडावर साजरा करणे व त्यातून लोकांना एकत्र आणून राष्ट्रभक्तीसाठी प्रोत्साहीत करणे.
  • शिवचरित्र व ऐतिहासिक, विषयांवर पत्रके, पुस्तके, नियतकालिके, दृकश्राव्य साहित्य इत्यादींची निर्मिती करणे व अशा निर्मितींना सहकार्य देणे. ह्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी साहित्य, संगीत-नृत्य-नाटय इ. कला क्रीडा विषयक कार्यक्रम तसेच ह्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक व जनहितार्थ समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेणे.
  • शिवदुर्ग, किल्ले, ऐतिहासिक वस्तू, वास्तू ह्यासंबंधीत स्वच्छता, पुनर्वसन, पुनर्निर्माण, दुरूस्ती, निगा इत्यादी मोहीमा भारतीय इतिहास पुरातत्व विभागाच्या आणि शासनाच्या मार्गदर्शन व परवानगीनुसार हाती घेणे. त्यासाठी शासन व सामाजिक संस्थांना सहकार्य देणे. ह्या कार्यासाठी सहली, गिर्यारोहणे, यात्रा, मेळावे, उत्सव इत्यादींचे आयोजन करणे. दुर्गपायथा व पंचक्रोशीत येणाऱ्या गाव, वस्त्या, वाडया ह्यांमधील जनजीवनाच्या उपयोगार्थ विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैद्यकिय कार्यक्षेत्रातील कार्यक्रम राबविणे. 
  • शिवभक्तहो, उपरोक्त उद्दिष्टांकडे वाटचाल हा प्रदिर्घ प्रवास आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे, पण शिवरायांच्या जीवन चरित्राचा अनमोल ठेवा, आपल्या सर्वांचे प्रयत्न व सदिच्छामयी आशीर्वादांवर ही सारी उद्दिष्टये आपण साध्य करू हा आमचा दृढ विश्वास आहे. तो सार्थ व्हावा ही इच्छा. चला तर, या शिवदिंडीचे वारकरी होऊया.

 

Site Designed and Maintain by Net Solutions