किल्ले अडसूळ - किल्ले अशेरी

महाराष्ट्रातील कोकणी जिल्हांचे दोन प्रभाग पडतात. रायगड, मुंबई व ठाणे ह्यांचा उत्तर कोकण तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा कोकण प्रदेशात समावेश होतो. उत्तर कोकणात सागरी व डोंगरी किल्ल्यांची निर्मिती केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागातील किल्ले अडसूळ आणि अशेरीची भटकंती करुया. ठाणे जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वाडा परिसरात औद्योगिक विकास न झाल्याने येथील जनजीवन हलाखीचे आढळते. उत्तर कोकणात रेल्वे आणि एस.टी.ची चांगली सोय असल्यामुळे भटकंती करिता फारसा त्रास होत नाही.

मुंबई रात्री अकरा वाजताच्या पॅसेंजरनं किंवा विरारहून रात्री दहा वाजता सुटणाऱ्या शलटनं अथवा अन्य मार्गानं पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर गाठायचं. रात्री प्लॅटफॉर्मवर झोप काढून सकाळी पालघरहून पावणेसात वाजता मनोरमार्गे कासाकडे जाणारी बस पकडायची. बसनं खाडकोना गावाच्या थांब्यावर न विसरता उतरायचं. खाडकोना थांब्याच्या उजवीकडे अडसूळगड तर डावीकडे अशेरीगड दिसतो. आपण व्यवस्थित नियोजन करुन एका दिवसात दोन्ही किल्ले पाहू शकतो.

प्रथम अडसूळकडे जाण्याकरिता मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील ‘कासा 6 मैल, मुंबई 81 मैल’ हा मैलाचा दगड आजमितीस आढळत नाही. महामार्गावरील मनोर पार झाल्यानंतर 5 किमी अंतरावर रस्ता चढणीला लागतो. पहिला चढणीचा लागतो. पहिला चढणीचा टप्पा पार झाल्यानंतर डाव्या हातास वाहतुक चौक नजरेस पडते. वाहतूकचौकीला लागूनच गॅरेज व छोटसं हॉटेल आहे. वाहतुकचौकी पटकन कळत नाही. पण गॅरेज-हॉटेलची खूण लक्षात ठेवून उतरावे. वाहतूकचौकीच्या डावीकडून जाणारी वाट खाडकोना गावात जाते तर अडसूळ किल्ल्याव जाण्याकरिता रस्ता ओलांडून, उजवीकडे फुटलेल्या वाटेनं निघायचं. समोर दिसणाऱ्या अडसूळच्या उत्तरेला म्हणजे डावीकडे उतरणाऱ्या सोंडेवरुन गडावर जायची वाट आहे. त्या सोंडेवर जाण्यासाठी आधी समोरची डोंगरधार चढून जायचं. दहाएक मिनिटांनी आडव्या येणाऱ्या पायवाटेनं डावीकडे वळून उत्तरेकडील सोंडेवर स्वार होऊन गड चढणीला लगायचं. पुढे कारवीच्या झाडीतून व मातीच्या घसर वाटेनं पायपीट करित अर्ध्या तासात गडाच्या कातळकडयाखाली पोहचतो. पुढची चढाई मात्र कातळातल्या खोबण्यांचा आधारानं करायची थोड चढल्यावर डावीकडील कातळ व मातीमिश्रीत निसरडया वाटेन किंवा उजवीकडील झाडाच्या आधारनं वर चढत पहिला टप्पा गाठायचा. आता थोडं उजवीकडे सरकायचं की वरचा टप्पा चढण्यासाठी बांबू लावलेले दिसतात. बांबू नसेल तरी थोडस सोपं प्रस्तरारोहण करायचं आणि गडमाथा गाठायचा. वाहतूक चौकीपासून माथा गाठायला साधारण पाऊण एक तास लागतो. गड दक्षिणोत्तर चिंचोळा पसरलेला आहे. माथा एकूणच उंच सखल असून  फक्त दक्षिण टोकाला थोडी सपाटी आहे. गडाचे कडे हे उभी ताशीव असल्यामुळे तटबंदीने संरक्षित गरज भासली नसावी. आजमितीस गडावर कोणतेही अवशेष आढळत नाहीत. साध्या टाक्याचादेखील पत्ता नाही त्यामुळे पाण्याची सोय करुनच गडभ्रमंतीला / चढणीला सुरुवात करायची.

गडावरून पश्चिमेला अशेरी, उत्तरेला महालक्ष्मी सुळका, गंभीरगड तर दक्षिणेला कोहोज आणि तांदुळवाडी हे किल्ले नजरेत भरतात. चहुबाजूंनी आसमंत न्याहाळुन अर्ध्या तासात गडदर्शन पूर्ण करायचे आणि आल्या वाटेनं परतीला निघायचे थेट महामार्ग गाठायचा. कुठेही वेळ वाया न घालवता अडीच - तीन तासात अडसूळ गड पाहून यायचं, जेणेकरुन अशेरी गडातरीता आपल्याकडे पुरेसा वेळ राहतो.

अडसूळ उतरुन महामार्ग ओलांडून खाडकोना गावात दाखल व्हायचं. पोटात कावळे ओरडत असल्यास खाडकोना गावातच पोटपुजा उरकायची. गावातून एक पायवाट अशेरी गडाकडे जाते. जंगलातून जाण्याऱ्या वाटेनं गड नजरे समोर ठेवत डाव्या बाजूला दिसण्याऱ्या खिंडीच्या दिशेनं घोडदौड चालू ठेवायची, तासाभरात खिंडीत चढून जायचं. उजवीकडे वळून गडमाथ्याकडे झेपवायचं. पाच मिनिटांच्या चढणीनंतर, लाकडावर कोरलेली वाघ्या देवाची मूर्ती दिसते. इथून पुढे निघायचं आणि एका खडकाला वळसा घालायचा की गडाच्या दरवाजाखाली आपण पोहचायचं. दरवाजापर्यंत जायला पूर्वी पायऱ्या होत्या पण आजमितीस तुटक्या पायऱ्यावर प्रस्तरारोहण करुन दरवाजात पोहचायच. पुढएदगडात कोरलेला एक देवाचा मुकुट नजरेस पडतो. मुकुटाखालील देव कुठे आहे याची पुसटशी खूण देखील कोठे आढळत नाही. अशेरीगड पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असताना पुर्नबांधणी केली गेली. सदर दगड पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा नमुना देखील असावा. सदर मुकुटापासून उजवीकडे वर जायचं. तिथं खडकात खोदलेल एक टाकं आहे. टाक्यात पाणी असून ते खराब झालेल आहे. त्या टाक्यावरुन वाट सरळ पुढे गडमाथ्याकडे जाते. वाटेत उजवीकडे खडकात खोदलेली पाण्याची आणखी पाच टाकी दिसतात. पाचपैकी एकाच टाक्यातलं पाणी चांगल असल्याच आढळतं. पुन्हा सरळ वाटेनं गडाच्या माथ्याकडे निघायचं पाच मिनिटांत आणखी एक वाट डावीकडे फुटते. त्या वाटेनं गेलं असता पाण्याची आणखी तीन टाकी दिसतात. तिन्ही टाक्यात पिण्यायोग्य असं पाणी आहे. गडावरील पिण्यायोग्य पाणीसाठा या तीन टाक्यात आहे. मात्र वळून पुन्हा सरळवाटेनं चालायला लागायचं. पुढे उजवीकडे एक टेकडी दिसते ती उजवीकडे ठेवत पठारावर पोहचायचं. पठारावर वेशिष्टयपूर्ण अशी गोष्ट आढळते ती म्हणजे जुन्या पडक्या वाडयांचा अवशेषरुपी चौथरे आणि चौथऱ्यांभोवती खडकात खोदलेले चर आहेत. बहुधा पाण्याचा निचरा होण्याकरीता ही व्यवस्था केली असावी. जवळच डावीकडे खडकात खोदलेली गुहा दिसते. गुहेत अशेरी देवाची स्थापना केले आहे. गुहेत काही प्रमाणात कोरीव काम केलेले असून रंगकाम ही केले आहे. या गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळं आणि इतर आणखी अशीच डबकीवजा/ डबकवजा दोन तळी दिसतात. साधारण तासाभरांत गडदर्शन उरकून पुन्हा परतीच्या वाटेला लागायचं. गड उतरुन खाडकोना गावातून महामार्गावर पोहचून मुंबईकडे / घराकडे निघायचं.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी -

अशेरीगड पन्हाळयाच्या शिलावहारवंशीय दुसरा भोज राजा यानं बांधला असा ऐतिहासिक उल्लेख आहे. अशेरी गड हा आठशे वर्षापूर्वी बांधला असावा. पुढे पोर्तुगिजांना हा गड आवडल्यामुळे त्यांनी तो ताब्यात घेऊन पुर्नबांधणी केली. पेशव्यांनी 1737 मधील मोहीमेत हा गड जिंकून घेतला. पोर्तुगीजांना आपला आवडता किल्ला हातून गेल्याची सल मनाला लागून राहीली होती. पोर्तूगीजांनी संधी साधून काही महिन्यांत पुन्हा गडाचा ताबा मिळवला. पण तो ताबा फार काळ राहिला नाही. 1738 मधे पुन्हा पेशव्यांनी गड काबीज केला. पुढे इतर सर्व गडाप्रमाण 1898 मधे मराठयांकडून इंग्रजांनी जिंकून घेतला. अशेरीगडानंतर काही वर्षात अडसूळ किल्ला बांधला गेला असावा.

अडसूळ - अशेरीगड
1) पायथ्याचे गाव - खाडकोना
2) महत्वाचे जवळील ठिकाण - पालघर
3) भ्रमंतीकरीता चांगला ऋतू - हिवाळा
4) पायथ्यापासून लागणारा वेळ - 1 1/2 तास.

 

 
Site Designed and Maintain by Net Solutions